शेतकरी उत्पादक कंपनी : स्थापना,फायदे आणि योजना
शेतकरी उत्पादक कंपनी (एफपीसी: फार्मर प्रोड्युसर कंपनी) स्थापन करण्याची प्रक्रिया कंपनी कायदा २०१३ नुसार केली जाते. ही कंपनी शेतकऱ्यांनी स्वतः स्थापन करून चालवायची असते आणि याचा मुख्य उद्देश म्हणजे शेतकऱ्यांच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देणे हा आहे.
प्रक्रिया, साठवण, विक्री यामधून अधिक नफा मिळवणे हा उद्देश आहे. एक एकट्या शेतकऱ्याने प्रयत्न करण्यापेक्षा सर्व सदस्यांनी मिळून प्रयत्न केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होत असल्याचे अनेक उदाहरणे आहेत. निविष्ठा खरेदी, यंत्राचा वापर, काढणी, प्रक्रिया, साठवणूक, पॅकिंग, ब्रॅण्डिंग, विपणन सुविधा लाभ शेतकरी उत्पादक कंपनीच्या सदस्यांना मिळतो.
शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापना करण्यासाठी किमान १० व्यक्ती (शेतकरी) किंवा २ प्रोड्युसर इन्स्टिट्यूशन्स (उत्पादक संस्था) सदस्य असणे आवश्यक आहे. सर्व सदस्य शेतकरी किंवा कृषी उत्पादनाशी संबंधित असावेत. नोंदणीसाठी किमान ५ संचालक लागतात. वैयक्तिक उत्पादक शेतकरी अथवा उत्पादक संस्था फक्त कंपनीचे सभासद होऊ शकतात. अधिकृत भांडवल साधारण एक लाखापासून सुरुवात करता येते.
आवश्यक कागदपत्रे
शेतकरी उत्पादक कंपनी स्थापनेसाठी आवश्यक कागदपत्रे लागतात त्यात सदस्य / संचालकांची कागदपत्रात आधार कार्ड, पॅन कार्ड, २ पासपोर्ट साईज फोटो, राहण्याचा पुरावा (विज बिल/ रेशन कार्ड /मतदान ओळखपत्र), जमीन ७/१२ उतारा (शेतकरी असल्याचा पुरावा) कंपनीसाठी : कंपनीचे नाव (३ पर्याय तयार ठेवावेत), नोंदणीसाठी पत्ता पुरावा (विज बिल / मालमत्ता कर पावती / भाडे करार) ही कागदपत्रे लागतात.
नोंदणीची प्रक्रिया
कंपनीचे नाव आरक्षण पोर्टलवर रिझर्व्ह युनिक नेमद्वारे करावे लागते नंतर डिजिटल सिग्नेचर मिळवणे गरजेचे आहे. हे सर्व संचालकांसाठी आवश्यक असते, त्यानंतर डीन म्हणजेच डायरेक्टर आयडेंटीफिकेशन नंबर मिळवणे गरजेचे असते. नंतर इनकॉर्पोरेशन फॉर्म भरून सबमिट करावा यात एमओए (मेमोरँडम ऑफ असोसिएशन) आणि एओए (आर्टिकल्स ऑफ असोसिएशन) तयार करतात. रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडून प्रमाणपत्र मिळते. यानंतर कंपनी कायदेशीररीत्या अस्तित्वात येते. कंपनीसाठी कर विभागाकडून पॅन व टॅन काढता येतो. कंपनीच्या नावाने बँक खाते उघडता येते.
स्थापनेनंतर करावयाच्या गोष्टी
शेतकरी उत्पादक कंपनीची जीएसटी नोंदणी (जर व्यवहार ४० लाखांपेक्षा जास्त किंवा उत्पादन प्रक्रियेशी संबंधित असेल तर) करावी. कृषी विभाग, नाबार्ड, एसएफएसी इ. संस्थेकडून अनुदान / योजना अर्ज करावा. व्यवसाय योजना (बिझनेस प्लॅन) तयार करावा जसे कि उत्पादन खरेदी, प्रक्रिया, विक्री, मार्केटिंग याविषयी करावा.
एफपीसी स्थापनेचे फायदे
शेतकरी उत्पादक कंपनी सदस्यांना मिळणारा नफा डिव्हिडंड स्वरूपात वाटला जातो.कर्ज, अनुदान, प्रशिक्षण, मार्केट लिंकेज यामध्ये सरकारी मदत मिळते. उत्पादन प्रक्रिया, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून जास्त दरात विक्री करता येते.शेतकरी उत्पादक कंपनीसाठी (एफपीसी) केंद्र व राज्य सरकारतर्फे अनेक विशेष सहाय्य योजना उपलब्ध आहेत. या योजनांमधून आर्थिक अनुदान, कर्ज, प्रशिक्षण, मार्केटिंग व इन्फ्रास्ट्रक्चर विकासासाठी मदत मिळते.
शेतकरी उत्पादक कंपनीसाठी प्रमुख योजना
१) एसएफएसी (स्मॉल फार्मर्स ऍग्री बिझनेस कॉन्सोर्टियम) केंद्र शासनाकडून इकॉनॉमिक असिस्टन्स स्कीम या अंतर्गत एफपीसीला १५ लाखांपर्यंत मॅचिंग इक्विटी ग्रांट मिळते. क्रेडिट ग्यारंटी फंड स्कीम अंतर्गत कोलॅटरल-फ्री कर्जाची हमी मिळते.याचा उद्देश हा लहान व सीमांत शेतकऱ्यांना एकत्र आणून व्यवसायात मदत करणे हा आहे. अधिक माहितीसाठी कृषी मंत्रालय भारत सरकारच्या sfacindia.com या वेबसाईटला भेट द्यावी.
२) नाबार्ड सहाय्य योजना अंतर्गत एफपीसी स्थापन व चालवण्यासाठी प्रोत्साहन निधी दिला जातो. प्रशिक्षण, क्षमता विकास, व्यवसाय योजना तयार करणे, इन्फ्रास्ट्रक्चर बांधणे यासाठी आर्थिक मदत केली जाते. ही मदत नाबार्ड प्रोड्युसर ऑर्गनायझेशन डेव्हलपमेन्ट फंड (पीओडीएफ) अंतर्गत केली जाते.
३) कृषी मंत्रालय – केंद्र शासनामार्फत फॉर्मेशन अँड प्रोमोशन ऑफ १०,००० एफपीओ स्कीम (२०२०-२५) अंतर्गत देशभर १०,००० FPO स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक एफपीओला ५ वर्षेपर्यंत वार्षिक ₹१८ लाख पर्यंतचे आर्थिक सहाय्य (व्यवस्थापन, पगार, भाडे इत्यादीसाठी) देण्यात येणार असून अतिरिक्त ₹२ कोटीपर्यंत कार्यभांडवल व पायाभूत सुविधा कर्ज मिळणार आहे.
४) महाराष्ट्र शासनाच्या योजनेअंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी उत्पादन संस्था योजना राबविण्यात येते. राज्यातील एफपीसीला नोंदणी शुल्क, प्रशिक्षण व व्यवसाय योजना तयार करण्यासाठी मदत या योजनेअंतर्गत दिली जाते. महाराष्ट्र कृषी व्यवसाय विकास प्रकल्प (मॅग्नेट) अंतर्गत मार्केट लिंकेज, प्रोसेसिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग यासाठी अनुदान मिळते. राज्य कृषी विभागाचे क्लस्टर विकास कार्यक्रम अंतर्गत विशेष पिकांसाठी गट आधारित मदत मिळते.
५) नॅशनल को-ऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनसीडीसी) तर्फे कृषी प्रक्रिया उद्योग, गोदाम, कोल्ड स्टोरेज, वाहतूक यासाठी कर्ज व अनुदान मिळते.
६) इतर योजना व मदत स्रोत लक्षात घेता अपेडातर्फे निर्यातक्षम कृषी उत्पादनांसाठी प्रक्रिया, पॅकेजिंग व निर्यात प्रोत्साहन मिळते. एमआयडीएच तर्फे बागायती उत्पादक एफपीसीला पायाभूत सुविधा अनुदान मिळत असून पीएम फॉर्मलायझेशन ऑफ मायक्रो फूड इंटरप्रिंसेस तर्फे एफपीसीला ३५ टक्के पर्यंत कॅपिटल सबसिडी मिळते.
काही यशस्वी शेतकरी उत्पादक कंपन्या
१) नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीची स्थापना २०१० मध्ये झाली असून एकात्मिक फळे व भाज्या मूल्य साखळी प्रणाली: ताज्या आणि प्रक्रिया केलेल्या उत्पादनांसाठी पॅक हाऊस, कोल्ड स्टोरेज कॉम्प्लेक्स, सॅप बेस्ड ट्रेसीबिलिटी प्रणाली यांसह संपूर्ण व्हॅल्यू चेन विकसित केली आहे. या कंपनीत ३०,००० हून अधिक शेतकरी सदस्य असून सुमारे ३०,००० एकर क्षेत्र आहे. यात विविध फळभाजी उत्पादन (द्राक्ष, टोमॅटो, इ.) यावर आधारित उत्पादन प्रणाली विकसित केली असून २०२३-२४ या आर्थिक वर्षात सह्याद्री शेतकरी उत्पादक कंपनीची उलाढाल १५३० कोटींपर्यंत वाढली आहे. भारतातील ही अग्रगण्य एफपीसी म्हणून ओळखली जाते.
२) बुलढाणा येथील जय सरदार फार्मर प्रोड्युसर कंपनी स्थापन झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच त्यांनी कामगिरीने खास स्थान प्राप्त केले.त्यांनी मार्केट बेस्ड इन्स्ट्रुमेंट्सचा उपयोग करून मूल्य जोखीम (price risk) हाताळण्याचे यशस्वी प्रयत्न सुरू केले. तसेच कंपनीची सदस्यसंख्याही वाढवली. भविष्यात नाबार्डकडून २००० चौ फूट गोदाम बांधण्यासाठी मदत मिळवली.
३)पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील धांगरवाडी येथील कृषिजीवन ऍग्रो फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असून महाराष्ट्रातील पहिली अशी एफपीओ जी पीपीपी (पब्लिक–प्रायव्हेट- पार्टनरशिप) मॉडेलवर कार्य करते. हे मॉडेल सरकार, खाजगी संस्थांसह कार्य करून विकास करत आहे.
४) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथील सावित्रीबाई फुले फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना ६ मे २०१६ रोजी झाली असून युवा मित्र संस्थेच्या पुढाकाराने नाबार्डच्या आर्थिक साहाय्याने ही एफपीसी सुरू करण्यात आली. महिलांना शेळीपालनाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सबल करणे हा या एफपीसीचा उद्देश आहे. या कंपनीत २,००० महिला सदस्य आणि ६८८ भागधारक असून १५,००० शेळ्या आहेत, ज्यामध्ये मुख्यतः उस्मानाबादी आणि संगमनेरी जातींचा समावेश आहे. शेळ्यांचे दूध व अन्य उत्पादनांची विक्री ब्रँड “सावि”अंतर्गत विकली जातात
याव्यतिरिक्त वनश्री फार्मर्स प्रोड्युसर कं.(नंदुरबार), ग्रीनअप फार्मर प्रोड्युसर कं.(अहिल्यानगर), कृषी नवकल्पना फार्मर प्रोड्युसर कं. (जुन्नर, पुणे), इगतपुरी तालुका फार्मर्स प्रोड्युसर कं.(इगतपुरी), पुरंदर हायलँड्स फार्मर प्रोड्युसर कं (पुरंदर, पुणे), विरांगणा महिला शेतकरी उत्पादक कंपनी (मालेगाव), वनराज फार्मर प्रोड्युसर कं (पेठ,नाशिक), कृषक स्वराज स्पाईसेस शेतकरी उत्पादक कंपनी लि.(चंद्रपूर), आदर्श ऍग्री फार्मर प्रोड्युसर कं (शिरूर,पुणे) या शेतकरी उत्पादक कंपन्यांचे काम वाखाणण्याजोगे आहे. महाराष्ट्र राज्य ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत १५ महिला एफपीसी स्थापन केल्या आहेत.
महाराष्ट्रातील या प्रातिनिधिक शेतकरी उत्पादक कंपन्या कशा स्वरूपात काम करतात, त्यांची उद्दिष्टे कशी साध्य करतात आणि शेतकरी सदस्यांसाठी कशा लाभदायक ठरतात हे स्पष्ट करतात. जागतिक स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे आहे. शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून हे संघटन होऊन शेतकरी सक्षम होऊ शकतो याचा मला विश्वास वाटतो.
#nabard schemes for farmer producer company #sahyadri farmers producer company #top 10 farmer producer company in india #farmer producer company registration
© दीपक केदू अहिरे
नाशिक
www.ahiredeepak.blogspot.com
No comments:
Post a Comment