name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): भोवाडा (Village Program : Bhovada)

भोवाडा (Village Program : Bhovada)

भोवाडा (Village Program : Bhovada)

       आपला भारत देश हा खेड्यापाड्यात वसलेला आहे. ग्रामीण परिसर हा भारताचा आत्मा आहे. या ग्रामीण परिसरात राहणाऱ्या लोकांच्या काही रुढी आहेत, काही परंपरा आहेत. हे ग्रामीण लोक या रूढीपरंपरांना अभिमानास्पदरीत्या चिकटून बसलेले आहेत. सालाबादप्रमाणे गावात वर्षातून एकदा यात्रा भरणे हा रूढी परंपरेचाच एक भाग आहे आणि एकदा गावाची यात्रा म्हटली की, लोकांच्या उत्साहाला उधाण येत असते. गावची यात्रा दहा-बारा दिवस पुढे असते तेवढ्यात गावात काय कार्यक्रम करायचे ते गावातील प्रतिष्ठित लोक ठरवीत असतात अशा रीतीने कार्यक्रमाची रूपरेषा आखल्यानंतर हे लोक संपूर्ण गावातून वर्गणी (देणगी) जमा करतात. त्या वर्गणीतून काही करमणुकीचे कार्यक्रम ठेवत असतात. या कार्यक्रमांमध्ये भोवाडा किंवा तमाशा असे मनोरंजनाचे कार्यक्रम असतात.

Bhovada


भोवाड्याचा कार्यक्रम

       होळीच्या अगोदर ज्या गावात यात्रा भरते तेथे शक्यतो तमाशाचा कार्यक्रम असतो. मात्र होळीनंतर म्हणजे अक्षय्यतृतीयेच्या वेळेला जर यात्रा येत असेल तर तिथे भोवाड्याचा कार्यक्रम होतो. कारण भोवाडा तयार करायला बरेच कष्ट घ्यावे लागतात. व उन्हाळ्यात लोकांना शेतीची कामे फारशी नसतात त्यामुळे ते मनोरंजनासाठी भोवड्याचा कार्यक्रम करीत असतात. भोवाड्याचा कार्यक्रम हा मुख्यतः तीन दिवसात विभागलेला असतो. भोवाड्यात रावणाचे पात्र बरेच मोठे असल्याने रावणाचे पहिला रावण, दुसरा रावण व तिसरा रावण असे विभाजन केलेले असते. हा भोवाडा आदिवासी भागात मात्र वेगळ्या पद्धतीने होतो. तेथे पाच दिवसांचा भोवाडा असतो. आणि तो भोवाडा हा देवीचा असतो. मात्र आपल्या ग्रामीण भागात जो भोवाडा होतो त्यातून मुख्यतः रामायणच दाखवीले जाते.  या भोवाड्यातून मुख्यतः दोन हेतू साध्य केले जातात. त्यातला पहिला म्हणजे यात्रेच्या निमित्ताने लोकांची करमणूक करणे आणि दुसरा म्हणजे या भोवाड्यातून लोकांना रामायणाची कल्पना करून देणे. कारण पूर्वी सुशिक्षितांचे प्रमाण कमी होते त्यामुळे ग्रंथ वाचणे आणि लिहिणे अत्यंत कठीण होते. आणि त्याचबरोबर या लोकांच्या मागे शेतीची कामे असल्यामुळे त्यांना वाचण्यास वेळ नसे. त्यामुळे भोवाड्याच्या ह्या तीन दिवसात लोकांची करमणूकही केली जात असे आणि यातून लोकांना रामायण कसे घडले? राम कोण होता? कसा होता? रावण कोण, कसा होता? इत्यादी गोष्टींचे आकलन होत असे.

भोवाड्याचे विभाजन  

    आपल्या ग्रामीण भागातल्या ह्या भोवाड्याचे विभाजन तीन दिवसात केलेले असल्यामुळे ह्या भोवाड्याची सुरुवात पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून, नारळ फोडून केली जाते. सुरुवात झाल्यानंतर त्या दिवशी विविध प्राण्यांची सोंगे बाहेर येत असतात. या सोंग्यांमध्ये अस्वल, हरीण, माकड इत्यादी प्राण्यांचे मुखवटे तयार करून तशा प्रकारची वेशभूषा केलेली असते. मुखवटे कागदाचा लगदा करून त्यात डिंक टाकून तयार केलेली असतात. ज्या व्यक्तीने हे सोंग घेतलेले असते त्या व्यक्तीला ते वैयक्तिक खर्चाने करावे लागते किंवा भाड्याने आणावे लागते. पहिला दिवस हा सुरुवातीचा असल्यामुळे त्या दिवशी थोडीच सोंगे बाहेर येतात. पहिल्या दिवसाचा कार्यक्रम हा रात्री १२ ते १२.३०पर्यंत चालत असतो.

रात्रभर चालणारा सीतास्वयंवर 

        दुसऱ्या दिवसाचा कार्यक्रम हा करमणुकीच्या दृष्टीने मजेदार व आकलनाच्या दृष्टीने अतिशय उत्कृष्ट असतो. ह्या कार्यक्रमाला एक विशिष्ट असा ग्रामीण शब्द आहे. तो म्हणजे ' सीता सैवर' (सीतास्वयंवर) या दिवशी संपूर्ण रात्रभर कार्यक्रम चालतो. सुरुवातीला राम,लक्ष्मण व सीता ही पात्रे येतात.  पात्राच्या संभाषणासाठी विशिष्ट अशी जागा ठेवलेली असते. या विशिष्ट जागेतच ही पात्रे फिरत असतात. व संभाषण चालू असते. राम-लक्ष्मण व सीता हे एकमेकांच्या हातात हात घालून फिरत असतानाच चित्रविचित्र रूप घेतलेले आग्यावेताळाचे पात्र येते. ते बेसुमार किंचाळात नाचत असते. त्याच्या हातात पेटती मशाल असते. त्यानंतर शबरीचे पात्र येते. 

       शबरीचे व रामाचे संभाषण चालत असतानाच मारीच राक्षस सुंदर अशा हरणाच्या वेषात येतो. व त्याला मारण्यास राम- लक्ष्मण बाजूला जाताच बैराग्याच्या  वेषातील पहिला रावण हा सीतेला पळवून नेतो. त्यावेळेला सीतेचे किंचाळणे अतिशय हृदयभेदक असते. सीता व बैराग्याच्या वेषातील रावण ही पात्रे निघून गेल्यानंतर राम-लक्ष्मणाचे अतिशय शोकपूर्ण संभाषण होते. त्याचवेळेला त्यांना गरुड पक्षाचे सोंग भेटते. त्यानंतर मारुतीचे सोंग येते. मारुतीची राम-लक्ष्मणाशी भेट होते. मारुती सीता शोधासाठी निघून जातो. त्यानंतर वाली, सुग्रीव ही पात्रे येतात. त्यानंतर वेगवेगळी राक्षसपात्रे बाहेर येतात आणि त्यानंतर पहिला रावण बाहेर येतो. त्याचे संभाषण होते व शेवटी त्याच दिवशी सीतेचा शोध लागतो. अशारीतीने संपूर्ण रात्रभर अतिशय मनोरंजनात्मक असा कार्यक्रम होतो.

भोवाड्याचा शेवट

       त्यानंतरचा तिसरा दिवस हा भोवाड्याचा शेवटचा दिवस असतो. हा दिवस सर्वात रोमांचकारी दिवस असतो. ह्या दिवशी दुसरा रावण व तिसरा रावण हे एकत्र पात्र एका ताटीला दहा मुखवटे लावून ते हातात घेऊन नाचत असतात. रावणाच्या संभाषणाची एक विशिष्ट जागा असते. तिला ग्रामीण शब्द कचेरी असा आहे. रावण या कचेरीवर चढल्यावर त्याच्या पायांचा होणारा आवाज व तोंडातून निघणारा आवाज यामुळे एक भारदस्तपणा येतो. जो राक्षस म्हणून शोभू शकेल त्याच्याबरोबर सुरुवातीला विभीषणाचे संभाषण होते. याला थोडक्यात 'विभीषण शिष्टाई' असे म्हणतात. विभीषणाच्या संभाषणातून रावणाने आत्तापर्यंत काय केले व त्याचे फळ त्याला काय मिळाले याचे रसपूर्ण वर्णन यात व्यक्त होते. त्यासाठी श्लोककाराने घातलेले संभाषण असे..
रावणा रावणा तू राज्य गंभीर केले l
सीतेसारखे रत्न तू चोरून नेले ll
सीतेसारखे रत्न तुला पचेना 
चौदा चौकडी राज्य तुला मिळेना ll
यातून रावणाचे चारित्र्य लोकांना कळते. हे संभाषण झाल्यानंतर रावणाबरोबर अंगतचे संभाषण चालते. याला 'अंगत शिष्टाई' असा शब्द आहे.

रावणाचा वध

        अशा पद्धतीने 'अंगत शिष्टाई' पर्यंत सर्व इतर राक्षसांचा संहार झालेला असतो. आणि शेवटी फक्त रावण शिल्लक राहतो. तो कचेरीवरून खाली उतरतो. सुरुवातीला ताटी घेऊन तुफान नाचतो. त्याच्याबरोबर इतर सोंगे नाचतात. त्यात वानरसेना भरपूर असते आणि पहिल्या व दुसऱ्या दिवशी जी पात्रे बाहेर आलेली असतात त्यातून जी मेलेली असतात ती पात्रे सोडून सर्वच पात्रे बाहेर येतात. त्यावेळेला ही पात्रे भरपूर नाचतात. नाचता - नाचता ते भांडण खऱ्या अर्थाने रावणाविरुद्ध इतर सर्वच पात्रांचे असते. सुरुवातीला रावण सर्वच पात्रांना पुरून उरतो. हा संघर्ष बराच वेळ चालतो आणि नंतर रामाकडून रावणाचा वध होतो आणि ह्या भोवाड्याची सांगता होते.

       अशा पद्धतीने पहिल्या दिवशी गणपतीची पूजा वगैरे करून सुरू झालेला हा भोवाडा तीन दिवस लोकांचे मनोरंजन करून तिसऱ्या दिवशी पहाटे रावणाचा वध झाल्यानंतर संपतो. ह्या भोवाड्यामुळे गावातील सर्व लोक एकत्र येतात. मोठ्या आनंदोत्सवात हा भोवाड्याचा कार्यक्रम होतो. भोवाडा संपल्यानंतर त्याच दिवशी कुस्त्यांचा कार्यक्रम होतो व गावातील लोकांची यात्रा संपते.

भोवाडा
खेड्यापाड्यात वसलेला देश माझा
करमणुकीसाठी होतो भोवाडा,
तीन दिवसात विभागलेला कार्यक्रम
पाहण्यासाठी जमतो अख्खा गावगाडा....

पूर्वी करमणुकीसाठी नव्हते काही साधन
भोवड्यातून सादर व्हायचे रामायणाला,
शेतकरी समाज शेतीत रममाण
भोवाड्याच्या निमित्ताने यायचा जागरणाला....

विविध प्राण्याची सोंगे भोवड्यात असतात
दुसऱ्या दिवशी असते सीता स्वयंवर,
हुबेहूब चितारले जाते रामायणातील पात्र
राक्षस संहाराने उठते येथे आनंदी लहर....

सुरुवातीला रावण उरतो पात्रांना उरून
संघर्ष हा बराच वेळ चालतो,
रामाकडून होतो रामाचा वध
तेव्हा भोवाड्याचा आनंदोत्सव संपतो...

© दीपक केदू अहिरे, नाशिक


© दीपक केदू अहिरे, नाशिक



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...