name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान (Grape production Technology)

द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान (Grape production Technology)

द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान 

(Grape production Technology)

द्राक्ष उत्पादन

    भारत देशात फळपिकांपैकी द्राक्षपीक हे निर्यातीतून मिळत असलेल्या परकीय चलनामुळे जास्त लोकप्रिय होत आहे. देशात द्राक्ष पिकाच्या लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. जवळपास ६० ते ७० टक्के क्षेत्र महाराष्ट्रात आहे. राज्यातील नाशिक, सांगली, सोलापूर व पुणे या जिल्ह्यांमध्ये द्राक्ष लागवड प्रामुख्याने होते. याचबरोबर विदर्भाच्या काही भागातसुद्धा ही लागवड वाढत आहे. 

निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन

     जागतिक पातळीवर निरीक्षण केले असता चांगल्या प्रतीचे द्राक्ष निर्माण करण्यामध्ये भारताचे नाव सर्वप्रथम आहे. तरीसुद्धा निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी शेतकरीबंधूंना निरनिराळ्या समस्यांना सामोरे जावे लागते. व त्याचा परिणाम निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करण्यासाठी होत असतो. द्राक्षाचे उत्पन्न अजूनही पारंपारिक पद्धतीने होत असल्यामुळे चांगल्या प्रतीचे उत्पन्न मिळत नाही. याचा परिणाम आर्थिक घटकांवर होतो व द्राक्षबागेचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळते. म्हणून आपल्या शेतीमध्ये विज्ञान तंत्रज्ञानाच्या साह्याने निरनिराळे प्रयोग केल्यास आपल्याला चांगल्या दर्जाचे निर्यातक्षम उत्पन्न मिळू शकेल. इस्राईल, कॅलिफोर्निया यासारख्या देशांमध्ये द्राक्ष लागवडीसाठी निरनिराळ्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जातो व चांगले निर्यातक्षम दर्जाचे उत्पन्न काढले जाते. 

नाशिक : ग्रेप्स कॅपिटल



      भारतामध्ये सुरुवातीला खाण्याची द्राक्ष व बेदाणे निर्मितीच्या द्राक्षजातीची लागवड करत होते परंतु यामध्ये नव्याने सुरू झालेल्या मद्य(वाईन) निर्मितीच्या द्राक्षाची लागवड भारतात सुरू झाली व त्याखालील क्षेत्र दिवसेंदिवस झपाट्याने वाढले. महाराष्ट्रातील नाशिक हे "ग्रेप्स कॅपिटल" म्हणून ओळखले जाते. कारण नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष लागवड फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते. तसेच वायनरी प्रकल्पामुळे वाईन ग्रेप्सच्या लागवडीलाही नवीन दिशा मिळाली आहे.

    नाशिक जिल्ह्याचा भौगोलिक बाबीचा विचार केला असता द्राक्ष लागवडीसाठी उपयुक्त अशी जमीन, तापमान, वातावरण असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड केली जाते. नाशिकच्या द्राक्षपिकाने जागतिक बाजारपेठेत महत्त्वाचे स्थान निर्माण केले आहे. हंगाम कोणताही असो, आज बाजारात द्राक्ष मिळतात. मात्र ताजी द्राक्षे जे जेमतेम तीन-चार महिनेच असतात. अनेक औषधी गुणधर्म असणाऱ्या द्राक्षाच्या अनेक जाती आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने द्राक्षाची लागवड केली जाते. द्राक्ष अतिशय नाजूक पीक आहे. मात्र जानेवारी ते एप्रिल या तीन-चार महिन्यातच मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. अनेक व्याधी हटवणारी आणि आरोग्यास अतिशय हितकारक म्हणून द्राक्षाकडे पाहिले जाते. त्यामुळे द्राक्षाला अमृतफळ म्हटले जाते. 

द्राक्षाचा वापर



         




    द्राक्ष लागवडीमध्ये निर्यातक्षम प्रतीचे उत्पादन जर आपण वाढवू शकलो तर प्रति हेक्टरी नफा जास्त मिळू शकेल. याकरीता हे पीक कसे आहे. याचा अभ्यास करून आधी समजून घेणे नवीन द्राक्ष बागायतदारांकरीता फारच महत्त्वाचे आहे. सध्या भारतात ४५ हजार हेक्टरपेक्षाही जास्त क्षेत्र लागवडीखाली आहे. देशांतर्गत तसेच निर्यातक्षम ताजी द्राक्ष, बेदाणे यांच्या रूपात खूप मोठ्या प्रमाणात द्राक्षाचा वापर केला जातो. भारतीय फलोत्पादन संशोधन  संस्था (बंगळूर) येथे द्राक्षावर मोठया प्रमाणात संशोधन केले जाते.

द्राक्ष लागवडीपूर्वी सखोल ज्ञान आवश्यक 

        द्राक्ष लागवडीपूर्वी जमीन व पाण्याचे परीक्षण करून घेणे, चांगल्या द्राक्ष जातीची लागवडीसाठी निवड करणे, त्यात द्राक्षाच्या विविध जाती आहेत. बिया असणारी आणि बिया नसणारी असे वर्गीकरण द्राक्षाबाबत केले जाते. सध्या बंगलोर पर्पल, बंगलोर ब्लू, बल्क मारू, अनाबेशाही या बिया असणाऱ्या जाती आहेत. तर थॉम्पसन, सोनालिका माणिक चमन, फ्लेम सिडलेस, तास ए गणेश या बिनबियाच्या जाती आहेत. यातील फ्लेम आणि शरद या काळ्या रंगाच्या जाती आहेत. द्राक्षाला अन्नद्रव्याचा पुरवठा, खरड छाटणी व फळ छाटणी व त्यानंतर वेगवेगळ्या वाढीच्या अवस्था व या अवस्थांमध्ये अन्नद्रव्याचा व पाण्याचा योग्य पुरवठा करणे, संजीवकांचा व खतांचा योग्य वापर करणे या गोष्टींचे सखोल ज्ञान असणे अतिशय महत्त्वाचे आहे. 



   




    नवीन बागायतदारांसाठी द्राक्ष लागवडीची करायची तयारी असते. परंतु त्याला मिळणारे मार्गदर्शन कसे मिळेल हा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. या गोष्टीचा विचार करून बागायतदारांच्या द्राक्षपिकाच्या संदर्भात आवश्यक ती माहिती मिळावी व योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी प्रयत्न केले आहे. द्राक्षशेतीमध्ये नवीन द्राक्ष लागवड, कलम करणे, रिकट घेऊन ओलांडे तयार करून मालकाडी तयार करणे, जुन्या बागेतील खरड छाटणी तसेच फळ छाटणी व प्रत्येक अवस्थेत कामाची कार्यवाही कशी असावी याबद्दलची माहिती द्राक्ष बागायतदारांनी जाणून घेणे गरजेची आहे.    

  द्राक्ष रोपांची चांगली वाढ होईपर्यंत अतिशय काळजीपूर्वक पाणी व औषधांची फवारणी करावी लागते. डोळे बाविसाव्या दिवशी फुटू लागतात. त्यानंतर त्यांना खते द्यावी लागतात. नव्या फुटव्यांनाही आधार देत संपूर्ण बागेची बांधणी करावी लागते. यामुळे रोपांना वळण मिळते. तसेच हवी तसे ओलांडे तयार करता येतात. यामध्ये फांद्यांच्या दोन्ही बाजूला ओलांडे घेता येतात. "एच" पद्धतीने ओलांडे तयार करून त्याच्यावर फळकाडी तयार केली जाते.    

    एका ओलांड्यावर एका बाजूस १० ते १२ फळकाडी तयार होतात. त्याला वेळोवेळी शेंडा मारून हवे तसे वळण देता येते. अशा प्रकारे महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, नाशिक, नारायणगाव, कोल्हापूर परिसरात खूप मोठ्या प्रमाणावर द्राक्ष लागवड केली जाते. अजूनही हे क्षेत्र झपाट्याने वाढते आहे. त्याचबरोबर द्राक्षाला मागणी खूप मोठ्या प्रमाणात आहे. द्राक्ष निर्यातीला खूप वाव आहे. 

मनुष्यबळ उपलब्धता

         द्राक्षबागेत मनुष्यबळ उपलब्धता हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे कारण द्राक्षामध्ये बरीच कामे हातानेच करावी लागतात. छाटणी, विस्तार व्यवस्थापन, घडांची विरळणी, बुडवणी तसेच फवारणी व तणनियंत्रणामध्ये मजुरांची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असते. त्यामुळे बाग उभी करताना नजीकच्या परिसरात या प्रकारचे मनुष्यबळ उपलब्ध होण्याची शाश्वती असावी. 

    बाग असलेल्या भागात रस्ते, दळणवळण आणि कोल्डस्टोरेजच्या सोयी व्यवस्थित आहेत की नाही हे बघणे महत्त्वाचे आहे.  द्राक्ष रस, वाईन आणि बेदाणे निर्मितीसाठी द्राक्ष लागवड करताना या बाबींकडे विशेष लक्ष द्यावे लागते. या सुविधा या सुविधा असल्यास बाजारात जास्त माल असला तरी शेतकरी सुरक्षित साठवणूक करून योग्य त्यावेळी, योग्य त्या ठिकाणी माल पाठवू शकतात.

लागवडीआधी महत्त्वाच्या गोष्टी 



      





    द्राक्ष ही जगातील उबदार समशीतोष्ण पट्टयातील स्थानिक वनस्पती आहे. व द्राक्ष लागवड उत्तर व दक्षिण ३४ अंश से. ते ४९ अंश से. या अक्षवृत्तात सर्वाधिक यशस्वी ठरते. दोन्ही गोलार्धात द्राक्षांची अगदी यशस्वीपणे लागवड केली जाते. द्राक्ष लागवड यशस्वी होण्यासाठी लागवडीआधीच शेतकऱ्यांनी अनेक महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजे. त्यांनी प्रत्येक भागातील पर्यावरण व द्राक्षाच्या विविध जातीच्या वाढीसाठी पोषक असे वातावरण यांचा एकत्रित परिणाम उत्पादनावर होतो. 

