name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): February 2023

सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान (soyabean utpadan Tantradnyan)

सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान (soyabean utpadan Tantradnyan)

   भारतातील तेलबियांच्या उत्पादनात भुईमूग व मोहरीनंतर सोयाबीन या पिकाचा क्रमांक लागतो. सोयाबीन हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीत धान्य पीक आहे. 


प्रथिनांचा सधन स्त्रोत

      सोयाबीन हा एक प्रथिनांचा सधन स्त्रोत आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये. कारण सोयाबीनमध्ये प्रथिने 38 ते 41 टक्के, तेल 17 ते 19 टक्के, कर्बोदके 20.9 टक्के, खनिज 4.6% कॅल्शियम 0. 24 टक्के, फॉस्फरस 0.69 टक्के, लोह 11.5 मि. ग्रॅम तर उष्मांक 432 आहे. अशा प्रकारे सोयाबीन हा एक सुरक्षित व सकस आहार असून लहान मुले व मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी खूप चांगला पोषक आहार आहे. 

सोयाबीनपासून  मूल्यवर्धित पदार्थ

          सोयाबीनपासून जवळजवळ 165 मूल्यवर्धित पदार्थ तयार करता येतात. उदा. सोया दूध, सोया बिस्किटे, सोया केक, सोया चकली असे अनेक पदार्थ तयार करता येतात. त्याच्या विविध उपयोगामुळे त्यास कामधेनू किंवा मातीतील सोने म्हणूनही संबोधले जाते. सध्या आपल्या देशात तेलबियांच्या उत्पादनात वाढ झाली आहे. यात सोयाबीन पिकाचा मोठा वाटा आहे. तेलबिया पिकांमध्ये सोयाबीन हे भारतात लागवडीसाठी एक क्रमांकाचे पीक आहे. सोयाबीन पिकामुळे देशातील सर्वच वर्गांना फायदा झाला आहे. देशात सोयाबीनवर चालणाऱ्या कारखान्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे. त्यामुळे या पिकाचे क्षेत्र आपल्या देशात व महाराष्ट्रात सातत्याने वाढतच आहे. 

प्रक्रियायुक्त पदार्थाला प्रचंड मागणी

   देशाला सोयाबीनपासून होणाऱ्या विविध पदार्थांच्या निर्यातीपासून वर्षाकाठी तेहत्तीस हजार कोटी रुपये मिळतात. सोयाबीनपासून तयार होणाऱ्या तेलाला, प्रक्रियायुक्त पदार्थाला प्रचंड प्रमाणात मागणी आहे. तेवढी मागणी आपण पुरवू शकत नाही अशी आजची स्थिती आहे. सोयाबीनमध्ये १९ टक्के तेलाचे व 43 टक्के प्रथिनांचे प्रमाण असल्याने त्याचा तेलबिया व कडधान्य या दोन्ही पिकात समावेश होतो. 

  आपल्या देशात सोयाबीनची लागवड सन 1970-71 साली सुरू झाली. तर महाराष्ट्रात 1980-84 च्या दरम्यान सुरू झाली. सोयाबीन तेलात चरबी (कॉलेस्ट्रॉल) नाही म्हणून स्वातंत्रपूर्वकाळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी त्याकाळी जनतेला सांगितले होते की सोयाबीनचे पीठ गव्हाच्या पिठात 1.5 या प्रमाणात टाकून चपाती बनवावी. 

औद्योगिक उत्पादन : लेसिथिन

    सोयाबीन तेल तयार करताना होणाऱ्या प्रक्रियेमध्ये लेसिथिन आढळते. हा मेणासारखा असणारा पदार्थ खाद्यतेल पदार्थात, औषधीमध्ये, चामड्याच्या वस्तूमध्ये, सौंदर्यप्रसाधनात, रंग व प्लास्टिक तयार करताना त्याचप्रमाणे साबण व रबर उद्योगातही त्याचे अत्यंत महत्त्व आहे. 

       सोयाबीन हे एक शेंगवर्गीय पीक असून त्याच्या मुळावर गाठी असतात. त्या गाठीमध्ये हवेतील नत्र जमिनीत स्थिर करणारे जिवाणू असतात. सोयाबीन पिकाचे जमिनीवर होणारे अनुकूल परिणाम आहेत. त्यात पक्वतेनंतर सोयाबीन पिकात शंभर टक्के पानगळ होते. त्यामुळे जमिनीवर एक प्रकारचे आच्छादन तयार होते. जे इतर कोणत्याही पिकात होत नाही. या पूर्ण आच्छादनामुळे जमिनीतील ओलावा जसा आहे तसा ठेवण्यास मदत होते. त्यामुळे दुबार पिकाची पेरणी सोयीस्कर होऊन उगवण चांगली होण्यास मदत होते. पानगळीमुळे जमिनीत सेंद्रिय पदार्थांचे वृद्धीकरण होऊन जमिनीची पाणी धरून ठेवण्याची व पाणी निचरून टाकण्याची क्षमता वाढते.  

जमिनीची क्षारता कमी करते

 सोयाबीन डाळवर्गीय पिक असल्यामुळे मुळावर गाठी येतात. व या गाठीत असणारे जीवाणू हेक्टरी 100 ते 120 किलोपर्यंत हवेतील नत्राचे स्थिरीकरण करत असल्याने हा नत्र पिकाच्या वाढीसाठी उपलब्ध होतो. सोयाबीन काढणीनंतर जमिनीत हेक्टरी 65 ते 70 किलो नत्र शिल्लक राहतो. त्यामुळे त्यावर घेण्यात यावयाच्या दुबार पिकाचे उत्पादन इतर पिकांवर घेतलेल्या पिकाच्या उत्पादनापेक्षा सरस येते. सोयाबीनच्या मुळातून विशिष्ट प्रकारचे आम्ल बाहेर पडतात त्यामुळे जमिनीची क्षारता कमी होण्यास मदत होते. दुबार पिकाची पेरणी फारशी मशागत न करता पेरणी करता येते. त्यामुळे लागवड खर्चात बचत होते. 

सोयाबीनचे वर्गीकरण 

   सोयाबीन हे ग्लायसिन या वंशातील असून मॅक्स जातीतील आहे. सोयाबीन हे पीक शिंबी गण व कुलाचे पीक आहे. त्याचे उपकुल पलाशकुल आहे. तसेच सोयाबीन पिकाच्या बाबतीत वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणाबाबत बरेच मतभेद आहेत. सन 1948 सालापूर्वी हे पीक अनेक नावाने ओळखले जात असल्याने त्यांचे संशोधकात वनस्पतीशास्त्रीय वर्गीकरणाबाबत मतभेद आहेत. परंतु सन 1948 साली रिकत आणि मार्स या संशोधकांनी वनस्पतीशास्त्रीय आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे सोयाबीनचे नाव ग्लायसिन मॅक्स (एल)मेरिल असे ठेवले. 

    सोयाबीनच्या कायीक पेशीतील रंगसूत्राची संख्या 40 आहे. सोयाबीनचे वर्गीकरण प्रामुख्याने बियांचा आकार, रंग व रचना यावर केले जाते. दुसऱ्या प्रकारचे वर्गीकरण वाणाच्या पक्वतेच्या कालावधीनुसार केले जाते. सोयाबीनचे वर्गीकरण मंचुरियन, मार्टिन, हर्टस, अमेरिकन असे चार प्रकारे करतात. मंचुरीयन वर्गीकरण त्यातही पिवळ्या रंगाचे, काळ्यावर्णीय रंगाचे असतात. मार्टिन वर्गीकरणात आकार व लांबी रुंदीवर आधारित सोजा इलीप्टीका, सोजा सोरिका, सोजा क्रोपेसा प्रकार असतात. हर्टस् वर्गीकरणातही त्यातही शेंगेच्या आकारावर आधारित रुंद पसरट शेंगांचे, फुगीर शेंगा असलेले असतात. अमेरिकन वर्गीकरणात अमेरिकेतील वाणाच्या पक्वतेच्या कालावधीवर आधारित आहे. गलासीन मॅक्स या प्रचलित सोयाबीन वाणाचे मंचुरियन, चायनीज, इंडियन आणि कोरियन असे चार उपप्रकार आहेत. 

विविध नावे व सुधारीत वाण 

    सोयाबीनला विविध ठिकाणी सोजा सोयर, भाटमन राम कुलथी, काळीतुर या नावाने संबोधले जाते. सांगली तसेच कोल्हापूर जिल्ह्यात काळी कुळीथ या नावाने ओळखले जाते. सोयाबीनचे अनेक सुधारित वाण उपलब्ध आहेत. त्यात पी.के.1029, जे. एस.335, एम.ए.सी.एस.450,फुले कल्याणी (डी. एस. 228) हे वाण आहेत. त्यांचा पेरणीसाठी वापर करावा. 

  सुरुवातीस परदेशातून तसेच भारतातील विविध संशोधन केंद्रातून उपलब्ध असणाऱ्या सोयाबीनच्या जाती गोळा करून त्यांच्या चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्या कृषी विद्यापीठ पंतनगर येथे घेण्यात आल्या. कृषी विद्यापीठे, संशोधन केंद्रे यांना नव्या प्रतिकारक वाणांची पैदास करणे गरजेचे वाटल्यामुळे भारतात आजपर्यंत पन्नास जातीची शिफारस देशातील विविध भागासाठी करण्यात आली. या जाती देशी, परदेशी किंवा नवीन पैदास केलेल्यापैकी आहेत. सोयाबीन 13 अंश सें.ग्रेडपेक्षा जास्त आणि 30 अंश सें.ग्रेडपेक्षा कमी तापमानात चांगले येऊ शकते. पीक फुलोऱ्यावर असताना 20 ते 30 सें. तापमान पोषक असते. 40 अंश से.पेक्षा जास्त तापमान झाल्यास फुले गळण्याचे आणि शेंगा न धरण्याची प्रक्रिया सुरू होते. 

सोयाबीन पिकासाठी जमीन व खते 


   हे पीक उष्ण तापमानात आणि काळोख्या रात्रीला संवेदनशील आहे. सोयाबीन पिकासाठी मध्यम ते भारी, लालसर, काळी, पाण्याचा योग्य निचरा होणारी, आम्ल विम्ल निर्देशांक 6.5 ते 7.5 सामू आणि मध्यम खोलीची जमीन निवडावी.

       सोयाबीनला चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत हेक्‍टरी 25 ते 30 गाड्या वापराव्या. सोयाबीन पिकास हेक्टरी 50 किलो नत्र आणि 75 किलो स्फुरद द्यावे. बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 2.5 ग्रॅम कार्बेन्डेझिम किंवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा चोळावे. सोयाबीन पिकाला फांद्या फुटताना (पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी) फुलोऱ्यात असताना (पेरणीनंतर 45 ते 50 दिवसांनी) व शेंगा भरताना (पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी) पावसाने ताण दिल्यास पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आपण सोयाबीनची पेरणी करताना 50 किलो नत्र, 75 किलो स्फुरद देतो. परंतु पीक काढणीनंतर जमिनीत 50 ते 75 किलो नत्र शिल्लक राहते. म्हणजेच नत्र स्थिर करणारे जिवाणूंनी या नत्राचे स्थिरीकरण केलेले असते. या जिवाणूंचे शास्त्रीय नाव ब्रँडी रायझोनियम जपानिकम असे आहे. 

जमिनीत सेंद्रिय पदार्थांची रेलचेल 

    पिकाची वाढ पूर्ण होऊन पक्क झाल्यानंतर सोयाबीनच्या झाडावरील सर्व पाने देठासहित गळून जमिनीवर पडतात व नंतर ती जमिनीत मिसळतात. या वाळलेल्या पानामुळे जवळजवळ 1800 ते 2200 कि.सेंद्रिय पदार्थ जमिनीत टाकले जातात. त्यामुळे जमिनीची जलधारणाशक्ती वाढते. आणि पाण्याचा निचरा चांगला होण्यास मदत होते. पानांची गळ झाल्यामुळे जमिनीवर एक प्रकारचे आच्छादन तयार होते. त्यामुळे जमिनीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते. नंतर रब्बीत घ्यावयाच्या कुठल्याही पिकाची पेरणी करताना एखादी वखरणी व कुळवणी करून पेरणी करू शकतो. जेणेकरून तनांचा नाश होईल व पीक चांगले येईल. जमीनीत स्थिर केलेल्या नत्राच्या साठ्यामुळे रब्बी पिकाच्या उत्पादनात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ होते. सोयाबीनच्या मुळांपासून काही विशिष्ट प्रकारची आम्ले बाहेर पडतात. त्यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाणही काही अंशी तरी कमी होण्यास मदत होते.

© दीपक केदू अहिरे, नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.DigitalKrushiyog.com

#सोयाबीनलागवड #सोयाबीनउत्पादन 

कुक्कुटपालन तंत्रज्ञान व व्यवसाय व्यवस्थापन (poultry farm technology)

 कुक्कुटपालन तंत्रज्ञान व व्यवसाय व्यवस्थापन poultry farm technology

  कुक्कुटपालन व्यवसायाचा शेतकऱ्यांच्याअर्थार्जनासाठी, रोजगार उपलब्धतेच्या दृष्टीने, सामान्य माणसाच्या आहार परिपूर्णतेसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार व वापर करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांनी बाजारपेठेची उपलब्धता पाहून व नंतर संपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो. 


अर्थार्जनासाठी कुक्कुटपालन


Kukkutpalan


  • आज आपल्या देशातील लहान-मोठे उद्योजक, शेतकरी कुक्कुटपालनाकडे एक अर्थार्जनासाठी उपयुक्त अशा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहायला लागले आहेत. 

  • तसेच कुक्कुटपालन म्हणजे कोंबडीपालन हे आपल्या देशातील शेतकऱ्यांना काही नवीन नाही.

  • ३०-३५वर्षांपूर्वी जवळजवळ प्रत्येक शेतकऱ्याकडे ८- १० तरी कोंबड्या असत.

  • त्याहीपेक्षा मागील इतिहास पाहिला तर असे आढळते की, आज जगभरात सर्वत्र पाळल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या जातीच्या कोंबड्या ह्या आशियाखंडात सापडणाऱ्या जंगली कोंबडीपासून निर्माण झालेल्या आहेत. 


आधुनिक पद्धतीची पोल्ट्री फार्मस् 


Kukkutpalan

  • तीस वर्षांपूर्वी प्रत्येक शेतकऱ्याकडे असलेल्या परसातील ८-१० कोंबड्या व आज दीड ते दोन लाख पक्ष्यांची आधुनिक पद्धतीची पोल्ट्री फार्मस् हा प्रवास स्वतःच या व्यवसायाची उपयुक्तता दर्शवतो. 

  • ह्या झपाट्याने होत गेलेल्या विकासाची कारणमिमांसा पाहता या पक्ष्याची उपयुक्तता आणखी स्पष्ट होते. 

  • आपल्याकडे उपलब्ध असलेल्या धान्यांपैकी खराब झालेले किंवा निकृष्ट दर्जाचे धान्य व इतर खाद्यपदार्थ कोंबड्यांच्या खाद्यासाठी वापरण्यात येऊन त्याद्वारे उत्तम प्रकारची अंडी व मांस मिळवून देण्याची पक्ष्यांची क्षमता लोकांच्या लक्षात आली आहे. 

  • ह्या सर्व गोष्टीबरोबरच परदेशातून आणलेल्या विकसित कोंबड्या आपल्या देशातील वातावरणाशी व भौगोलिक परिस्थितीशी सहजपणे रूळल्यामुळे कुक्कुटपालन व्यवसायाच्या वाढीची गती चांगली राहिली आहे. 


अंड्याची व मांसाची उपलब्धता


Kukkutpalan

Kukkutpalan


  • १९६० साली भारतातील अंड्याचे उत्पादन १७८० दशलक्ष अंडी इतके होते तर ते आज २८,००० दशलक्ष अंडी इतके झाले आहे. 

  • अंडी उत्पादनामध्ये आज जगात भारताचा सहावा क्रमांक लागतो. १९७०-७५ साली लोकांना माहीत नसलेले ब्रॉयलर म्हणजेच मांसल पक्ष्यांचे उत्पादन सध्या २९० ते ३०० दशलक्ष पक्षी इतके झाले आहे. 

  • इतके असून  सुद्धा दरडोई अंड्याची व मांसाची उपलब्धता आपल्या देशात अनुक्रमे  ३४ ते ४४ ग्रॅम इतकीच आहे. 

  • जागतिक आरोग्य परिषदेच्या अहवालानुसार ही उपलब्धता किमान १६५ अंडी व १५ ते १८ किलो मांस इतकी असावयास हवी.

  • यावरून हे स्पष्ट होते की अजूनही बऱ्याच प्रमाणात या व्यवसायाची वाढ होणे आवश्यक आहे. म्हणून कित्येक शेतकरी व उद्योजक या व्यवसायाकडे आकर्षित झाले आहेत. 


आहार परिपूर्णतेसाठी व्यवसायाचा प्रसार


Kukkutpalan


  • शेतकऱ्यांच्या दृष्टीने कुक्कुटपालन म्हणजे पक्ष्यांचे  संगोपन एवढेच अभिप्रेत असले तरी या व्यवसायाशी निगडित असे अनेक व्यवसाय उदा. पशुखाद्य बनविणे, सुधारित जातींची एक दिवसाची पिल्ले तयार करणे आणि विकणे इ. व्यवसाय वाढीस लागले असून त्यामुळे रोजगार उपलब्धतता बऱ्याच प्रमाणात वाढली आहे. 

  • अशाप्रकारे शेतकऱ्यांच्या अर्थार्जनासाठी,रोजगार उपलब्धततेसाठी व सामान्य माणसांच्या आहार परिपूर्णतेसाठी अशा सर्वपयोगी कुक्कुटपालन व्यवसायाचा शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसार व वापर केला तर त्यात आपोआपच राष्ट्राचा विकास साधला जाईल.


पक्षांचे संगोपन

Kukkutpalan

  • कुक्कुटपालन व्यवसायात सध्या तीन प्रकारच्या पक्षांचे संगोपन केले जाते. 

  • पहिला प्रकार म्हणजे अंडी देणारा पक्षी हा होय. यासाठी व्हाईट लेग हॉर्न ह्या जातीच्या पक्ष्यांची शास्त्रीय पद्धतीने निवड व पैदास करून अंडी देण्यास उपयुक्त असे पक्षी तयार केले जातात. 

  • या पक्ष्यांना लेअर पक्षी असे म्हणतात. लेअर पक्षी एक दिवस वयाचे असतांना याची ह्याचरी (hatchary) मधून विकत घेतले जातात. 

  • ह्या पक्ष्यांच्या संगोपनात वयपरत्वे त्याचे तीन गट सोयीसाठी पाडलेले आहेत. त्यातील पहिला वयोगट म्हणजे ० ते ८ आठवडे हा होय. 

  • ह्या कालावधीत या पिल्लांना लागणारी उष्णता, वातावरण, खाद्य, पाणी इ. गरजांची योग्य ती काळजी घ्यावी लागते. 

  • ह्या आठ आठवड्यात एक पक्षी सरासरी १.५० ते १.७५ किलो ग्रॅम इतके खाद्य खाऊन ५५० ते ६०० ग्रॅम इतके वजन गाठतात.

  • त्यानंतरचा वयोगट म्हणजे ९ ते १९ आठवडे हा होय. या कालावधीत पक्षांना ग्रोवर असे म्हणतात. हा काळ प्रामुख्याने पक्षांच्या वाढीचा काळ असतो. 

  • ह्यामध्ये पक्ष्यांचे वजन ६०० ग्रॅम वरून १९ आठवड्याच्या शेवटी साधारणपणे १.२ ते १.३ किलो ग्रॅम इतके होते. तर ह्या काळात प्रत्येक पक्ष्याला सरासरी ६.५ ते ७ कि.ग्रॅम खाद्य लागते. 

  • त्यानंतर वयाच्या विसाव्या आठवड्यापासून पक्षी अंडी देण्यास सुरुवात करतात. 

  • वयाच्या २४ आठवड्यापर्यंत ५०% उत्पादन तर वयाच्या २८व्या आठवड्यात सर्वोच्च म्हणजे साधारण ८५ ते ९०% उत्पादन हे पक्षी देऊ लागतात. त्यानंतर वयाच्या ७२ आठवडेपर्यंत हे पक्षी किफायतशीर उत्पादन देतात.

  • सरासरी प्रत्येक पक्ष्याला दर दिवशी ११० ग्रॅम इतके खाद्य अंडी उत्पादन सुरू केल्यावर लागते. 

  • म्हणजे एक वर्षात प्रत्येक पक्ष्याला या कालावधीत ४० किलो खाद्य लागते. 


मांसल (ब्रॉयलर्स) पक्षीपालन


Kukkutpalan

  • कुक्कुटपालनात रोगाविरुद्धचे लसीकरण, उजेडाचे व्यवस्थापन, औषधोपचार, दररोजचे योग्य व्यवस्थापन, योग्य तापमान, हवेचा खेळतेपणा इ. आवश्यक गोष्टी पुरेशा प्रमाणात व योग्यवेळी पुरवल्यास एका पक्ष्याकडून एका वर्षात सरासरी २८० ते २९० अंडी मिळवता येऊ शकतात. 

  • दुसऱ्या प्रकारचे पक्षी मांसल पक्षी किंवा ब्रॉयलर्स असतात. उत्तम प्रतीचे मांस मिळविण्यासाठी ह्या पक्षांचा वापर केला जातो. 

  • वाढीचा दर व खाद्याचे मांसात रूपांतर करण्याची क्षमता चांगली असलेल्या जातींचा संकर करून ह्या प्रकारचे पक्षी तयार केले जातात.

  • ह्या पक्ष्यांना लेयर पक्षांच्या तुलनेत फारच कमी म्हणजे ६ ते ७  आठवडे पाळले जाते. 

  • ह्या काळात प्रत्येक पक्षी सरासरी ३ ते ३.२५ कि.ग्रॅम इतके खाद्य खाऊन १.५ ते १.७५ कि.ग्रॅम इतके वजन देतात. 

  • मोठ्या शहरात किंवा बाजारपेठेत असलेली मागणी व पालनाचा कमी कालावधी ह्या दोन गोष्टींमुळे ह्या पक्ष्यांचे पालन लोकप्रिय झाले असून त्यामुळे मांसल पक्ष्यांचे एकूण उत्पादन वाढून दरडोई मांसाची उपलब्धता वाढण्यासाठी मदत होत आहे. 


कॉकरेल किंवा तलंगा पक्षाचे पालन


Kukkutpalan


  • कुक्कुटपालनातील तिसरा प्रकार म्हणजे कॉकरेल किंवा तलंगा पक्षाचे पालन होय. 

  • मोठ्या शहरांमध्ये तंदूर हा प्रकार फारच लोकप्रिय झाला आहे. त्या तंदुरीसाठी तलंगा पक्ष्यांचा वापर केला जातो. 

  • हे सर्व नर पक्षी असतात. हे ९ ते १० आठवडे पाळून सरासरी ६०० ते ७०० ग्रॅम इतक्या वजनाचे झाल्यावर विकले जातात. 

  • अशा पद्धतीने सध्या अंड्यासाठीचे व मांसासाठीचे ब्रॉयलर कोंबडीपालन मोठ्या प्रमाणात केले जात आहे. 

  • करार पद्धतीने कोंबडीपालन करून भरपूर नफा कमवला जात आहे. अंडी व पक्षी यांची विक्री करणे हा भाग अजूनही थोडा अनियंत्रित स्वरूपात राहिलेला आहे. म्हणून

  • शेतकऱ्यांनी बाजारपेठेची उपलब्धतता पाहून व नंतर संपूर्ण शास्त्रीय माहिती घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू केला तर तो नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.


कोंबड्यांना शेडची आवश्यकता 


  • हवामानातील बदल ऊन, वारा, पाऊस, थंडी तसेच इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी कोंबड्यांना घराची (शेडची) आवश्यकता आहे. 

  • प्रत्येक अंडी देणाऱ्या कोंबडीस २.५ ते ३  चौ.फूट जागा लागते. घराची लांबी, पक्ष्यांची लांबी व पक्ष्यांच्या संख्येवर अवलंबून असावी. मात्र रुंदी २५ फुटांपेक्षा जास्त असू नये.

  • घराची लांबी पूर्व पश्चिम असावी. ही घरे जमिनीपासून २ ते २.५ फूट उंचीवर असावी. 

  • सुरुवातीस २.५ ते ३ फूट भिंती घ्याव्यात व त्यावर छतापर्यंत बारीक जाळ्या बसवाव्यात. 

  • मधली उंची १२ ते १५ फूट असावी. व छत दोन्ही बाजूस उतरते असावे.

  • सर्वत्र प्रचलित असलेल्या कोंबड्या पाळण्याच्या दोन पद्धती आहेत. त्या म्हणजे गादी पद्धत (डीप लिटर) व पिंजरा पद्धत होय. 

  • गादी पद्धतीत कोंबड्या जमिनीवर लिटर पसरून त्यावर वाढवल्या जातात. 

  • लिटरसाठी (गादीसाठी) लाकडाचा भुसा, शेंगाचे फोलपट, भाताचे तूस उपयोगात आणतात. यामध्ये कोंबडीची विष्ठा पडते व ती शोषली जाते. 

  • गादी माध्यमे दररोज हलवली जातात. त्यामुळे ही कोरडी राहण्यास मदत होते व शेवटी याचा उपयोग खत म्हणून केला जातो. 


पिंजरा पद्धतीने कुक्कुटपालन 


Kukkutpalan


  • पिंजरा पद्धतीत एक कोंबडी एका पिंजऱ्यात किंवा दोन-तीन कोंबड्या एका पिंजऱ्यात ठेवले जातात.

  • सर्वांसाठी लांब एकच एक पन्हाळ्यासारखे खाद्याचे व पाण्याचे भांडे जोडलेले असते. 

  • यात प्रती पक्षास ६० ते ७० चौरस इंच किंवा एक चौरस फूट जागा दिली जाते. विष्ठा परस्पर पिंजरांच्या खाली केलेल्या खड्ड्यात जमा होते. 

  • प्रत्येक पिंजऱ्याची पुढील उंची १८ इंच व मागील उंची १५ इंच असते. त्यामुळे मागील बाजूस उतार मिळतो. व अंडी गोळा करण्यास मदत होते. 

  • अशा पद्धतीने फायदेशीर कुक्कुटपालन केले जाते. 


कोंबड्यांची (ब्रॉयलर) निर्मिती


Kukkutpalan


  • साधारण १९९० पासून कोंबडी व्यवसायात मोठी वाढ झाली आहे.

  • अंडी देणाऱ्या कोंबड्यांपेक्षा मांसल कोंबड्यांची (ब्रॉयलर) निर्मिती करून त्याचे मार्केटिंग करण्यात अनेक कंपन्या या व्यवसायात उतरल्या आहेत. 

  • एक दिवसाच्या पिलाची विक्रीबरोबरच कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पिलाचा पुरवठा करून तयार झालेल्या कोंबड्यांचे स्वतःच्या व्यवस्थापनाखालील प्रक्रिया उद्योगात अनेक कंपन्या गुंतल्या आहेत. 

  • अंड्यांपासून पावडर तयार करणे, कोंबड्या सोलून त्यांचे मांसावर प्रक्रिया करणे, मांस फ्रिज करून त्यांची निर्यात करणे यासारख्या प्रक्रिया उद्योगातून चांगले पैसे मिळत आहेत. 

अशा पद्धतीने कुक्कुटपालन व्यवसाय प्रगतीच्या दिशेने झपावत असल्याचे सध्याचे चित्र आहे.


#कुक्कुटपालन #poultryfarms #broiler farming #कोंबडीपालन व्यवसाय #contract farming #कॉकरेल #व्हाईटलेगहॉर्न पक्षीपालन #पिंजरा पद्धतीने कुक्कुटपालन #कोंबडीपालनातून रोजगार


© दीपक केदू अहिरे

नाशिक 

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************



गच्चीवरील बाग अर्थात टेरेस गार्डन तंत्रज्ञान (Terrace garden Technology)

गच्चीवरील बाग अर्थात टेरेस गार्डन तंत्रज्ञान

Terrace garden Technology

Gachivaril bag

      टेरेस गार्डन तंत्रज्ञान आता शहरवासींसाठी नवीन राहिलेले नाही. टेरेस गार्डन म्हणजेच गच्चीवरील बाग, सिटी फार्मिंग म्हणजे शहरी शेती, रूफ गार्डन, हायराईज गार्डन, पेट हाऊस गार्डन, अर्बन हायड्रोपोनिक्स, व्हर्टीकल फार्मिंग, बाल्कनी गार्डन, बॅकयार्ड गार्डन, परसबाग हे शब्द जवळ जवळ समानार्थी आहेत. कारण उपलब्ध साधनांच्या वापरानुसार, जागेच्या उपलब्धतेनुसार, ज्ञानानुसार या संकल्पनेचा वापर करून बाग फुलवणे शक्य होत आहे.


नवनिर्मितीचा आनंद


  • मोठ्या शहरांबरोबर लहान-लहान शहरेही आता विस्तार करीत आहे. टेरेस गार्डनमुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होत आहे. 

  • टेरेस गार्डनमुळे आपले घर सुशोभित होते. शिवाय पर्यावरणात सकारात्मक व अपेक्षित परिणाम साधता येतो. 

  • टेरेस गार्डनसाठी स्वतंत्र जागा लागत नाही. गच्चीवर आपल्याला फुलझाडे, फळझाडे व भाजीपाला लावून नवनिर्मितीचा आनंद घेता येतो.  

  • टेरेस गार्डन तंत्रज्ञानामुळे टेरेसवर गार्डन फुलवण्याची किमया शहरातील शहरी शेतकऱ्यांनी करून दाखवली आहे. 


टेरेस गार्डन असे करा


  • टेरेस गार्डन तंत्रज्ञानात टेरेस गार्डन तयार करण्यापूर्वी काही गोष्टी विचारात घेणे गरजेचे असते. 

  • टेरेस गार्डन करण्यासाठी वाढणाऱ्या अतिरिक्त भाराचे व वॉटर प्रुफिंगचे नियोजन बांधकाम करताना करावे लागते. 

  • आपल्या टेरेसचे बांधकाम त्यासाठी मजबूत आहे की नाही याची प्रथम खात्री करून घ्यावी. त्यानंतर ते वॉटर प्रुफिंग केले नसल्यास गळतीची शक्यता असते. 

  • छतावरील पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्था असायला हवी. 


टेरेस गार्डनसाठी वनस्पतीची निवड


Gachivaril bag


  • टेरेस गार्डनसाठी वनस्पतीची निवड करताना ज्या वनस्पतींची मुळे खोलवर जात नाहीत. आजूबाजूला पसरतात अशा वनस्पतींचीही निवड करावी. 

  • मोठ्या वनस्पती लावायच्या असतील तर त्यासाठी मोठ्या कुंड्यांचा वापर करावा. 

  • गच्चीवरील हिरवळीमुळे आतील वस्तू थंड राहतात. उन्हाळ्यात एसी कुलरचा खर्च कमी होतो. ऊर्जाबचत होते. 

  • स्लॅबवरील जमिनीवरील बगीच्याचे आच्छादन तसेच संपूर्ण इमारतीस वेलीनी वेढणे यामुळे ग्लोबल वार्मिंग घटण्यास मदत होते. 

  • टेरेसवरील वातावरण आल्हादायक होऊन टेरेस गार्डनमधील कामात आपला रिकामा वेळ चांगला मार्गी लागतो. 


बागांची निगराणी



  • गच्चीवरील बाग उद्यानशास्त्राच्या व्याख्येनुसार दोन प्रकारात मोडते. 

  • बंगला अथवा स्वमालकीच्या २ ते ३ मजली प्रकारात मोडते. बंगला किंवा स्वमालकीच्या घराच्यावर केलेली कुंड्यांची बाग आणि बहुमजली इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर तयार केलेले विस्तीर्ण उद्यान यालाच टेरेस गार्डन असेही म्हणतात. 

  • या प्रकारात गच्चीवर विशिष्ट प्रकारचे खास आवरण टाकावे लागते. 

  • या उद्यानात मोठ्या प्रमाणावर हिरवळ, छोटे वृक्ष, फुलझाडे यांना प्राधान्य असते. 

  • कुंड्यांचा वापर फार कमी असतो. अनेक ठिकाणी अख्खी गच्ची यासाठी वापरली जाते. आणि पाणीसुद्धा तुषार पद्धतीने दिले जाते. 


मध्यमवर्गीयांचे प्रेम असलेली बाग 


Gachivaril bag

  • अशी भव्य दिव्य प्रशस्त उद्याने आपणास दक्षिण आणि मध्य मुंबईत अनेक इमारतीच्या गच्चीवर पहावयास मिळतात. 

  • खाजगी मालकीच्या या बागांची निगराणी ठेवणे हे अतिशय कौशल्याचे काम आहे. 

  • मात्र सध्या सुरू असलेल्या हरीत इमारत मोहिमेमध्ये ही संकल्पना अनेक उद्योगसमूहांकडून सर्वत्र उचलली जात आहे हे महत्त्वाचे आहे. 

  • मध्यमवर्गीयांचे प्रेम असलेली गच्चीवरील बाग स्वमालकीच्या घरावर छान तयार करता येते. मात्र त्यासाठी गच्चीचा १/३ भागच वापरावा. कुंड्या आकाराने थोड्या मोठ्या व एकसारख्या असाव्यात. 


उपयोगात येणारे गच्चीवरील बाग तंत्र 


Gachivaril bag

  • लोकसंख्येच्या वाढणाऱ्या प्रमाणात प्रत्येकाच्या तोंडाला अन्न पुरेसे असणे गरजेचे असल्यामुळे भारतात कृषीक्रांती झाली. 

  • ही क्रांती म्हणजे अधिकचे उत्पादन देणारी रासायनिक क्रांती होती. तिचे बरे वाईट परिणाम आता दिसू लागले आहेत. 

  • या कृषी क्रांतीतील रासायनिक खते व कीटकनाशकांच्या फवारणीमुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम, पर्यावरणीय तोटे व वातावरणातील बदल आता समोर येत आहे. 

  • रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकांच्या फवाऱ्यामुळे मानवी आरोग्यावर होणारे दुष्परिणाम आता दिसत आहेत. 

  • रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशकाच्या फवाऱ्यामुळे शेतजमिनीची उत्पादकता कमी होत आहे. 

  • उत्पादन खर्च वाढला पण उत्पादन कमी झाले आहे.रासायनिक खतांचा व कीटकनाशक फवाऱ्याचा जमिनीवर व अन्नसाखळीवर, मानवी जीवनावर व आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ लागला आहे. 

  • आपण भरल्या पोटाने आजारी राहू लागलो. अनेक आजार बळावल्याचे आपण बघतो. 

  • पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा विनाश पाहता गच्चीवरील बाग हे तंत्र उपयोगात येणारे आहे. 


गच्चीवरील बाग : प्रभावी उपक्रम


Gachivaril bag


  • दिवसेंदिवस वाढणारे जागतिक तापमान हा सगळ्यांचा चिंतेचा प्रश्न बनला आहे. 

  • औद्योगीकरणाच्या वाढत्या प्रमाणामुळे, हवेमध्ये मिसळणाऱ्या विषारी वायूमुळे श्वसनाचे आजार वाढले आहे. 

  • तसेच पक्ष्यांची कमी होणारी संख्या या व अशा एक ना अनेक प्रश्नांवर टेरेस गार्डन अर्थात गच्चीवरील बाग हा खात्रीचा, सर्वकालीन व कुठेही राबवता येणारा, सर्वांचा सहभाग घेता येईल असा प्रभावी उपक्रम घराघराच्या टेरेसवर राबवता येईल यात शंका नाही. 

ठोस पर्याय

  • आजच्या घडीला दिवसेंदिवस शहरांचा विस्तार वाढतच जाणार आहे. 

  • तज्ज्ञांच्या मतानुसार येत्या दहा वर्षात शहरी करणाचा वेग हा 70 टक्केपेक्षा अधिक असणार आहे.

  • शहराचा विस्तार, दाट वस्तीमुळे, शेतीचे, जंगलांचे प्रमाण हे कमी होत जाणार आहे. 

  • तसेच जंगलातील शेती (टेरेस फार्मिंग)करण्यामुळे माळीण गावासारख्या दुर्घटना घडून जीवित,आर्थिक व जंगलांची हानी होत आहे. 

  • शहरी सिमेंटच्या वाढत्या जंगलात अन्नाची वाहतूक करून खर्च, प्रदूषण, वाया जाण्याचे प्रमाण वाढत असताना पर्यावरणाचे रक्षण विविध अंगानी करणे मानवाचे काम आहे. 

  • हे आव्हानात्मक काम टेरेस गार्डन फार्मिंगच्या तंत्रातून पार पाडता आले तर हे काम सुकर होईल. आपल्याला पुढील पिढीला पर्यावरण सुरक्षेसाठीचा ठोस पर्याय देता येईल. 


सांडपाणी, कचरा विल्हेवाटीची व्यवस्था 


Gachivaril bag

  • टेरेस गार्डन तंत्रज्ञानाने सिमेंटच्या रखरखीत पांढऱ्या रंगाच्या इमारतीच्या जंगलाला हिरवे आच्छादन लावणे सर्वांच्याच फायद्याचे व उपयोगाचे ठरणार आहे. 

  • गच्चीवरील बाग या तंत्रात सर्वात जास्त वापरला जाणारा घटक म्हणजेच काडीकचरा होय. 

  • टाकाऊ भाजीपाला व या सर्वांपासून निर्माण होणारे कंपोस्टिंग खत होय. सुका काडीकचरा हा एकतर जाळला जातो. तर टाकाऊ भाजीपाला हा निव्वळ कचरा म्हणून कचरा डेपोवर नेऊन टाकला जातो. 

  • ही सार्वजनिक कचरा विल्हेवाटीची व्यवस्था आज बरीच त्रासदायक, खर्चिक आहे. 

  • हाच कचरा प्रत्येक कुटुंबाचा, सोसायटी, कॉलनीच्या पातळीवर कंपोस्ट केला गेला तर बऱ्याच अंशी कचऱ्याचा प्रश्न जागेवरच सुटू शकतो. 

  • तसेच सांडपाण्याची थोड्या प्रमाणात प्रक्रिया करून त्याची विल्हेवाटसुद्धा गच्चीवरील बागेत लावता येते. 

  • अशा कचऱ्याशी व सांडपाण्याशी निगडित असलेले सगळेच प्रश्न निकालात काढण्यासाठी गच्चीवरील बाग हा सर्वोत्तम पर्याय आहे. 

  • अशा कचऱ्यापासून गांडूळखतही बनवता येऊ शकते. हेच गांडूळखत गच्चीवरील बागेला देऊन उत्पादन काढता येते. 


टेरेस गार्डनमुळे आपल्याला आपणच तयार केलेला विषमुक्त ताजा भाजीपाला, फळझाडे, फुले वर्षभर प्राप्त होतील स्वतःच्या नवनिर्माणातून केलेली गच्चीवरील बागेची क्रांती खऱ्या अर्थाने फलदायी होईल.

#परसबाग #गच्चीवरील शेती #Terrace garden Technology #शहरी शेती #city farming #Roof garden #paint house garden #vertical garden #बाल्कनीगार्डन #गच्चीवरील बाग 

© दीपक केदू अहिरे,

नाशिक

deepakahire1973@gmail.com

www.ahiredeepak.blogspot.com

www.digitalkrushiyog.com

digitalkrushiyog@gmail.com

******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram : 
******************************************
YouTube :

******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :

******************************************




सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...