रानवांगीची लागवड ते उत्पादन
Cultivation to production of wild brinjal
रानवांगी ही वनस्पती औषधांमध्ये वापरतात म्हणून महत्त्वाची आहे. या वनस्पतीची लागवड हळूहळू महाराष्ट्रात व भारतात निरनिराळ्या राज्यात सुरू झाली आहे. ही वनस्पती "स्टेरॉईड" समृद्ध आहे.
वनस्पतीचा परिचय :
रानवांगी ही सोलेनेसी या कुळातील असून सोलासोडीन स्टेरॉईडने समृद्ध असणारी महत्त्वाची वनस्पती आहे.
याचे शास्त्रीय नाव सोलेनम खाखियानम आहे.
या पिकामध्ये शंभर प्रजाती आहेत. यामधील काही प्रजातीमध्ये ग्लायकोअल्कालाईड व सोलेसोडीन ही द्रव्ये आढळतात.
रानवांगी ही झुडुपवर्गीय वनस्पती ०.७५ ते १.५० मीटर उंच वाढते.
हिची पाने नेहमीच्या वांग्याच्या पानांसारखीच असतात. पानांच्या बगलेत पांढऱ्या रंगाच्या फुलांचे गुच्छ येतात.
पुनर्लागवडीनंतर साधारणतः ५५ ते ६५ दिवसांनी फुले येतात.
फळे २ ते २.५ सें.मी. व्यासाची गोलाकार असतात. त्यांचा रंग हिरवट असतो व त्यावर पांढरे ठिपके असतात.
फळे पिकल्यावर गर्द पिवळी होतात. फळे फोडल्यावर त्यातून चिकट बी निघते.
औषधी गुणधर्म व उपयोग :
या वनस्पतीमध्ये स्टिराइड जातीचे मूलद्रव्य असते.
त्यापासून डी.पी.ए. नावाचे मूलभूत औषधी रसायन मिळते. त्यापासून कुटुंबनियोजनाची औषधे बनतात.
हवामान :
समशीतोष्ण व उष्ण हवामानात हे पीक चांगले उत्पन्न देते.
२० ते ३५ अंश से. या हवामानात हे पीक चांगले येते.
जमीन :
मध्यम ते भारी काळी जमीन तसेच पाण्याचा निचरा होणारी जमीन या पिकास मानवते. व पीक चांगले येते.
रोपे तयार करणे :
साधारणत: एप्रिल व मे महिन्यात रोपासाठी बी गादीवाफ्यावर ओळीत टाकावे
दोन महिन्यात रोपे लागवडीसाठी तयार होतात.
त्याची निगा इतर पिकाच्या रोपाप्रमाणे करावी. त्याचप्रमाणे रासायनिक खत घालून रोपे तयार करावीत.
लागवड :
एक ते दोन पाऊस झाल्यावर नांगरट करावी.
एक ते दोन कुळवाच्या पाळ्या द्याव्यात.
हेक्टरी दहा ते वीस बैलगाड्या शेणखत घालावे. व लागवड सरीवरंब्यावर ७५ ते ९० × ४५ ते ६० सें.मी. अंतरावर करावी व लगेच पाणी द्यावे.
खते
लागवडीच्या वेळी ५०:५०:५० किलो नत्र, स्फुरद व पालाश द्यावे
लागवडीनंतर महिन्याने पीक फुलोऱ्यात असताना ६० किलो नत्राचा दुसरा हप्ता द्यावा.
लागवडीनंतर ८ ते १२ दिवसाचे अंतराने पाणी द्यावे.
दोन खुरपण्या एक महिन्यानंतर पहिली व दोन महिन्यानंतर दुसरी खुरपणी करावी.
रोग व कीड :
या पिकावर रोग व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत नाही परंतु भुरी, मर रोग, मावा, पाने खाणारी अळी केव्हा केव्हा दिसून येतात.
मर हा रोग बुरशीपासून होतो. बियास ट्रायकोडर्माची बीजप्रक्रिया करावी.
तसेच रोपवाटिकेत कॉपर ऑक्सिक्लोराईड २ ग्रॅम १ लिटर पाणी या प्रमाणात झारीने टाकावे.
मावा व किडी खाणारी अळीच्या नियंत्रणासाठी नुवाक्रोन १० मिली. १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची काढणी :
फळांचा रंग पिवळा होताच तोडणी करावी. पहिली तोडणी १८० दिवसांनी व दुसरी तोडणी त्यानंतर २ महिन्यांनी करावी.
फळे खळ्यात पातळ थर् देऊन वाळवावीत. म्हणजे त्यास बुरशी लागणार नाही व फळे काळी पडणार नाहीत.
उत्पादन :
वाळलेल्या फळांचे उत्पादन प्रति हेक्टरी ६० ते ७० क्विंटल येथे. साधारणत: भाव ८०० ते १००० रु. प्रति क्विंटल मिळतो.
हेक्टरी उत्पन्न ५० ते ६० हजार मिळते. लागवडीचा खर्च १५,००० होतो तर नफा ४० ते ५० हजारपर्यंत मिळतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा