रामोजी फिल्मसिटी, रामोजी राव आणि मीRamoji Filmcity, Ramoji Rao and Me
रामोजी फिल्मसिटीचे सर्वोसर्वा रामोजी राव यांचे ५ जून रोजी निधन झाल्याचे कळले. खूप वाईट वाटले. माझा रामोजी फिल्मसिटी मधला प्रवास डोळ्यासमोर तरळला. मी रामोजी फिल्मसिटीमध्ये अन्नदाता मासिकाचा सहसंपादक म्हणून काम केले.
मी पहिल्यांदाच हैदराबादमध्ये गेलो तेव्हा फक्त त्यांच्या साम्राज्याविषयी वरवर माहिती होती. पण प्रत्यक्ष जेव्हा रामोजी फिल्मसिटीमध्ये एसपीटू या कॉर्पोरेट बिल्डिंगमध्ये गेलो तेव्हा रामोजीराव यांच्या प्रचंड कारभाराची जाणीव झाली. सामान्य कुटुंबात जन्मलेल्या रामोजी राव यांनी असामान्य कामगिरी केली. ते रामोजी फिल्मसिटीचे अनभिषिक्त सम्राट होते. जगातील सर्वात मोठा फिल्म स्टुडिओ संकुल म्हणून रामोजी फिल्म सिटीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली होती. पहिल्यांदा मी जेव्हा सहसंपादक म्हणून रुजू झालो तेव्हा त्यांच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलो.
ऑफिस कसले तो एक महालच भासत होता. कोनेच्या लिफ्टने वरच्या मजल्यावर गेलो. रामोजीराव यांनी शांत नजरेने माझ्याकडे बघितले. मी हाताने अभिवादन केले. माझ्यासमवेत माझे वरिष्ठ साहेब रंगाराव होते. ते तेलगुत रामोजीराव त्यांच्याशी बोलले. मी दुसऱ्या दिवसापासून रुजू झालो.
दीपक अहिरे
रामोजी फिल्मसिटी मध्ये माझ्या निवासाची व्यवस्था पॉश रूममध्ये करण्यात आली. इतरही काही सहकारी मित्र तेथे होते. सकाळी ते ड्युटीला गेले होते. मी प्रवास केला होता. दुपारी जेवण केले. जेवण करून झोपलो. संध्याकाळीच उठलो. वातावरण प्रसन्न होतं. माझ्या मनात प्रचंड कुतुहल होते. मी थोडा बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेलो तर सिक्युरिटीने हटकवले. "साहब, बाहर मत जाओ. आपके पास आयडी कार्ड नही हैl प्रॉब्लेम हो जायेगा" म्हणून मी रूममध्ये आलो आणि टीव्ही पाहत बसलो.
तेवढ्यात रूममधील इतर सहकारी आले. त्यांच्याशी ओळख करून घेतली. ते दुसऱ्या डिपार्टमेंटला होते. एक अमरावतीचा निलेश अतकरे व दुसरा चंद्रपूरचा होता. दुसऱ्या दिवशी ऑफिस जॉईन केले. आठवड्यात आयडी कार्ड, कॅन्टीन कूपन, चहा, नाश्ता कूपन मिळाले. आणि रामोजी फिल्मसिटीच्या सह संपादक नोकरीचा अध्याय सुरू झाला. कामात वक्तशिरपणा आला. तेलुगु भाषेचे अडचणीमुळे बरेच वेळा समज गैरसमज झाले. पण काम मराठीत असल्यामुळे कुठलीच कसूर ठेवली नाही.
महाराष्ट्रातील आठ-नऊ जण होते. सर्वांशी हळूहळू ओळखी झाल्या. ऑफिसात रुळलो. मी ज्या ठिकाणी राहायचो त्याच्या थोडा पुढे मोठा डोंगर होता त्या डोंगरावर रामोजीराव यांचा भव्य दिव्य बंगला होता. डोंगराच्यावर एक भव्य लाईट लागलेला असायचा. मी कुतुहलाने सहकाऱ्यांना विचारले तेव्हा ते म्हणाले की, रामोजीरावांना त्या डोंगरावरून सर्व काही पाहता येते. हे सर्व माझ्यासाठी कुतूहलजनक होते. मग हळूहळू त्यांच्याविषयी माहिती मिळायला लागली. तेथे चालत असलेल्या काही शूटिंगही आम्ही पाहिल्या.
रामोजीराव यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९३६ रोजी आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यात झाला. त्यांचे आई वडील व्यंकट सुब्बाराव आणि व्यंकट सुब्बांमा यांची यांनी आजोबांच्या स्मरणार्थ त्यांचे नाव "रामय्या" ठेवले. मात्र नंतर त्यांनी हे नाव बदलून "रामोजी" ठेवले. राव यांनी गुडीवाढा म्युनीसिपल हायस्कूल मधून शिक्षण घेतले. त्यानंतर गुढीवाडा कॉलेजमधून बीएससी पदवी मिळवली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे शिक्षण झाले पण आपल्या प्रतिभेच्या, आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी जगातील सर्वात मोठ्या फिल्म स्टुडिओ "रामोजी फिल्म सिटीची स्थापना केली. तब्बल दोन हजार एकरपेक्षा अधिक परिसरात असलेल्या फिल्मसिटीमध्ये एकाच वेळी १५ ते २० चित्रपटांचे चित्रीकरण होऊ शकते.
रामोजी फिल्मसिटी मध्ये नेहमीच अनेक कामे अनेक वेळा सुरू असल्याने आम्हाला हैदराबादमध्ये रूम शोधायला लावली. आम्ही मग हैदराबादच्या "वनस्थलीपुरम" या भागात राहायला गेलो. सकाळी आठ वाजता थांब्यावर गाडी उभी राहायची. वेळेत गेले तर बस भेटायची अन्यथा ती निघून जायची. पहिल्यांदा तर एक-दोन वेळेला गाडी चुकली. वेळेच्या बाबतीत येथील लोक खूप "पंक्चुअल" असत. मी सहजच एका सहकाऱ्याला विचारले की गाडी वेळेत आपण रस्त्यावरून हात दिला तरी गाडी थांबत नाही तर तो हसून म्हणाला की खुद्द रामोजीराव जरी हजर झाले तरी तो ड्रायव्हर थांबणार नाही एवढी शिस्त येथील व्यवस्थापनाला आहे. एवढ्या विस्तीर्ण रामोजी फिल्मसिटीमध्ये कुठेच कचऱ्याचा कागद आढळणार नाही की प्लास्टिक नाही. इतकी स्वच्छता येथे ठेवली जाते. "ईटीव्हियंनस्" या मुखपत्राव्दारे कर्मचाऱ्यांचे वाढदिवस,सेमिनार, ॲक्टिव्हिटी कळत असे. मी फिल्मसिटीच्या भव्य लायब्ररीमध्ये संध्याकाळी जाऊन बसायचो. मराठी वृत्तपत्रे व मासिके वाचायचो.
रामोजीराव यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर असामान्य कामगिरी केली. त्यांनी दिल्लीतील एका जाहिरात एजन्सीसाठी कलाकार म्हणून काम सुरू केले. १० ऑगस्ट १९७४ रोजी राव यांनी विशाखापटनममध्ये तेलुगु दैनिक ईनाडूची स्थापना केली. या वृत्तपत्राने चार वर्षात एवढी भरारी घेतली कि एक प्रमुख दैनिक बनले. ऑगस्ट २०२४ मध्ये ते पन्नासावा वर्धापन दिन साजरा करेल.
रामोजी राव यांनी वृत्तपत्र प्रकाशनाबरोबरच सर्वात मोठया रामोजी फिल्मसिटीची स्थापना केली. नंतर टेलिव्हिजन चॅनलच्या ईटीव्ही नेटवर्कचेही नेतृत्व केले. रामोजी राव हे मार्गदर्शी ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष देखील होते. त्यांनी मार्गदर्शी चिट फंड, प्रिया फुड्स आणि कालांजली यासह विविध व्यवसायांवर देखरेख केली होती. अशा या सर्वसमावेशक नेतृत्वाच्या हाताखाली मला काम करायला मिळाले याचा मला अभिमान आहे.
'कृषक बंधू" प्रकाशनाच्या वेळेस मी ईटीव्हीच्या बातम्यांमध्येही झळकलो. एक दिवशी माझ्या ऑफिसमध्ये द्राक्षाच्या दोन पेट्या आल्य. मी विचारणा केल्यावर रामोजी राव यांच्या द्राक्ष बागेच्या होत्या. त्याबरोबर इंग्रजीमध्ये एक पत्रही होते. ते मी या ब्लॉगमध्ये प्रसिद्ध केले आहे.
हंगाम सुरू करण्यापूर्वी ते ऑफिसला "वानोळा" देत होते. कर्मचाऱ्यांना त्यांनी नेहमीच आपुलकीची वागणूक दिली. शिस्त, संयमीपणा, आत्मविश्वास त्यांच्यामध्ये ठासून भरलेला होता.
रामोजी राव यांना २०१६ मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी पद्मविभूषण हा नागरी पुरस्कार प्रदान केला होता. त्यांच्या स्मृतीस माझे विनम्र अभिवादन...!!
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
******************************************
Telegram :
******************************************
Facebook :
******************************************
Instagram :
******************************************
YouTube :
******************************************
Quora :
******************************************
Koo :
******************************************
Pintrest:
******************************************
Share chat :
******************************************
Twitter :
@DeepakA86854129
******************************************
Website :
******************************************
No comments:
Post a Comment