रोजगार निर्मितीची प्रचंड ताकद देणारा व्यवसाय : रेशीम उद्योग
Industry with huge employment generation potential: Silk industry
आपली भारतीय संस्कृती विविधतेने नटलेली आहे. रोजगार, चरितार्थासाठी भारतात अनेक तऱ्हेचे व्यवसाय केले जातात. शेती आधारीत अनेक व्यवसायही केले जातात. त्यात रेशीम उद्योगही गणला जातो.
रेशीम शेतीचा विचार : काळाची गरज
अर्थशास्त्रज्ञ म्हणतात व्यापारी लोकांमुळे देश चालतो पण लॉकडाऊनमुळे कळलं की शेतात नांगर चालतो तेव्हा देश चालतो. त्यामुळे शेतकरीबांधवांनी शेतीपूरक व्यवसायाकडे आज वळणे गरजेचे आहे. आजकाल पाऊस बेभरवशाचा झाला आहे. शेती व्यवसायात नुकसान झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात आत्महत्या केली. तेव्हा शेतीपूरक व्यवसाय करणे हे शेतकरीबंधूसाठी गरजेचे आहे.
निसर्गाचा लहरीपणा व बेभरवशाची बाजारपेठ असे प्रश्न आहेत तेव्हा उत्पन्नाची शाश्वती असणारा आणि सध्याच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्याची क्षमता असणारा एकमेव उद्योग म्हणजे रेशीम उद्योग आहे. म्हणूनच शेतकऱ्यांनी रेशीम शेतीचा विचार करणे ही काळाची गरज बनली आहे. रेशीम शेती हा कमी भांडवलावर सुरू करता येण्याजोगा कुटीर उद्योग आहे. म्हणून तर म्हटलं जातं.
सिल्क आणि मिल्क असे दोन्ही जोडधंदे शेतकऱ्यांनी केले तर त्यांची आर्थिक उन्नती निश्चितच आहे. रेशीम उद्योगात जागतिक पातळीवर चीनची आघाडी आहे. त्यांच्याकडून भारत रेशमी धागा आयात करतो. अशा परिस्थितीत आपल्या देशात याचे उत्पादन वाढवून आपली गरज भागवण्यासोबत अन्य देशांना देखील मागणीप्रमाणे रेशीमधागे पुरवण्याची संधी आपल्या हातात आहे.
रेशीम शेतीला प्रोत्साहन
देणारे आपले राज्य
कर्नाटक,तामिळनाडू या राज्यांमध्ये रेशीम उद्योग जास्त प्रमाणात विकसित झाला आहे. तेथे महिला आपल्या अंगणामध्ये तूतीची किती झाडे वाढवतात आणि घरातच एखाद्या कोपऱ्यात स्टॅन्ड ठेवून त्यावर आळ्याना वाढवतात व प्रत्येक महिन्याला अतिरिक्त उत्पन्न मिळवतात.
रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी अग्रेसर असलेले पहिले राज्य म्हणजे आपला महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती व हवामान रेशीम शेती उद्योगास अत्यंत अनुकूल आहे. रेशीम शेती हा एक पूरक उद्योग म्हणून पुढील बाबी विचारात घेता शेतकऱ्यास एक वरदान ठरणार आहे. महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणात तुती लागवडीचे क्षेत्र वाढलेले आहे. रोजगाराची प्रचंड संधी या उद्योगामुळे ग्रामीण भागात निर्माण झाली आहे.
रेशीम शेती उद्योगच का ?
पाण्याचा निचरा होणाऱ्या कोणत्याही जमिनीच्या प्रकारात तुती लागवड करून रेशीम उद्योगाची सुरुवात करता येते. मात्र चांगल्या जमीनीत उत्पादन जास्त येते.
एकदा तुतीची लागवड केल्यानंतर तुतीपाल्याचे कीटक संगोपनात दहा ते पंधरा वर्षापर्यंत उपयोग होत असल्याने दरवर्षी याचा लागवड खर्च पुन्हा पुन्हा करावा लागत नाही.
