साहित्यिकांच्या शब्दात 'पाऊस'
'Rain' in the words of writers
अश्मयुगापासून तर आजच्या अणुयुगापर्यंत मानवी मनाचे पावसाशी नाते आहे. भावनांच्या अदिम आविष्कारापासून तो अभिजात स्पंदनांपर्यंत 'पाऊस' सर्वसाक्षी आहे. अनेक लेखकांनी, कवींनी पावसावर लिहिले. पावसाचे आणि त्यांचे नाते इतके घट्ट आहे जसे जीवन-मरणाचे, मातीचं आणि पावसाचं नातं सांगणारी कविता शांता शेळके सहजपणे करून जातात
'आला पाऊस मातीच्या वासात गं...
मोती गुंफीत मोकळ्या केसात गं...
पावसाच्या थेंबाचं संजीवन धरतीला मिळालं की धरती टवटवीत होते. उन्हाळ्याने केलेला कठोर आघात विसरण्याचा प्रयत्न करते. अरुणा ढेरेंच्या कवितेत 'पाऊस' वेगळाच भासतो-
'घन आले म्हणता म्हणता
पाऊस असा आला की
जरी मिटुनी घेतले डोळे
हृदयाची भिजली माती
तू ओंजळ फक्त पसरली
अन् म्हटले नाही काही
सोसल्या अनावर धारा
जशी सोसत असते बाई !'
मंगेश पाडगावकरांना प्रियकराला आर्जवून सांगणाऱ्या सखीच्या भूमिकेत पाऊस दिसतो
'मातीच्या ओल्या ओल्या वासात
वाऱ्याच्या खोल खोल श्वासात
झाडाचं भिजणं सुंदर आहे
माझ्या जीवा जगणे सुंदर आहे.'
पाऊस कधी मातीच्या कुशीत तान्हं बाळ होतं, मोराचं पीस खोवलेला नटखट श्यामल कान्हा होतो. कधी पाऊस छेड काढतो म्हणून इंदिरा संत आपल्या कवितेत म्हणतात-
'नको नको रे पावसा,
असा धिंगाणा अवेळी
घर माझे चंद्रमौळी
आणि दारात सायली
जमिनीवर कोसळणाऱ्या पावसाच्या धारांना पाहून कविवर्य बा. भ. बोरकर म्हणतात -
'बरसे रे घन बरसे रे
बरसे जलसर आले सरसर
मल्हाराचे स्वरसे रे,
बन बरसे रे!'
वा. रा. कांताच्या काव्यातून होणारी पाऊसभेट नि झपाटणारं प्रेम काव्यातून अनुभवायला रसिकमन हवं. ते म्हणतात -
'केस चिंब ओले होते
थेंब तुझ्या गाली
ओठावर माझ्या त्यांची
किती फुले झाली
श्वासांनी लिहिली गाथा
प्रीतीच्या रसाची
अंतःकरणातून दाटून आलेलं दुःख पावसांच्या धारांनी एकरूप होते. याचा प्रत्यय ग्रेस यांच्या कवितेत येतो
'पाऊस कधीचा पडतो
झाडांची हलकी पाने
हलकेच जाग मज ओली
दुःखाच्या मंद सुराने ॥"
अशाप्रकारे साहित्यिकांच्या मनात पावसाने घर केलेले आहे. पावसाची विविध रूपे आपल्याला भुरळ पाडतात. पाऊस हवाहवासा वाटतो कारण तो जमिनीची भूक तर भागवतोच, पण आपल्या मनाचीही भागवतो. म्हणून म्हणावंसं वाटतं-
'पाऊस मातीलाच नव्हे तर
मनालाही भिजवतो
कोंब कोंब मातीत नव्हे
मनातही उगवतो."
दीपक के. अहिरे
आनंदपूर / नाशिक
(पूर्व प्रसिध्दी : दै. लोकमत दि. ९ ऑगस्ट १९९८)
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment