कुक्कुटपालन तंत्रज्ञान व व्यवसाय व्यवस्थापन poultry farm technology
कुक्कुटपालन व्यवसायाचा शेतकऱ्यांच्याअर्थार्जनासाठी, रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने, सामान्य माणसाच्या आहार परिपूर्णतेसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार व वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची उपलब्धता पाहून व नंतर संपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
अर्थार्जनासाठी कुक्कुटपालन
आज आपल्या देशातील लहान-मोठे उद्योजक, शेतकरी कुक्कुटपालनाकडे एक अर्थार्जनासाठी उपयुक्त अशा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहायला लागले आहेत.
तसेच कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीपालन हे आपल्या देशातील शेतकऱ्यांना काही नवीन नाही.
३०-३५वर्षांपूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडे ८- १० तरी कोंबड्या असत.
त्याहीपेक्षा मागील इतिहास पाहिला तर असे आढळते की, आज जगभरात सर्वत्र पाळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या ह्या आशियाखंडात सापडणाऱ्या जंगली कोंबडीपासून निर्माण झालेल्या आहेत.
आधुनिक पद्धतीची पोल्ट्री फार्मस्
तीस वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या परसातील ८-१० कोंबड्या व आज दीड ते दोन लाख पक्ष्यांची आधुनिक पद्धतीची पोल्ट्री फार्मस् हा प्रवास स्वतःच या व्यवसायाची उपयुक्तता दर्शवतो.
ह्या झपाट्याने होत गेलेल्या विकासाची कारणमिमांसा पाहता या पक्ष्याची उपयुक्तता आणखी स्पष्ट होते.
आपल्याकडे उपलब्ध असलेल्या धान्यांपैकी खराब झालेले किंवा निकृष्ट दर्जाचे धान्य व इतर खाद्यपदार्थ कोंबड्यांच्या खाद्यासाठी वापरण्यात येऊन त्याद्वारे उत्तम प्रकारची अंडी व मांस मिळवून देण्याची पक्ष्यांची क्षमता लोकांच्या लक्षात आली आहे.
ह्या सर्व गोष्टीबरोबरच परदेशातून आणलेल्या विकसित कोंबड्या आपल्या देशातील वातावरणाशी व भौगोलिक परिस्थितीशी सहजपणे रूळल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाच्या वाढीची गती चांगली राहिली आहे.
अंड्याची व मांसाची उपलब्धता
१९६० साली भारतातील अंड्याचे उत्पादन १७८० दशलक्ष अंडी इतके होते तर ते आज २८,००० दशलक्ष अंडी इतके झाले आहे.
अंडी उत्पादनामध्ये आज जगात भारताचा सहावा क्रमांक लागतो. १९७०-७५ साली लोकांना माहीत नसलेले ब्रॉयलर म्हणजेच मांसल पक्ष्यांचे उत्पादन सध्या २९० ते ३०० दशलक्ष पक्षी इतके झाले आहे.
इतके असून सुद्धा दरडोई अंड्याची व मांसाची उपलब्धता आपल्या देशात अनुक्रमे ३४ ते ४४ ग्रॅम इतकीच आहे.
जागतिक आरोग्य परिषदेच्या अहवालानुसार ही उपलब्धता किमान १६५ अंडी व १५ ते १८ किलो मांस इतकी असावयास हवी.
यावरून हे स्पष्ट होते की अजूनही बऱ्याच प्रमाणात या व्यवसायाची वाढ होणे आवश्यक आहे. म्हणून कित्येक शेतकरी व उद्योजक या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत.
आहार परिपूर्णतेसाठी व्यवसायाचा प्रसार
शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुक्कुटपालन म्हणजे पक्ष्यांचे संगोपन एवढेच अभिप्रेत असले तरी या व्यवसायाशी निगडित असे अनेक व्यवसाय उदा. पशुखाद्य बनविणे, सुधारित जातींची एक दिवसाची पिल्ले तयार करणे आणि विकणे इ. व्यवसाय वाढीस लागले असून त्यामुळे रोजगार उपलब्धतता बऱ्याच प्रमाणात वाढली आहे.
अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनासाठी,रोजगार उपलब्धततेसाठी व सामान्य माणसांच्या आहार परिपूर्णतेसाठी अशा सर्वपयोगी कुक्कुटपालन व्यवसायाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार व वापर केला तर त्यात आपोआपच राष्ट्राचा विकास साधला जाईल.
पक्षांचे संगोपन
कुक्कुटपालन व्यवसायात सध्या तीन प्रकारच्या पक्षांचे संगोपन केले जाते.