अल्प भांडवलाची गुंतवणूक करून मासिक पगारासारखा उत्पन्न मिळून देणारा हा उद्योग आहे
या उद्योगांमध्ये घरातील वृद्ध, लहान मुले, स्त्रिया, अपंग व्यक्ती देखील आपला सहभाग देऊ शकतात. त्यामुळे कीटक व संगोपनाचे काम घरच्या घरी करू शकतात. मजुरांची आवश्यकता नसते.
इतर बागायती पिकापेक्षा तुतीबाग जोपासण्याकरीता१/३ पाणी लागते.
कच्चा मालाची उपलब्धता याची शाश्वती व तयार होणाऱ्या पक्का मालाच्या खरेदीची हमी असणारा हा एकमेव उद्योग आहे.
एक एकर तुती लागवड वरती संगोपनाच्या वेळी कीटकांनी खाऊन शिल्लक राहिलेला पाला, फांद्या आणि विष्ठा यावर दोन दुभत्या जनावरांच्या दुधाचे वाढीस खाद्य म्हणून उपयोग होऊ शकतो.
रेशीम किटकाच्या विष्ठेचा उपयोग बायोगॅससाठी केला जाऊ शकतो.
एक एकर रेशीम शेती उद्योगापासून वार्षिक रुपये चाळीस ते पन्नास हजार रुपये मिळू शकतात.
रेशीम शेती उद्योग ग्रामीण भागात प्रत्यक्ष व प्रत्यक्षरीत्या रोजगार उपलब्ध होत असल्याने शहराकडे होणारे स्थलांतर रोखण्यात आपोआपच मदत होते.
तुतीकोष शासनामार्फत खरेदी
रेशीम शेती उद्योगातील निर्मित कोषापासून रेशीम धागा व त्यापासून वस्त्र तयार करतात. महाराष्ट्रातील विदर्भामध्ये गडचिरोली, भंडारा, गोंदिया व चंद्रपूर या चार जिल्ह्यात जंगलातील अर्जुन वृक्षावर "टसर" रेशीम उद्योगालाही प्रचंड भाव आहे. रेशीम उद्योगच का? खरच तो फायदेशीर आहे का? असे प्रश्न तुम्हाला पडले असतील त्याचे कारणेही तशीच आहेत.
रेशीम उद्योगासाठी एकदा लागवड केल्यानंतर ते पंधरा वर्षे जगत असल्याकारणाने दरवर्षी लागवड करावी लागत नाही. त्यामुळे इतर पिकांच्या तुलनेत लागवड खर्च कमी येतो. जास्त उन्हाळ्याच्या काळात पाणी दिले नाहीत तरी तुती मरत नाही ज्याप्रमाणे आपण नारळाला कल्पवृक्ष म्हणून संबोधतो त्याचप्रमाणे तुतीला देखील कल्पवृक्ष म्हणजे वावगे ठरणार नाही.
रेशमी आळ्याची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास याप्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. वाळलेला पाळा व विष्टेचा गोबर गॅसमध्ये उपयोग करून उत्तम गॅस मिळतो. संगोपनात वापरून राहिलेल्या पाल्याचा चोथा करून अळंबीची लागवड करता येते. त्यापासून गांडूळखत देखील तयार करता येते. सौंदर्यप्रसाधने व आयुर्वेदिक औषधांमध्ये देखील तुतीच्या पाल्याचा वापर केला जातो. विदेशात तुतीच्या पानाचा चहा व वाईन तयार करतात. तूतीच्या वाळलेल्या फांद्या इंधन म्हणून वापरता येतात. तुतीची दरवर्षी तळछाटणी करावी लागते. या छाटणीपासून मिळणारी तुतीकोष शासनामार्फत खरेदी केली जातात.