   सूक्ष्म वाटणारे जमीन आणि हवामानातील बदलसुद्धा एखाद्या विशिष्ट जातीचे उत्पादन यशस्वी किंवा अयशस्वी होण्यास कारणीभूत ठरतात. म्हणूनच हैदराबादमधील अनाब ए शाही, बंगलोर ब्लू, मदुराईमधील गुलाबी तसेच महाराष्ट्राच्या पठारी प्रदेशातील थॉमसन सिडलेस या जातीचे उत्पादन हे वैशिष्ट्यपूर्ण असून तसेच उत्पादन दुसरीकडे घेता येत नाही. त्यामुळे यशस्वी द्राक्ष लागवड ही आपल्या भागाशी सुसंगत अशा जातीची निवड करण्यावर अवलंबून आहे. त्याचबरोबर मातीची परिस्थिती, पाण्याची उपलब्धता व दर्जा या मुद्द्यांवरही आपण विचार करायला हवा. द्राक्षबाग उभारणीमध्ये हवामानाच्या परिस्थितीची महत्त्वाची भूमिका असते. 

हवामान आणि मातीचा विचार 



     





हवामान आणि माती या गोष्टींचा विचार द्राक्षबागेसाठी जागा निवडण्याच्या आधी केला पाहिजे. द्राक्षपिकासाठी आवश्यक त्या हवामानाचा विचार करून आपण लागवडीसाठी लागणारे भौगोलिक स्थान (उदा. गाव, तालुका इ.) निश्चित करतो. पिकासाठी आवश्यक त्या मातीचा गुणधर्म प्रत्यक्ष मळ्यासाठी जागा निवडताना विचारात घेतला पाहिजे. जमिनीची निवड करताना भारी, गाळाची, अति उथळ तसेच कमी निचऱ्याच्या जमिनी व ज्या जमिनीत क्षारांचे व आम्ल धातूंचे, बोरॉन व इतर विखार ठरणारे घटक आहेत अशा जमिनी द्राक्ष लागवडीसाठी वगळल्या पाहिजे. जमिनीची निवड करताना आपण विविध बाबींचा विचार करायला हवा. 

     हवामानाचा उपयोग ढोबळमानाने जागा निवडण्यासाठी होतो. परंतु मळ्यासाठी जमिनीची निवड करताना मातीच्या गुणधर्माचा उपयोग होतो. हलक्या, मुरमाड जमिनीपासून ते काळ्या कसदार आणि खोल जमिनीमध्ये द्राक्ष लागवड केली जाऊ शकते. तरीही मध्यम खोल, उत्तम जलनिस्सारण आणि कमी क्षार असलेल्या जमिनीत द्राक्षाचे पीक उत्तम येते. 

जमिनीच्या पोताचा विचार



       





    मातीचा पोत, घडण, खोलीथर, क्षमता आणि कस हे रासायनिक गुणधर्म जागेची निवड करताना विचारात घ्यावे. जमिनीची निवड करताना सर्वप्रथम पोताचा विचार व्हावा. कारण हवा, पाणी धरून ठेवण्याची क्षमता, निरा आणि पाणी जमिनीत जिरण्याची क्रिया पोतावर अवलंबून असते. मातीतील वाळू, चिकनमातीच्या कणांचे प्रमाण जमिनीचा पोत ठरवतो. 

    वाळूच्या कणांचे प्रमाण जास्त असल्यास माती अधिक सछिद्र राहून पाण्याचा निचरा होतो आणि मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे बागेला वरचेवर पाणी द्यावे लागते. अशा परिस्थितीत ठिबक सिंचन पद्धत वापरत असल्यास ओलावा मातीत आडवा न फैलावता उभा फैलावतो. या पद्धतीत ठिबकच्या तोट्या जास्त वापराव्या लागतात. 

   मातीमध्ये सूक्ष्म कणांचे प्रमाण जास्त असल्यास हे कण एकमेकात घट्ट बसल्याने पाणी शिरावयास जागा राहत नाही आणि पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी होते. मातीतील चिकन मातीतील प्रमाणाबरोबर संबंधित खनिजांचे प्रमाण ठरविते. थोडक्यात काय तर द्राक्षबागेला हलकी, मुरुमाची व उत्तम निचरा असणारी जमीन चांगली समजली जाते. मात्र काळ्या खोल जमिनीत कुजलेले शेणखत व मुरूम टाकून योग्य निचरा निर्माण करून द्राक्षाचे चांगले पीक घेता येते. 

© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com

#द्राक्षउत्पादनतंत्रज्ञान #द्राक्षलागवड 

#निर्यातक्षमद्राक्षउत्पादन

#grapescapital #draksh 

No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...