name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं व्यवस्थापन तंत्र (Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं व्यवस्थापन तंत्र (Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj)

छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेलं व्यवस्थापन तंत्र 

(Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj)   

आज साडेतीनशे वर्ष झाली. कित्येक राजे होऊन गेले परंतु आपल्या सर्वांच्या स्मरणात फक्त एकच राजा राहिला. ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज.

Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj

६ जून १६७४ रोजी बत्तीस मुळांच्या सोन्याच्या सिंहासनावर रूढ होऊन रायगडावर राज्याभिषेक होऊन आपले राजे छत्रपती राजे झाले. छत्रपती शिवाजी महाराज हे मुरब्बी नेते होते. त्यांनी राजकारणात वापरलेल्या व्यवस्थापन तंत्राची अनेकांना माहिती नाही. अठराव्या शतकातही छत्रपती शिवाजी महाराज हे मॅनेजमेंटचे गुरू होते हे लक्षात येते. 

     व्यवस्थापन तंत्रात नेतृत्व कसे असावे हे छत्रपती शिवाजी महाराजांनी वेळोवेळी सिद्ध केले आहे. स्वराज्याच्या सुरुवातीला अफजलखान महाराष्ट्रावर साठ हजार सैन्यासह चालून आला होता यावेळी स्वराज्याचा नाश होईल असे अनेकांना वाटत होते. अफजलखानाबरोबर तह करावा असे सल्ले दिले जात होते. पण  राजांनी या संकटावर असामान्य बुद्धीचातुर्य व अतुलनीय पराक्रमाने मात केली. नेतृत्व कसे करावे याचे उदाहरण आपल्यापुढे ठेवले. 

      छत्रपती शिवराय यांनी अफझलखानाला भेटण्याची वेळ १२ वाजून ३५ मिनिटांची ठरवली होती. कारण १२ वाजून ३५ मिनिटांनी सूर्य डोक्यावर असतो. अफजलखान शिवरायांपेक्षा उंचीने खूप मोठे होते. त्यामुळे अफजलखान जेव्हा शिवरायांकडे बघेल तेव्हा त्यांच्या डोळ्यात सूर्याची किरणे जातील आणि त्याच वेळेचा फायदा घेऊन शिवाजी महाराज त्याच्यावर हल्ला करतील इतकी मोठी मॅनेजमेंट महाराजांनी त्यावेळी केली होती. त्यानंतर राजांनी विजयोत्सव साजरा केला नाही. आणि कोणतीही विश्रांती न घेता अवघ्या १८ दिवसात राजांनी थेट पन्हाळापर्यंतचा प्रदेश जिंकला. 

      छत्रपती शिवाजी महाराज हे कुशल राजे आणि प्रशासक होते. त्यांनी त्यांच्या काळात सर्वप्रथम अष्टप्रधान मंडळ स्थापन केले. प्रत्येक मंडळाची जबाबदारी त्या त्या प्रशासनावर सोपवली. या अष्टप्रधान मंडळामुळेच राजे पारदर्शक कारभार करू शकले. तसेच त्यांनी त्यावेळी परराष्ट्र व्यवहार आणि गुप्तहेर खातेही मंत्रीमंडळात सुरू केले होते. 

      पुण्याला वेढा घालून बसलेल्या शाहीस्तेखानाला अतिशय नियोजनबद्धरीतीने महाराजांनी पराभूत केले. अवघे ४०० माणसांनिशी, कमी वेळात, कमीत कमी नुकसानीत, लाखाहून अधिक फौजबंद शाहिस्तेखान व मुघल फौजेचा पराभव केला. अशा पद्धतीने नेतृत्व करणाऱ्याने स्वतः करून दाखवले तरच त्याचे नेतृत्व स्वीकारले जाते. त्यानंतरच आपल्या अनुयायांकडून  अपेक्षा करता येते. 

      कोणत्याही योजनेचे यश हे त्याचे नियोजन, सूक्ष्म व तपशीलवार माहिती यावर अवलंबून असते. सुरतेवरील हल्ल्याचे नियोजन करताना शिवाजीराजांनी दोन उद्दिष्टे समोर ठेवली होती. एक म्हणजे जास्तीत जास्त लुट कमीत कमी वेळात करणे आणि दुसरे म्हणजे ती लूट सुरक्षितपणे स्वराज्यात आणणे हा होता. 

       शिवाजी महाराजांनी कधीच कमतरतेवर लक्ष दिले नाही तर सुरुवात करण्यावर भर दिला. रायरेश्वरी स्वराज्याची शपथ घेताना बाल शिवबांसोबत फक्त ८ ते १० मावळे होते. त्यांनी लहान वयात दृढनिश्चय केला होता आणि सुरुवात केली. कार्यक्षम मावळे तयार करून पुढील वाटचाल केली. महाराजांनी  तोरणागड वयाच्या सोळाव्या वर्षी जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले होते. यावरून यशाचा वय व अनुभवाशी काहीही संबंध नसतो हे अधोरेखीत झाले आहे. 

     शिवाजी महाराजांविरुद्ध कधीही बंड झाले नाही. त्यांचे व्यवस्थापन असे होते की स्वराज्याची ज्योत प्रत्येकाच्या मनात अशा प्रकारे प्रज्वलीत केली होती की ते आग्र्याच्या नजरकैदेत असतानासुद्धा स्वराज्यातील एकही सरदार फितूर झाला नाही. पाच पन्नास मावळेविरुद्ध मुघलांचे लाखोंनी असलेले सैन्य, मुघलांकडे घोडदळ, मोठा तोफखाना असे असताना त्यांच्यासमोर आपला निभाव लागणार नाही हे महाराज चांगले जाणून होते म्हणून महाराजानी युद्धाचे नवनवे डावपेच आणले. 

Management techniques given by Chhatrapati Shivaji Maharaj

  गनिमी कावा वापरून शत्रूला नामोहरम करणे किंवा दूरदृष्टीने नौदलाची स्थापना करणे व महाराजांनी वापरलेली काही युद्धकौशल्य आपल्याला त्यांचा महानतेचा दाखला देतात.    आमचा राजा साडेतीनशे वर्षापूर्वी आरमाराची उभारणी करून सांगतो की, महाराष्ट्राला फक्त जमिनीवरूनच नव्हे तर पाण्यातून देखील धोका आहे पण आज आम्ही ते विसरलो.कारण आमच्यापैकी कित्येक जणांनी शिवचरित्र वाचलेच नाही जर आज आपल्या सरकारसोबत आपल्या सर्वांना शिवचरित्र समजले असते तर २६-११ झालाच नसता. 

   छत्रपती शिवाजी महाराजांपूर्वी मुघल आणि इतर शाही रयतेकडून दामदुपटीने कर गोळा करायचे. छत्रपतींनी आपल्या प्रशासनात ही पद्धत बंद करून आपल्या प्रजेवर अगदी नगण्य कर लावला. त्या कर महसुलातून मिळणारा पैसा ते रयतेच्या भल्यासाठीच वापरीत असत. अशा तऱ्हेने त्यांनी जनता व राज्य कारभारातील पारदर्शीपणा दाखवला याचमुळे ते पुढे रयतेचे राजे म्हणून ओळखले जाऊ लागले. 

    स्पर्धक मोठा आहे म्हणून घाबरायचं नसतं हे त्यांच्या व्यवस्थापनाचं मोठे गमक होते. मुघल,निझाम,आदिलशाह असे कसलेले विरोधक असतानाही महाराजांनी स्वराज्य स्थापले होते. यासाठी चांगले सहकारी निवडले होते. आधी लगीन कोंढाण्याचं...मग रायबाचं असे म्हणत महाराजांवर जीव ओवाळून टाकणारे सहकारी हीच महाराजांची ताकद होती. 

   पन्हाळ्याच्या वेढ्यात सगळीकडून अपयश येत असतानाही महाराजानी न डगमगता रणनीती आखली आणि वेढ्यातून सुखरूप बाहेर पडले. अशावेळी संकटात धीर सोडला नाही. शांतपणे निर्णय घेत राहिले. सगळं संपलय असं ज्यावेळी वाटेल तेव्हा जास्त खंबीर होणे हे महाराजांच्या व्यवस्थापनाचं महत्वपूर्ण वैशिष्ट्य होतं याचे उदाहरण म्हणजे पुरंदरच्या तहात २३ किल्ले मुघलांना दिल्यामुळे स्वराज्य संपलं असंच सगळ्यांना वाटलं होतं पण महाराजांना नाही. 

    छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धनितीत बदल केला. तो सातत्याने बदलत ठेवला. एका युक्तीचा वापर त्यांनी दुसऱ्यांदा केला नाही. प्रत्येक वेळी ते नवे बदल करत राहिले. व्यवस्थापन तंत्रात वेळोवेळी बदल करत राहिले. सबब शिवरायांच्या वाट्याला विजय तर शत्रूच्या वाट्याला पराजय येत राहिले. 

   आग्र्यात औरंगजेबासमोर त्यांच्याच दरबारात आपल्या अपमानाविरोधात बोलण्याची हिम्मत महाराजांनी दाखवली होती. या प्रसंगातून स्वाभिमानी राहण्याचे आपला आत्मसन्मान आवश्यक असल्याचे महाराजांनी दाखवून दिले. ते नेहमी नैतिकतेने, नियमाने वागले तसेच आपल्या सहकाऱ्यांनाही तीच शिस्त लावली. महाराजांचे नियम स्वतः महाराजसुद्धा मोडत नसत. अगदी जवळच्या सहकाऱ्यांनासुध्दा नियमभंगाच्या शिक्षेत  माफी नसे.

   महाराज कोणत्याही मोहिमेवर जाताना तसेच इतरवेळी जबाबदारीचे वाटप करून ठेवत असत त्यामुळे कामात सुसूत्रता राहायची. कोणताही निर्णय घेताना महाराज घाई गडबड करत नसत. शांत राहून, पूर्ण विचार करून मगच योग्य निर्णयाप्रत येत. स्वराज्य हितासाठी महाराजांनी अनेक कठोर आणि कटू निर्णय घेतले. वेळप्रसंगी आपल्या आप्तेष्टांविरोधात सुध्दा निर्णय घेतांना डगमगले नाहीत. 

         लोकांशी फटकून वागुन तुम्ही प्रगती करू शकत नाही महाराज जनतेसोबत वागताना कोणतेही अंतर न ठेवता अगदी त्यांच्यातले होऊन जात अगदी घरातील सदस्य असल्यासारखे वागत असत. इतके सूक्ष्म व्यवस्थापन तंत्र त्यांनी अवलंबले होते. महाराज जितके कठोर होते तेवढे दयाळू आणि क्षमाशीलही होते. महाराजांच्या या स्वभावामुळे कित्येक विरोधकसुद्धा त्यांचे सहकारी बनले होते. महाराजांनी प्रत्येक वेळी फक्त लढाई जिंकण्यालाच महत्व दिले नाही तर तहात जिंकणे महाराजांसाठी महत्वाचे होते. युद्धाचा अंतिम परिणाम तहच असतो. महाराजांचे हे व्यवस्थापन तंत्र कोणत्याही क्षेत्रात अंगीकारले तरी आपण जीवनात नक्कीच यशस्वी होऊ असा मला विश्वास आहे.


© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

उठा उठा दिवाळी आली (Suddenly Diwali came)

उठा उठा दिवाळी आली Suddenly Diwali came उठा उठा दिवाळी आली, धनत्रयोदशीने सुरुवात झाली  आजच्या दिवशी करा यमदीपदान,  आज असतो धन्वंतरीला मान  उ...