सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान (soyabean utpadan Tantradnyan)
भारतातील तेलबियांच्या उत्पादनात भुईमूग व मोहरीनंतर सोयाबीन या पिकाचा क्रमांक लागतो. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीत धान्य पीक आहे.
प्रथिनांचा सधन स्त्रोत
सोयाबीन हा एक प्रथिनांचा सधन स्त्रोत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण सोयाबीनमध्ये प्रथिने 38 ते 41 टक्के, तेल 17 ते 19 टक्के, कर्बोदके 20.9 टक्के, खनिज 4.6% कॅल्शियम 0. 24 टक्के, फॉस्फरस 0.69 टक्के, लोह 11.5 मि. ग्रॅम तर उष्मांक 432 आहे. अशा प्रकारे सोयाबीन हा एक सुरक्षित व सकस आहार असून लहान मुले व मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी खूप चांगला पोषक आहार आहे.
सोयाबीनपासून मूल्यवर्धित पदार्थ
सोयाबीनपासून जवळजवळ 165 मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. उदा. सोया दूध, सोया बिस्किटे, सोया केक, सोया चकली असे अनेक पदार्थ तयार करता येतात. त्याच्या विविध उपयोगामुळे त्यास कामधेनू किंवा मातीतील सोने म्हणूनही संबोधले जाते. सध्या आपल्या देशात तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यात सोयाबीन पिकाचा मोठा वाटा आहे. तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन हे भारतात लागवडीसाठी एक क्रमांकाचे पीक आहे. सोयाबीन पिकामुळे देशातील सर्वच वर्गांना फायदा झाला आहे. देशात सोयाबीनवर चालणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या पिकाचे क्षेत्र आपल्या देशात व महाराष्ट्रात सातत्याने वाढतच आहे.
प्रक्रियायुक्त पदार्थाला प्रचंड मागणी
देशाला सोयाबीनपासून होणाऱ्या विविध पदार्थांच्या निर्यातीपासून वर्षाकाठी तेहत्तीस हजार कोटी रुपये मिळतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाला, प्रक्रियायुक्त पदार्थाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. तेवढी मागणी आपण पुरवू शकत नाही अशी आजची स्थिती आहे. सोयाबीनमध्ये १९ टक्के तेलाचे व 43 टक्के प्रथिनांचे प्रमाण असल्याने त्याचा तेलबिया व कडधान्य या दोन्ही पिकात समावेश होतो.
आपल्या देशात सोयाबीनची लागवड सन 1970-71 साली सुरू झाली. तर महाराष्ट्रात 1980-84 च्या दरम्यान सुरू झाली. सोयाबीन तेलात चरबी (कॉलेस्ट्रॉल) नाही म्हणून स्वातंत्रपूर्वकाळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्याकाळी जनतेला सांगितले होते की सोयाबीनचे पीठ गव्हाच्या पिठात 1.5 या प्रमाणात टाकून चपाती बनवावी.
औद्योगिक उत्पादन : लेसिथिन
सोयाबीन तेल तयार करताना होणाऱ्या प्रक्रियेमध्ये लेसिथिन आढळते. हा मेणासारखा असणारा पदार्थ खाद्यतेल पदार्थात, औषधीमध्ये, चामड्याच्या वस्तूमध्ये, सौंदर्यप्रसाधनात, रंग व प्लास्टिक तयार करताना त्याचप्रमाणे साबण व रबर उद्योगातही त्याचे अत्यंत महत्त्व आहे.
सोयाबीन हे एक शेंगवर्गीय पीक असून त्याच्या मुळावर गाठी असतात. त्या गाठीमध्ये हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणारे जिवाणू असतात. सोयाबीन पिकाचे जमिनीवर होणारे अनुकूल परिणाम आहेत. त्यात पक्वतेनंतर सोयाबीन पिकात शंभर टक्के पानगळ होते. त्यामुळे जमिनीवर एक प्रकारचे आच्छादन तयार होते. जे इतर कोणत्याही पिकात होत नाही. या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा जसा आहे तसा ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दुबार पिकाची पेरणी सोयीस्कर होऊन उगवण चांगली होण्यास मदत होते. पानगळीमुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे वृद्धीकरण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची व पाणी निचरून टाकण्याची क्षमता वाढते.
जमिनीची क्षारता कमी करते
सोयाबीन डाळवर्गीय पिक असल्यामुळे मुळावर गाठी येतात. व या गाठीत असणारे जीवाणू हेक्टरी 100 ते 120 किलोपर्यंत हवेतील नत्राचे स्थिरीकरण करत असल्याने हा नत्र पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होतो. सोयाबीन काढणीनंतर जमिनीत हेक्टरी 65 ते 70 किलो नत्र शिल्लक राहतो. त्यामुळे त्यावर घेण्यात यावयाच्या दुबार पिकाचे उत्पादन इतर पिकांवर घेतलेल्या पिकाच्या उत्पादनापेक्षा सरस येते. सोयाबीनच्या मुळातून विशिष्ट प्रकारचे आम्ल बाहेर पडतात त्यामुळे जमिनीची क्षारता कमी होण्यास मदत होते. दुबार पिकाची पेरणी फारशी मशागत न करता पेरणी करता येते. त्यामुळे लागवड खर्चात बचत होते.
सोयाबीनचे वर्गीकरण
सोयाबीन हे ग्लायसिन या वंशातील असून मॅक्स जातीतील आहे. सोयाबीन हे पीक शिंबी गण व कुलाचे पीक आहे. त्याचे उपकुल पलाशकुल आहे. तसेच सोयाबीन पिकाच्या बाबतीत वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणाबाबत बरेच मतभेद आहेत. सन 1948 सालापूर्वी हे पीक अनेक नावाने ओळखले जात असल्याने त्यांचे संशोधकात वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणाबाबत मतभेद आहेत. परंतु सन 1948 साली रिकत आणि मार्स या संशोधकांनी वनस्पतीशास्त्रीय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे सोयाबीनचे नाव ग्लायसिन मॅक्स (एल)मेरिल असे ठेवले.
सोयाबीनच्या कायीक पेशीतील रंगसूत्राची संख्या 40 आहे. सोयाबीनचे वर्गीकरण प्रामुख्याने बियांचा आकार, रंग व रचना यावर केले जाते. दुसऱ्या प्रकारचे वर्गीकरण वाणाच्या पक्वतेच्या कालावधीनुसार केले जाते. सोयाबीनचे वर्गीकरण मंचुरियन, मार्टिन, हर्टस, अमेरिकन असे चार प्रकारे करतात. मंचुरीयन वर्गीकरण त्यातही पिवळ्या रंगाचे, काळ्यावर्णीय रंगाचे असतात. मार्टिन वर्गीकरणात आकार व लांबी रुंदीवर आधारित सोजा इलीप्टीका, सोजा सोरिका, सोजा क्रोपेसा प्रकार असतात. हर्टस् वर्गीकरणातही त्यातही शेंगेच्या आकारावर आधारित रुंद पसरट शेंगांचे, फुगीर शेंगा असलेले असतात. अमेरिकन वर्गीकरणात अमेरिकेतील वाणाच्या पक्वतेच्या कालावधीवर आधारित आहे. गलासीन मॅक्स या प्रचलित सोयाबीन वाणाचे मंचुरियन, चायनीज, इंडियन आणि कोरियन असे चार उपप्रकार आहेत.
विविध नावे व सुधारीत वाण
सोयाबीनला विविध ठिकाणी सोजा सोयर, भाटमन राम कुलथी, काळीतुर या नावाने संबोधले जाते. सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात काळी कुळीथ या नावाने ओळखले जाते. सोयाबीनचे अनेक सुधारित वाण उपलब्ध आहेत. त्यात पी.के.1029, जे. एस.335, एम.ए.सी.एस.450,फुले कल्याणी (डी. एस. 228) हे वाण आहेत. त्यांचा पेरणीसाठी वापर करावा.
सुरुवातीस परदेशातून तसेच भारतातील विविध संशोधन केंद्रातून उपलब्ध असणाऱ्या सोयाबीनच्या जाती गोळा करून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या कृषी विद्यापीठ पंतनगर येथे घेण्यात आल्या. कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे यांना नव्या प्रतिकारक वाणांची पैदास करणे गरजेचे वाटल्यामुळे भारतात आजपर्यंत पन्नास जातीची शिफारस देशातील विविध भागासाठी करण्यात आली. या जाती देशी, परदेशी किंवा नवीन पैदास केलेल्यापैकी आहेत. सोयाबीन 13 अंश सें.ग्रेडपेक्षा जास्त आणि 30 अंश सें.ग्रेडपेक्षा कमी तापमानात चांगले येऊ शकते. पीक फुलोऱ्यावर असताना 20 ते 30 सें. तापमान पोषक असते. 40 अंश से.पेक्षा जास्त तापमान झाल्यास फुले गळण्याचे आणि शेंगा न धरण्याची प्रक्रिया सुरू होते.
सोयाबीन पिकासाठी जमीन व खते
हे पीक उष्ण तापमानात आणि काळोख्या रात्रीला संवेदनशील आहे. सोयाबीन पिकासाठी मध्यम ते भारी, लालसर, काळी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 सामू आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी.
सोयाबीनला चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्टरी 25 ते 30 गाड्या वापराव्या. सोयाबीन पिकास हेक्टरी 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद द्यावे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डेझिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. सोयाबीन पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी) फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी) व शेंगा भरताना (पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आपण सोयाबीनची पेरणी करताना 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद देतो. परंतु पीक काढणीनंतर जमिनीत 50 ते 75 किलो नत्र शिल्लक राहते. म्हणजेच नत्र स्थिर करणारे जिवाणूंनी या नत्राचे स्थिरीकरण केलेले असते. या जिवाणूंचे शास्त्रीय नाव ब्रँडी रायझोनियम जपानिकम असे आहे.
जमिनीत सेंद्रिय पदार्थांची रेलचेल
पिकाची वाढ पूर्ण होऊन पक्क झाल्यानंतर सोयाबीनच्या झाडावरील सर्व पाने देठासहित गळून जमिनीवर पडतात व नंतर ती जमिनीत मिसळतात. या वाळलेल्या पानामुळे जवळजवळ 1800 ते 2200 कि.सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकले जातात. त्यामुळे जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. आणि पाण्याचा निचरा चांगला होण्यास मदत होते. पानांची गळ झाल्यामुळे जमिनीवर एक प्रकारचे आच्छादन तयार होते. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. नंतर रब्बीत घ्यावयाच्या कुठल्याही पिकाची पेरणी करताना एखादी वखरणी व कुळवणी करून पेरणी करू शकतो. जेणेकरून तनांचा नाश होईल व पीक चांगले येईल. जमीनीत स्थिर केलेल्या नत्राच्या साठ्यामुळे रब्बी पिकाच्या उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते. सोयाबीनच्या मुळांपासून काही विशिष्ट प्रकारची आम्ले बाहेर पडतात. त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाणही काही अंशी तरी कमी होण्यास मदत होते.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
No comments:
Post a Comment