रेशीम शेतीसाठी विविध योजना
रेशीम उद्योगाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्रात वेगवेगळ्या योजना कार्यरत आहेत त्याचा फायदा शेतकरीबंधूंनी करून घ्यावा. मनरेगा योजनेअंतर्गत प्रती एकर अनुदान दिले जाते. शासनामार्फत रेशीम उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, मेळावे, चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जाते. रेशीम धाग्याची मागणी दरवर्षी २० टक्क्यांनी वाढतच आहे.
एका एकर बागेमधून वर्षाला कमीत कमी चार पिके तर जास्तीत जास्त सहा पिके घेता येतात. यावरून वर्षाला कमीत कमी एक लाख वीस हजार रुपये उत्पादन मिळते. कोषापासून धागा काढून कापड तयार करणे हा मुख्य भाग असला तरी कमी प्रतीच्या कोषापासून फुले, बुके, हार, तोरण, वालपीस या बाबी तयार करता येतात. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगला व्यवसाय म्हणून रेशीम उद्योग व्यवसायाकडे बघितले जाते. रोजगार निर्मितीची प्रचंड ताकद रेशीम उद्योगात आहे. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या भागात तुती लागवडीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः महिलांचे योगदान ८० टक्के आहे घरातील दहा वर्षाच्या मुलापासून तर ८० वर्षाच्या आजीपर्यंत कोणीही या व्यवसायात हातभार लावू शकतो. महिलांना प्रशिक्षण देऊन कोषापासून हार, गुच्छ तयार करून रोजगार मिळवू शकतो.
रेशीम संगोपन
तुतीची लागवड करून पानांची निर्मिती करणारे मोठे शेतकरी तुतीच्या फांद्या कीटक संगोपनासाठी अथवा कीटक संगोपन केंद्रांना विक्री करून व त्याचे उत्पन्न दोघांनाही मिळू शकते. रेशीम संगोपनासाठी निरोगी अंडीपुंज तयार करून विक्री करणे, चॉकी कीटक संगोपन करणे, रेशीम कीटक संगोपन करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याची विक्री करणे, केवळ प्रौढावस्थेतील अळ्यांचे संगोपन करून कोश निर्मिती करणे, कोश खरेदी करून त्यापासून धागा गुंडाळण्याची प्रक्रिया करणे, रेशीम धाग्यापासून हातमाग व यंत्रमाग यावरून वस्त्र विणणे, रेशीम वस्त्रावर रंगाई व छपाई काम करणे, त्याच्या वस्तू तयार करणे व त्याची विक्री करणे, रेशीम निर्मितीसाठी लागणारी साधने निर्माण करणे जसे संगोपन साहित्य, प्रक्रिया साहित्याचे उत्पादन व दुरुस्ती करणे इत्यादी प्रकारचे विविध कामकाज करू शकतो. महिला बचत गट व विविध संस्थाद्वारे विविध उपक्रम यासाठी राबवण्यात येतात.
कोषाचे उत्पादन
रेशीम शेती उद्योगाची सुरुवात तुतीच्या कलमापासून किमान पाण्याची सोय असलेल्या लागवड क्षेत्रावर केली जाते. याकरिता शेतकऱ्यानी एकरी रुपये ५०० याप्रमाणे सभासद नोंदणी जिल्ह्यातील रेशीम कार्यालयात भरणा करणे गरजेचे आहे. मान्सूनच्या आगमनानंतर जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये तुतीच्या पेन्सिल आकाराच्या सहा महिने पूर्ण झालेल्या बेण्यापासून तुतीची लागवड करणे योग्य असते.
तुती लागवड योग्य जोपासल्यानंतर किमान चार महिन्यापर्यंत तुतीबाग कीटक संगोपनासाठी तयार होते. पहिल्या वर्षी एकरी तुती बागेवर ४०० अंडीपुंजाचे संगोपन करून प्रति शंभर अंडीपुंज आज किमान ५० ते ६५ किलोग्रॅम प्रमाणे २०० ते २७० किलोग्रॅम कोषाचे उत्पादन मिळू शकते. दुसऱ्या वर्षापासून खरे उत्पन्न मिळण्यास सुरुवात होते म्हणजेच १००० ते १२०० अंडीपुंज यापासून किमान ६०० ते ७०० किलोग्रॅम कोशाची उत्पादन होऊ शकते. चीन व इतर प्रगत राष्ट्रात एक एकर तुतीपासून वार्षिक १२०० किलोग्रॅमपर्यंत कोशाचे उत्पादन घेतले जाते. सध्या भरघोस कोश उत्पादन देणारे कीटकांचे विविध जाती विकसित झालेल्या आहेत.
रेशमाचे विविध प्रकार
रेशमाचे विविध प्रकार आहेत.
तुती रेशीम : तुतीचा पाला हे रेशीम अळीचे खाद्य असून या अंड्यांपासून जे रेशीम मिळते त्याला तुती रेशीम म्हणतात. जागतिक स्तरावर जवळपास ८० ते ८५ टक्के तुती रेशमाचे उत्पादन घेतले जाते. तुती रेशीम अत्यंत मुलायम असल्याने रेशमाच्या चारही प्रकारात उच्च दर्जाचे मानले जाते.
टसर रेशीम : या प्रकारात अर्जुन वृक्षाचा पाला खाद्य म्हणून दिला जातो. यापासून जे रेशीम मिळते त्याला टसर रेशीम असे म्हणतात.
मुगा रेशीम : यामध्ये सोलू झाडांचा पाला हे रेशीम अळीचे खाद्य असून या झाडांपासून जे रेशीम मिळते त्याला मुगा रेशीम असे म्हणतात. मुगा रेशीम धाग्याचा रंग निसर्गातच सोनेरी असतो.
एरी रेशीम: यामध्ये एरंडाच्या झाडाचा पाला रेशीम आळीचे खाद्य असते.
फायद्याची तुती रेशीम शेती
रेशीम शेती शेतकऱ्यांनी का करावी, तसेच त्याचे काय फायदे आहेत हे आपण बघितले. हजारो वर्षापासून जगात रेशीमबद्दलचे आकर्षण असून जागतिक तसेच देशपातळीवर रेशीमला वाढती मागणी असून पुरवठा त्या प्रमाणामध्ये नाही. देशातील रेशीम उत्पादनात महाराष्ट्राचा फक्त एक टक्के वाटा असून उद्योगवाढीस मोठा वाव आहे. आज रेशीम शेती उद्योगाच्या प्रत्येक टप्प्यावर असणारा आर्थिक फायदा प्रचंड रोजगार निर्मिती क्षमता व सरकारचा या उद्योगवाढीसाठी असणारी अनुकूल व गतिमान धोरण या सर्व कारणांमुळे राज्यातील रेशीम शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे.
शेतकऱ्यांनी तुती लागवड करून उत्पादित केलेले उत्पादन वाजवी दराने शास्त्रीय पद्धतीने खरेदी करते.ज्यामध्ये तोलाई, हमाली या प्रकारची कोणतीही आकारणी शेतकऱ्यांकडून केली जात नाही. म्हणजेच शेतकऱ्यास बाजारपेठ शोधायची गरज नाही. त्याच्या विक्रीतून पहिल्या वर्षी एकरी रुपये ४० हजार, दुसऱ्या वर्षापासून ६० हजार ते १.५ लाखापर्यंत उत्पन्न मिळते. त्यामध्ये केवळ २० टक्के खर्च होतो. व इतर राज्यात विकण्याची शेतकऱ्यास मुभा मिळते.
शासनाकडून अनुदान
शेतकरीस्तरावर शासनामार्फत प्रशिक्षण, शैक्षणिक सहली सुविधा व विनामूल्य तांत्रिक मार्गदर्शनाची सोय तसेच नाममात्र दराने अंडीपुंज पुरवठा केला जातो. याशिवाय कोषापासून धागानिर्मिती, धाग्यापासून कापड निर्मिती करण्यासाठी देखील शासनाकडून अनुदान दिले जाते.