पहिला प्रकार म्हणजे अंडी देणारा पक्षी हा होय. यासाठी व्हाईट लेग हॉर्न ह्या जातीच्या पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने निवड व पैदास करून अंडी देण्यास उपयुक्त असे पक्षी तयार केले जातात.
या पक्ष्यांना लेअर पक्षी असे म्हणतात. लेअर पक्षी एक दिवस वयाचे असतांना याची ह्याचरी (hatchary) मधून विकत घेतले जातात.
ह्या पक्ष्यांच्या संगोपनात वयपरत्वे त्याचे तीन गट सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यातील पहिला वयोगट म्हणजे ० ते ८ आठवडे हा होय.
ह्या कालावधीत या पिल्लांना लागणारी उष्णता, वातावरण, खाद्य, पाणी इ. गरजांची योग्य ती काळजी घ्यावी लागते.
ह्या आठ आठवड्यात एक पक्षी सरासरी १.५० ते १.७५ किलो ग्रॅम इतके खाद्य खाऊन ५५० ते ६०० ग्रॅम इतके वजन गाठतात.
त्यानंतरचा वयोगट म्हणजे ९ ते १९ आठवडे हा होय. या कालावधीत पक्षांना ग्रोवर असे म्हणतात. हा काळ प्रामुख्याने पक्षांच्या वाढीचा काळ असतो.
ह्यामध्ये पक्ष्यांचे वजन ६०० ग्रॅम वरून १९ आठवड्याच्या शेवटी साधारणपणे १.२ ते १.३ किलो ग्रॅम इतके होते. तर ह्या काळात प्रत्येक पक्ष्याला सरासरी ६.५ ते ७ कि.ग्रॅम खाद्य लागते.
त्यानंतर वयाच्या विसाव्या आठवड्यापासून पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतात.
वयाच्या २४ आठवड्यापर्यंत ५०% उत्पादन तर वयाच्या २८व्या आठवड्यात सर्वोच्च म्हणजे साधारण ८५ ते ९०% उत्पादन हे पक्षी देऊ लागतात. त्यानंतर वयाच्या ७२ आठवडेपर्यंत हे पक्षी किफायतशीर उत्पादन देतात.
सरासरी प्रत्येक पक्ष्याला दर दिवशी ११० ग्रॅम इतके खाद्य अंडी उत्पादन सुरू केल्यावर लागते.
म्हणजे एक वर्षात प्रत्येक पक्ष्याला या कालावधीत ४० किलो खाद्य लागते.
मांसल (ब्रॉयलर्स) पक्षीपालन
कुक्कुटपालनात रोगाविरुद्धचे लसीकरण, उजेडाचे व्यवस्थापन, औषधोपचार, दररोजचे योग्य व्यवस्थापन, योग्य तापमान, हवेचा खेळतेपणा इ. आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात व योग्यवेळी पुरवल्यास एका पक्ष्याकडून एका वर्षात सरासरी २८० ते २९० अंडी मिळवता येऊ शकतात.
दुसऱ्या प्रकारचे पक्षी मांसल पक्षी किंवा ब्रॉयलर्स असतात. उत्तम प्रतीचे मांस मिळविण्यासाठी ह्या पक्षांचा वापर केला जातो.
वाढीचा दर व खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता चांगली असलेल्या जातींचा संकर करून ह्या प्रकारचे पक्षी तयार केले जातात.
ह्या पक्ष्यांना लेयर पक्षांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे ६ ते ७ आठवडे पाळले जाते.
ह्या काळात प्रत्येक पक्षी सरासरी ३ ते ३.२५ कि.ग्रॅम इतके खाद्य खाऊन १.५ ते १.७५ कि.ग्रॅम इतके वजन देतात.
मोठ्या शहरात किंवा बाजारपेठेत असलेली मागणी व पालनाचा कमी कालावधी ह्या दोन गोष्टींमुळे ह्या पक्ष्यांचे पालन लोकप्रिय झाले असून त्यामुळे मांसल पक्ष्यांचे एकूण उत्पादन वाढून दरडोई मांसाची उपलब्धता वाढण्यासाठी मदत होत आहे.
कॉकरेल किंवा तलंगा पक्षाचे पालन
कुक्कुटपालनातील तिसरा प्रकार म्हणजे कॉकरेल किंवा तलंगा पक्षाचे पालन होय.
मोठ्या शहरांमध्ये तंदूर हा प्रकार फारच लोकप्रिय झाला आहे. त्या तंदुरीसाठी तलंगा पक्ष्यांचा वापर केला जातो.
हे सर्व नर पक्षी असतात. हे ९ ते १० आठवडे पाळून सरासरी ६०० ते ७०० ग्रॅम इतक्या वजनाचे झाल्यावर विकले जातात.
अशा पद्धतीने सध्या अंड्यासाठीचे व मांसासाठीचे ब्रॉयलर कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे.
करार पद्धतीने कोंबडीपालन करून भरपूर नफा कमवला जात आहे. अंडी व पक्षी यांची विक्री करणे हा भाग अजूनही थोडा अनियंत्रित स्वरूपात राहिलेला आहे. म्हणून
शेतकऱ्यांनी बाजारपेठेची उपलब्धतता पाहून व नंतर संपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.
कोंबड्यांना शेडची आवश्यकता
हवामानातील बदल ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कोंबड्यांना घराची (शेडची) आवश्यकता आहे.
प्रत्येक अंडी देणाऱ्या कोंबडीस २.५ ते ३ चौ.फूट जागा लागते. घराची लांबी, पक्ष्यांची लांबी व पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असावी. मात्र रुंदी २५ फुटांपेक्षा जास्त असू नये.
घराची लांबी पूर्व पश्चिम असावी. ही घरे जमिनीपासून २ ते २.५ फूट उंचीवर असावी.
सुरुवातीस २.५ ते ३ फूट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यंत बारीक जाळ्या बसवाव्यात.
मधली उंची १२ ते १५ फूट असावी. व छत दोन्ही बाजूस उतरते असावे.
सर्वत्र प्रचलित असलेल्या कोंबड्या पाळण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे गादी पद्धत (डीप लिटर) व पिंजरा पद्धत होय.
गादी पद्धतीत कोंबड्या जमिनीवर लिटर पसरून त्यावर वाढवल्या जातात.
लिटरसाठी (गादीसाठी) लाकडाचा भुसा, शेंगाचे फोलपट, भाताचे तूस उपयोगात आणतात. यामध्ये कोंबडीची विष्ठा पडते व ती शोषली जाते.
गादी माध्यमे दररोज हलवली जातात. त्यामुळे ही कोरडी राहण्यास मदत होते व शेवटी याचा उपयोग खत म्हणून केला जातो.
पिंजरा पद्धतीने कुक्कुटपालन
पिंजरा पद्धतीत एक कोंबडी एका पिंजऱ्यात किंवा दोन-तीन कोंबड्या एका पिंजऱ्यात ठेवले जातात.
सर्वांसाठी लांब एकच एक पन्हाळ्यासारखे खाद्याचे व पाण्याचे भांडे जोडलेले असते.
यात प्रती पक्षास ६० ते ७० चौरस इंच किंवा एक चौरस फूट जागा दिली जाते. विष्ठा परस्पर पिंजरांच्या खाली केलेल्या खड्ड्यात जमा होते.
प्रत्येक पिंजऱ्याची पुढील उंची १८ इंच व मागील उंची १५ इंच असते. त्यामुळे मागील बाजूस उतार मिळतो. व अंडी गोळा करण्यास मदत होते.
अशा पद्धतीने फायदेशीर कुक्कुटपालन केले जाते.
कोंबड्यांची (ब्रॉयलर) निर्मिती
साधारण १९९० पासून कोंबडी व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.
अंडी देणाऱ्या कोंबड्यांपेक्षा मांसल कोंबड्यांची (ब्रॉयलर) निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेक कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत.
एक दिवसाच्या पिलाची विक्रीबरोबरच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पिलाचा पुरवठा करून तयार झालेल्या कोंबड्यांचे स्वतःच्या व्यवस्थापनाखालील प्रक्रिया उद्योगात अनेक कंपन्या गुंतल्या आहेत.
अंड्यांपासून पावडर तयार करणे, कोंबड्या सोलून त्यांचे मांसावर प्रक्रिया करणे, मांस फ्रिज करून त्यांची निर्यात करणे यासारख्या प्रक्रिया उद्योगातून चांगले पैसे मिळत आहेत.
अशा पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय प्रगतीच्या दिशेने झपावत असल्याचे सध्याचे चित्र आहे.
#कुक्कुटपालन #poultryfarms #broiler farming #कोंबडीपालन व्यवसाय #contract farming #कॉकरेल #व्हाईटलेगहॉर्न पक्षीपालन #पिंजरा पद्धतीने कुक्कुटपालन #कोंबडीपालनातून रोजगार
© दीपक केदू अहिरे
नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment