जागतिक मूत्रपिंड दिन
World Kidney Day
हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश जनसामान्यांमध्ये मूत्रपिंडाच्या कार्य व त्याचे रोग याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे. जनसामान्यांबरोबरच आरोग्य क्षेत्रातील सर्व व्यक्ति यांना ही मूत्रपिंडाच्या विविध रोगांबद्दल सतर्क राहून त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये योग्य त्या चाचण्या करून मूत्रपिंडाच्या रोगाचे त्वरीत निदान करण्याबद्दल जागृत करणे हा दिवस साजरा करण्यामागचा एक उद्देश आहे.
हा दिवस २००६ पासून दरवर्षी साजरा केला जातो. त्या दिवशासाठी एक ब्रिदवाक्य घोषित केले जाते आणि त्या दिवशी आणि त्या वर्षीच्या घोषवाक्यानुसार मूत्रपिंडाच्या रोगाबद्दल जनजागृतीचे कार्य केले जाते. त्यात जनसामान्यांसाठी आरोग्य विषयक भाषणांचे आयोजन, काही मूत्रपिंडाच्या चाचण्या आणि तपासणीसाठी शिबिरे, मूत्रपिंड अकार्यक्षम झालेल्या रुग्णांना उपचारासंबंधी मार्गदर्शन आणि जनसामान्यांचे मूत्रपिंडाचे संरक्षण करण्यासंबंधीचे मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमांचे व कार्यशाळांचे आयोजन करण्यात येते.
या माध्यमातून जनतेमध्ये मूत्रपिंडाचे संवर्धन कसे करायला हवे व अकार्यक्षम मूत्रपिंड या रोगापासून स्वतः चा बचाव कसा करावा यांची लोकजागृती होते. गेल्या जवळपास १७-१८ वर्षात अनेक घोषवाक्य देण्यात आली. या वर्षी निरोगी "मूत्रपिंड सर्वांसाठी" (Kidney Health for All) या घोषवाक्याअंतर्गत सर्व समाजातील सर्व स्तरातील लोकांना मूत्रपिंडरोगाच्या आजारांवरील उपचारासाठी समान संधी उपलब्ध करून देण्याविषयी प्रयत्न केले जाणार आहेत.
मोठ्या शहरांत व जिल्हयांमध्ये जशा सोयी उपलब्ध असतात तशाच सोयी छोट्या गावांमध्येही उपलब्ध केल्या जाण्याच्या योजना मूत्रपिंड संस्था, मूत्रपिंडरोग तज्ञ आणि शासन यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येणार आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाच्या रोगाचे लवकर निदान होऊन योग्य ते - उपचार दिल्यामुळे जनसामान्यांना अकार्यक्षम मूत्रपिंड टाळता येईल.
डॉ. देवदत्त चाफेकर, कन्सल्टंट, नेफरोलाँजिस्ट अँड ट्रान्सप्लांट फिजिशियन,
सुप्रिम किडनी केअर, नाशिक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा