name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग Perfume industry from flowers

फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग Perfume industry from flowers

फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मिती उद्योग 

Perfume industry from flowers

      अनेक प्रकारच्या शोभिवंत फुलांचा उपयोग फुलदाणीत ठेवण्यासाठी, धार्मिक विधीसाठी, हार-तुरे, लग्न मंडपी डेकोरेशन करण्यासाठी होतो. परंतु याव्यतिरिक्त या फुलांपासून सुगंधी द्रव्यांची निर्मिती केली जाते. अशा प्रकारची निर्मिती प्रामुख्याने गुलाब, निशिगंध, जाईवर्गीय फुले, कमळ आदी फुलांपासून होते. 


) गुलाब - 

  • गुलाबाच्या फुलांचा उपयोग हा प्राचीन काळापासून सुगंधी द्रव्ये तयार करण्यासाठी केला जातो. यासाठी काही सुवासिक जातींचाच उपयोग सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी केला जातो. 

  • आधुनिक गुलाबाच्या जातींमध्ये हायब्रीड टी या प्रकारातील अव्होन, ऑक्लोहोमा, क्रिमसन, ग्लोरी, अमेकिन होम, मि.लिंकन, क्रायस्लर, एअर फेस, फेंन्टासिया, रॉयल हायनेस इ. जातीच्या फुलांपासून गुलाब पाणी तयार करता येते.

गुलाबापासून विविध द्रव्ये बनवण्यासाठी स्टिम डिस्टीलेशन
  • गुलाबापासून गुलाब पाणी आणि तेल, अत्तर तयार करण्यासाठी स्टिम डिस्टीलेशन पद्धतीचा वापर केला जातो. 
  • या पद्धतीमध्ये तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरून त्यात गुलाब फुले टाकतात. चांगल्या प्रतीचे गुलाबपाणी तयार करण्यासाठी पाण्याचे वजन फुलांच्या वजनाच्या दुप्पट असावे. या भांड्याच्या तोंडाला वाकडी व निमुळत्या आकाराची नळी बसवली असते. तसेच या नळीभोवती थंड पाणी फिरवून वाफेचे द्रवात रूपांतर करण्याची सोय केलेली असते. 
  • भांड्यातील पाण्याचे वाफेत रूपांतर करून ती वाफ पुन्हा थंड करून नळीच्या दुसऱ्या टोकाला असणाऱ्या एका काचेच्या भांड्यामध्ये द्रवरूपात गोळा करतात. यास गुलाबपाणी अथवा गुलाबजल असे म्हणतात. 
  • हे गुलाबपाणी नंतर एका मातीच्या किंवा धातूच्या पसरट भांड्यात भरतात. आणि भांडे मलमलच्या कापडाने झाकून थंड हवेत ठेवतात. थंडाव्यामुळे गुलाब तेल घट्ट होते. आणि पाण्यावर तरंगणारे तेल नंतर अलगद काढून काचेच्या बाटल्यात साठवले जाते. 
  • काही वेळा गुलाब फुलातील सुगंधी द्रवयुक्त अशी वाफ चंदनाच्या तेलामध्ये शोषून घेऊन गुलाबाचे अत्तर तयार केले जाते. 
  • एक किलो गुलाबाचे तेल मिळवण्यासाठी  ७ ते ८००० किलो गुलाबाची फुले लागतात. 
गुलाब तेलाचा उपयोग 
  • गुलाब तेलाचा उपयोग पेय, खाद्यपदार्थ, केश तेलामध्ये तसेच फेस पावडर, अगरबत्ती इत्यादींना सुगंध आणण्यासाठी करतात.
  • चांगल्या प्रतीच्या गुलाब तेलाच्या निर्मितीसाठी गुलाब फुलांची सकाळी भल्या पहाटे सूर्यदयापूर्वी काढणी करावी. 
  • गुलाब तेलामध्ये मुख्यत्वे एल- सिट्रीनेऑल (४० ते ६५ टक्के), जिरेनिओल,नेरोल, एल- बिनालुल, फिनाईन इथाईल, अल्कोहोल, अल्प प्रमाणात ईस्टर्स, नोनील, अलडीहाईड, सिट्रोल, उजेनोल, सेस्वीपिर्टिन आणि स्ट्रेरोप्टेनचे मेणवर्गीय घटक इ. सुगंधीत द्रव्ये असतात. 


गुलकंद
  • गुलाब पाकळ्या आणि सफेद साखर वजनाने सारख्या प्रमाणात चांगल्या प्रकारे मिसळून गुलकंद तयार करता येतो. 
  • गुलकंद चांगला मुरल्यानंतर त्याचा आस्वाद घ्यावा. गुलकंद हा पौष्टिक पदार्थ असून तो पाचकही आहे.
  • गुलाबाच्या वाळलेल्या पाकळ्या म्हणजे पंखुरी. या पाकळ्याचा उपयोग उन्हाळ्यात थंड रुचकर पेय तयार करण्यासाठी केला जातो. 
गुलरोधन हेअर ऑईल
  • गुलाबापासून गुलरोधन हेअर ऑईल हा पदार्थ सुधारित एन्लुरोज पद्धतीने केला जातो. 
  • या पद्धतीने गुलाबाच्या पाकळ्या आणि सफेद तीळ यांचे थर दिले जातात. त्यामुळे तिळामध्ये गुलाब पाकळ्यातील सुगंधीत द्रव्ये शोषली जातात. 
  • प्रत्येक दिवशी वापरलेल्या पाकळ्या काढून नवीन पाकळ्या वापरतात. गुलाबाच्या सुगंधीत द्रव्यांने तीळ संपृक्त झालेल्या तिळापासून घाणीच्या साह्याने तेल काढतात. या तेलाला "गुलरोधन हेअर ऑईल" असेही म्हणतात. 

२) चाफा व सुरंगी - 

  • पिवळ्या चाफ्याच्या फुलांपासून देखील सुगंधी द्रव्य निर्मिती होते. फुलांमध्ये ०.६ ते ०.७ टक्के सुगंधी तेल असते. 

  • कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरंगीची झाडे आढळतात. सुरंगीच्या फिकट पिवळसर, सुवासिक फुलांपासून सुगंधी तेल तयार करतात. 

३) निशिगंध- 

  • निशिगंधापासून सुगंधी तेल काढण्यासाठी सोलव्हंट एक्स्ट्रक्सन पद्धतीचा वापर करतात. 

  • यासाठी प्रामुख्याने निशिगंधाच्या अधिक सुवासिक सिंगल जातीची निवड केली जाते. तर डबल जातीच्या फुलदांड्याचा कट फ्लावर म्हणून उपयोग केला जातो.

  • निशिगंधापासून साधारणपणे हेक्टरी ५० ते ६५ क्विंटल ताजी फुले मिळतात आणि त्यापासून सुमारे ५ ते ७ ट्युबरोझ काँक्रिट मिळू शकते. 

४)कमळ- 

  • कमळ हे शोभिवंत फुल आहे. त्यापासून कमळ पुष्प आणि त्याच्या झाडापासून आणि खाद्यपदार्थ तयार केले जातात.  

  • कमळाची कोवळी पाने, पानांचे देठ व फुले यांच्यापासून भाजी करतात.

  • कमळ पानाच्या देठाचा उपयोग मिश्रण लोणच्यात करतात. तसेच देठापासून पिवळसर सफेद तंतूंची (धाग्यांची) निर्मिती करण्यात येते.

  • कमळ फुलांपासून अत्तराची निर्मिती करण्यात येते. 

५) कॅनांगा/ प्लांग प्लांग- 

  • कॅनंगा ओडोरांटा नावाच्या वृक्षाच्या फुलांपासून कॅनंगा तेल अथवा प्लांग प्लांग तेल तयार करतात. 

  • या वृक्षाचे मुळस्थान फिलीपाईन्स असून त्यास प्लांग प्लांग असे संबोधले जाते. तर जावामध्ये या वृक्षास कॅनंगा म्हणून ओळखले जाते. 

  • प्लांग प्लांग तेलास चांगली मागणी असून उच्च प्रतीच्या सुगंधात या तेलाचा वापर करतात. 

६) झेंडू- 

  • झेंडूच्या फुलात सुगंधीत तेल असते. त्याचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात. 

  • झेंडूच्या झाडाच्या सर्वच भागात सुगंधित तेल असते. ते वाफेवर चालणाऱ्या उर्ध्वपातीत यंत्राच्या साह्याने काढले जाते. 

  • हे तेल अतिशय सुगंधित असते. टॅगेसेस सिग्नटा या झेंडू स्पेसीजच्या फुलांमध्ये सुगंधीत तेलाचे प्रमाण जास्त म्हणजे ४.५ टक्के असते. याचा उपयोग अत्तर तयार करण्यासाठी करतात. 

७) जाई/जुई/मोगरा- 

  • जाई,जुई,मोगरा या फुलांना विशिष्ट असा सुगंध आहे. या सुगंधाचे वेगळेपण म्हणजे कोणत्याही अन्य कृत्रिम सुगंध किंवा नैसर्गिक सुगंधाने जाई,जुई, मोगरा यांचा सुगंध निर्माण करता येत नाही.

  • जाई,जुई,मोगरा यांच्या फुलांपासून अत्तर तयार करतात. त्यासाठी जस्मिनम ग्रंडीफ्लोरा (स्पॅनिश जस्मिन) या स्पेशिजमध्ये पुष्प पाकळ्यांच्या खालच्या बाजूला तांबूस रेषा असलेल्या जातीची फुले अत्तरे तयार करण्यासाठी वापरतात.

     अशा प्रकारे तरुणांना फुलांपासून सुगंधी द्रव्य निर्मितीसाठी भरपूर वाव आहे आणि हा उद्योग ग्रामीण भागात भरपूर जोर धरेल यात शंका नाही.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...