देशांतर्गत तसेच परदेशी बाजारपेठेत रेशीमला मोठी मागणी आहे. तुतीची लागवड केल्यावर त्यापासून जवळपास पंधरा वर्षे उत्पन्न घेता येते.औषध फवारणीचा फारसा खर्च होत नाही. जमीन तयार करणे, पिकाच्या लागवडीचा वारंवार खर्च नाही. आधुनिक तुती लागवडीच्या पट्टा पद्धतीमुळे एका एकरामध्ये फक्त पंधरा गुंठे क्षेत्रात पाणी द्यावे लागते म्हणजेच पाण्याची बचत पर्यायाने मजुरांची, मजुरीची व विजेची बचत होते. तसेच आधुनिक फांदी पद्धत कीटक संगोपन यामुळे जवळपास ७० टक्के मजुरी कमी लागते. उन्हाळ्यात दोन-तीन महिने पाणी दिले नाही तरी झाडे जिवंत राहतात. आवश्यकतेनुसार इतर शेती सांभाळून हा व्यवसाय करण्यासाठी शेतकऱ्यास केव्हाही तुतीचे पीक घेता येते. आंतरमशागत बैलजोडी किंवा यंत्राने करून पैसा व वेळेची बचत होते. इतर पिकांच्या तुलनेत अत्यंत कमी भांडवल लागते. संपूर्ण वर्षात पाच ते सहा पीके ठराविक अंतराने घेता येतात. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे पूर्ण हंगाम व यशस्वी होण्याची भीती नाही.
पावसाळ्यात तुती बियाण्यांपासून उत्पन्नाची हमी असते. काही देशांमध्ये ग्रीन टी म्हणून उपयोग केला जात आहे तर पूप्यापासून बनवलेले तेल गुडघेदुखीवर उपयुक्त आहे. रेशीम धाग्याचा उपयोग विविध शस्त्रक्रियेत टाके घालण्यासाठी केला जातो. चीन, थायलंड या देशांमध्ये पूप्या हे अत्यंत आवडीचे खाद्य आहे. तुतीच्या फळापासून उच्च प्रतीची वाईननिर्मिती केली जाते. रेशीम कोषाच्या धाग्यांपासून कांजीवरम पैठणी, बनारसी शालू, पितांबर, मलमल अशी विविध वस्त्रे तयार केली जातात.
शेतकरी बांधवांनो एखादा व्यावसायिक आपला व्यवसाय आपल्या मुलाकडे सोपवताना तो जास्तीत जास्त सुविधायुक्त प्रगतशील करण्याचा प्रयत्न करतो मग आपल्यापुढे देखील हे आव्हानच आहे ना ? आपल्यापुढेदेखील आपली पुढची पिढी आहे तिच्याकडे आपण शेती सुपूर्द करणार आहोत आणि तिला आजच्या स्पर्धेच्या युगात टिकवायचे असेल तर आपण देखील एक पाऊल पुढे जाणे गरजेचे आहे म्हणूनच रेशीम उद्योग ही फक्त आत्ताच्या काळाची गरज नाही तर ती तुमच्या मुलांच्या भविष्याची सोय देखील आहे म्हणून म्हणावेसे वाटते "हे रेशमाचे धागे त्यांना त्यांचे आयुष्याचे नवीन वस्त्र सुबकरीत्या विणायला मदत करतील.
#रेशीमउद्योग #तुतीलागवड #तुतीकोष #रेशीमशेतीयोजना #silkfarming #रेशीमसंगोपन #चॉकीकीटकसंगोपन #कोषाचेउत्पादन #रेशमाचेप्रकार #तुतीरेशीमशेती #Silkindustry
© दीपक केदू अहिरे,
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment