यशोगाथा l हळद उत्पादक शेतकरी ते आनंद शेती उद्योग I Turmeric farmer to Anand farm industry l success story l
सातारा जिल्हा, वाई तालुक्यातील बेलमाई गावाचे शेतकरी श्री. राहुल निंबाळकर यांची वडिलोपार्जित शेती आहे. ते मोठ्या प्रमाणात हळद पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतात.
हळद उत्पादक शेतकरी: श्री. राहूल निंबाळकर |
लॉकडाऊनच्या काळात श्री. निंबाळकर शेतातील हळद मार्केटमध्ये विकण्यासाठी गेले तेव्हा व्यापाऱ्यांनी त्यांना सांगितले की, लॉकडाऊनमुळे हळदीला बाजारभावापेक्षा कमी किंमत मिळेल आणि पैसेही तीन महिन्यानंतर मिळतील. त्यांना हळदीची १ नंबर, २ नंबर आणि ३ नंबर अशी प्रतवारी करून आणायला लावली.
आनंद शेती उद्योग कंपनीची स्थापना
श्री. निंबाळकर यांना व्यापारी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट करीत असल्याचे लक्षात आले. तेव्हा हळद पिकावर आपणच प्रक्रिया करून शेतातील माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवावा. यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळेल. व शेतकऱ्यांना फायदा होईल. यावर त्यांनी विचार करायला सुरुवात केली. पुर्ण विचारांती श्री. राहुल निंबाळकरांनी "आनंद शेती उद्योग" या नावाने कंपनी सुरू केली.
शेतातून ग्राहकांच्या दारात…
श्री. राहुल निंबाळकर यांचा पुण्यामध्ये "निंबाळकर कन्स्ट्रक्शन" या नावाने स्वतःचा बांधकाम व्यवसाय असून त्यांच्याकडे शंभरपेक्षा जास्त कामगार काम करीत आहेत. या उद्योगाबरोबरच त्यांनी आनंद हळद पावडर थेट शेतातून ग्राहकांच्या दारात पोहोचविण्याचा विडा उचलला आणि यामध्ये त्यांना मोठ्या प्रमाणात यश मिळाले. ग्राहकांनाही घरपोच होम डिलिव्हरी मिळत असून ताजी आणि सर्वोत्कृष्ट प्रतीची हळद मिळत असल्यामुळे ग्राहकवर्गही खुश आहे. श्री. निंबाळकर यांनी सेलम जातीच्या सर्वोत्कृष्ट हळद पिकापासून हळद पावडर व्यवसायाची सुरूवात केली.
हळदीची डबाबंद पॅकिंग |
ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद
सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरुवातीला हळद पावडर विक्री व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या श्री. राहुल निंबाळकर यांना अगदी सातासमुद्रापार अमेरिकेहूनही हळद पावडरसाठी ऑर्डर आल्या असून त्यांनी अल्पावधीतच संपूर्ण देशात आणि परदेशातही हळद पावडर विक्री व्यवसायाची सुरुवात केली. बेलमाचीसारख्या छोट्याश्या खेडेगावातून सुरू करण्यात आलेल्या हळद पावडर विक्री व्यवसायाला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद लाभल्यामुळे श्री. राहुल निंबाळकर यांनी कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर ही नवी उत्पादनेही बाजारपेठेत आणली. त्या उत्पादनांना ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. श्री. राहूल निंबाळकर यांच्या या उद्योगाची दखल प्रसारमाध्यमांनी घेतली. असून त्यांच्या कार्यावर स्तुतीसुमने उधळली. बातम्या, लेख, ब्लॉगच्या माध्यमातून या खेडेगावातील उद्योगाला मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली. याचा श्री.राहुल निंबाळकर यांना मोठ्या प्रमाणात फायदा झाला.
दर्जेदार गुणवत्ता असलेली हळद पावडर |
हळदीची उत्कृष्ट गुणवत्ता
श्री. राहुल निंबाळकर यांनी सुरुवातीला २५ पेक्षा जास्त औषधी गुणधर्म असलेल्या हळदीची १ नंबर, २ नंबर आणि ३ नंबर अशी प्रतवारी का करण्यात येते या गोष्टीचा त्यांनी अभ्यास केला. हळदीचा वापर करणाऱ्या सुमारे ३२ कंपन्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या लक्षात आले की, पहिली प्रत औषध निर्मितीसाठी, दुसरी प्रत सौंदर्य प्रसाधने तयार करण्यासाठी आणि तिसरी प्रत असलेली हळद स्वयंपाकघरात वापरण्यात येते. १०० टक्के नैसर्गिक रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारी हळदीची उत्कृष्ट गुणवत्ता ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचा विडा श्री. राहुल निंबाळकर यांनी उचलला. आणि आनंद शेती उद्योग या व्यवसायाची स्थापना केली. आनंद हळद पावडर या नावाने शेतकऱ्यांच्या शेतातून थेट ग्राहकांपर्यंत पोहचवून दर्जेदार आणि ताजी हळद त्यांनी ग्राहकांना पुरविली आहे.
श्री. राहुल निंबाळकर यांनी सुरुवातीला आय.एस.ओ. सर्टीफाईड लॅबमध्ये चाचणीसाठी हळद पाठवली. आणि विविध प्रकारच्या १६ चाचण्या पूर्ण झाल्यानंतर अपेक्षेपेक्षा जास्त चांगला रिझल्ट या चाचण्यांमधून सिद्ध झाला. आपली गावरान हळद आपल्या लोकांसाठी आनंद हळद पावडर या नावाने ग्राहकांपर्यंत पोहचविण्याचा निर्णय श्री. राहुल निंबाळकर यांनी घेतला.
श्री. राहूल निंबाळकर आणि परिवार |
हळदीची डबाबंद पॅकिंग
शेतातील काढलेली हळद स्वच्छ करून ६० डिग्री तापमानामध्ये शिजवून १५ दिवस वाळविण्यात येते. मशिनमध्ये पॉलिश करून दगडी जात्यावर प्रत्येकी आठ दिवसाला ताजी हळद दळून वस्त्र गाळण करण्यात येते. पॉलिश आणि वस्त्र गाळणमुळे हळद एकसारखी बारीक होते. आणि हळदीचा रंगही उत्कृष्ट येतो. स्पेशल सायंटिफिक डिझाईन केलेल्या बॉटलमध्ये हळद भरून डबाबंद करण्यात येते.
सेलम जातीच्या तीनही प्रती एकत्र दळल्यामुळे हळदीचा क्वालिटी रिपोर्ट ३.५ ते ४.५ टक्के एवढा उच्च आढळून आला. बॉटल इंटरनॅशनल कुरिअर कंपनीतर्फे पुणे, पिंपरी चिंचवड आणि संपूर्ण महाराष्ट्रात पाच पद्धतीने सॅनिटाईज करून बॉक्स पॅकिंग करून ३००० पेक्षा जास्त बॉटल्स घरोघरी पोहोचवल्या आहेत. श्री. राहुल निंबाळकर हे महाराष्ट्राच्या सर्व भागात हळद पाठवतात. घरगुती पद्धतीच्या सेलम जातीच्या हळदीला पुणे व इतर शहरात अल्पावधीत खूप चांगला प्रतिसाद मिळाला. ही हळद एक किलोच्या बरणीमध्ये उपलब्ध आहे.
हळद पावडरची पॅकिंग |
हळद पावडरची होम डिलीव्हरी
आनंद हळद पावडरची होम डिलीव्हरी करीत असताना स्वच्छतेचीही काळजी घेण्यात येते. पाच प्रकारे हळद डबाबंद करीत असताना सॅनीटाईज करण्यात येत असून कामगारांसाठी मास्क आणि हॅण्डग्लोव्हचा कटाक्षाने वापर करण्यात येतो. ग्राहकांना कुरिअर करतांना सॅनीटाईज करूनच पार्सल पाठवण्यात येते.
प्रत्येक शनिवारी नवीन हळदीची बॅच तयार करण्यात येत असल्यामुळे ग्राहकांना ८ दिवसात तयार झालेली ताजी हळद पावडर मिळते. आणि हळदीची गुणवत्ताही इतर हळद पावडरपेक्षा अधिक दर्जेदार आहेत. सध्यस्थितीत कोरोनासारख्या महामारीच्या काळात आपली रोगप्रतिकारकशक्ती वाढविणे खूपच गरजेचे असताना आनंद हळद पावडर लोकांसाठी वरदान ठरत आहे.
कांदा लसूण मसाला आणि लाल मिरची पावडर ही इतर उत्पादनेही ग्राहकांच्या चांगलीच पसंतीस उतरली असून आनंद शेती उद्योगाच्या सर्वच उत्पादनांना ग्राहकाकडून भरघोस प्रतिसाद मिळत असून मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा