नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा येथील स्ट्रॉबेरी शेती l surgana strawberry farming l
नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा या आदिवासी तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांत स्ट्रॉबेरी पिकाखालील क्षेत्रात उल्लेखनीय वाढ झाली आहे.
स्ट्रॉबेरी |
सुरगाणा येथील शेतकऱ्यांनी अभ्यासपूर्वक उत्पादन ते विपणन-विक्रीपर्यंत कसोशीचे प्रयत्न करून स्ट्रॉबेरीचे दर्जेदार उत्पादन घेतले. इथल्या मातीत व हवामानात पिकणारी लाल चुटूक, आकर्षक स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. स्ट्रॉबेरीसाठी समशीतोष्ण हवामान चांगले असते. उत्तम वाढीसाठी भरपूर सूर्यप्रकाश, ६० ते ७० टक्के हवेतील आर्द्रता असावी.
स्ट्रॉबेरी पिकाचा सक्षम पर्याय
नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यातील आदिवासी खरिपात भात, नागली, मका, भुईमूग, कुळीथ, उडीद अशी पारंपरिक जिरायती पिके घेऊन उदरनिर्वाह करायचे. दिवाळी संपली की त्यांची रोजगाराच्या शोधात भटकंती ठरलेली असायची. ही वणवण थांबवण्याठी व गावातच स्वरोजगार तयार करण्यासाठी सन २००२ नंतर येथील काही निवडक शेतकरी पुढे आले. त्यांना स्ट्रॉबेरी पिकाचा सक्षम पर्याय दिसला.
प्रायोगिक स्तरावर लागवड
प्रायोगिक स्तरावर लागवड केली. डोंगराळ भाग व पावसाचा प्रदेश यामुळे थंड वातावरण पिकास अनुकूल ठरले. अर्थात शेतकऱ्यांनी सुरुवातीला अनेक चढ उतार सोसले. सुरुवातीला भांडवलही नव्हते. पण एकमेकांना आधार देत शेतकरी या पिकासाठी पुढे येऊ लागले. श्रीराम गायकवाड, रमेश महाले यांचे सुरुवातीचे योगदान महत्त्वाचे ठरले. अनुभव व कौशल्य यातून सुमारे १५ वर्षांत हे पीक व त्याचे लागवड तंत्र आदिवासींनी आत्मसात केले. महाबळेश्वर भागातील हुकमी मानले गेलेले स्ट्रॉबेरी हे पीक आता सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांचे देखील नगदी बनले आहे.
स्ट्रॉबेरी लागवड |
स्ट्रॉबेरी लागवड
सुरगाणा तालुक्यात प्रामुख्याने घाटमाथ्यावरील बोरगाव, घागबारी तर कळवण तालुक्याच्या पश्चिम भागात पळसदरचे खोरे, सुकापूर अशा १० ते १५ गावांत स्ट्रॉबेरी लागवड झाली आहे. पाण्याचा निचरा होणारी हलकी, मध्यम काळी, गाळाची जमीन स्ट्रॉबेरी लागवडीसाठी उपयुक्त ठरते. जमिनीचा पी. एच. ५.५ ते ६.५ दरम्यान असावा.
स्ट्रॉबेरी लागवडीत मातृरोपांची उपलब्धता व त्याचा निरोगी दर्जा हा कळीचा मुद्दा असतो. रोपे महाबळेश्वर परिसरातून आणावी लागतात.
स्ट्रॉबेरीची लागवड तिन्ही हंगामात करतात. ऑक्टोंबर ते मार्च या कालावधीतील हवामान पोषक ठरते. तयार केलेल्या गादीवावाफ्यावर दोन ओळ पद्धतीने लागवड करावी. यासाठी १ फूट x १ फूट अंतरावर खड्डे करून त्यात २०० ग्रॅम कुजलेले शेणखत, फोरेट व रासायनीक खतांची मात्रा टाकून मिसळावे. प्लॅस्टिक पिशवीतील रोप असल्यास पिशवी काढून रोपाच्या बुडावरील माती मोकळी करून रोप लावावे.
जमिनीची उभी - आडवी खोलवर नांगरट करावी. तणांचे व जुन्या पिकांचे अवशेष गोळा करून नष्ट करावेत.
स्ट्रॉबेरीचा ‘विंटर डॉन’ वाण
सुरगाणा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अभ्यास करून रोपे दर्जेदार व निरोगी उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न केले. सन २००६ मध्ये ‘सेल्वा’ वाणाची लागवड केली जायची. त्यात बदल करून २०१० मध्ये ‘स्वीट चार्ली’ वाण येथे रुजला. उत्पादकता वाढली. पुढे २०१५ नंतर विंटरडॉन हा नवा वाण हाती आला.
स्ट्रॉबेरीच्या स्वीट चार्ली, कॅमेरोझा, डग्लस, सेलवा, विंटरडॉन, पजारो इ. जाती आहेत. स्ट्रॉबेरी पिकाच्या या जाती दिवस व रात्रीच्या कालावधीस विशेष प्रतिसाद देतात.
स्ट्रॉबेरीच्या चांगल्या वाढीसाठी मऊ आणि भुसभुशीत गादीवाफे तयार करावेत. स्ट्रॉबेरीच्या दोन ओळी पद्धतीसाठी ९० से. मी. रुंद व ३० ते ४५ से.मी. उंची असलेल्या गादी वाफ्यावर दोन रोपांतील अंतर ३० से.मी. व दोन ओळीतील अंतर ६० से.मी. असावे. दोन ओळी पद्धतीत प्रती एकर २२ ते २५ हजार रोपे लागवडीसाठी वापरतात. रोपे एकसारखी समान वाढीची ४ ते ५ पाने असलेली असावीत. खात्रीशीर रोपवाटिकेतून प्लास्टिक पिशवीत वाढवलेली रोपे निवडावीत.
ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली स्ट्रॉबेरी |
स्ट्रॉबेरीचा बोरगाव ब्रॅण्ड
स्ट्रॉबेरीचा बोरगाव ब्रॅण्ड झाला आहे. लाल चुटूक, आकर्षक अशी सुरगाण्याची स्ट्रॉबेरी ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे. पूर्वी मुंबई, बडोदा, अहमदाबाद, सुरत, बडोदा येथे पुरवठा व्हायचा. आता पुणे, बंगळूर, हैदराबाद, चेन्नई येथील व्यापाऱ्यांकडूनही मागणी असते. ‘बोरगाव स्ट्रॉबेरी’ नावाने ब्रँड रुजवला जात आहे.
लाल चुटूक, आंबटगोड स्ट्रॉबेरी डिसेंबरनंतर रस्त्याच्या कडेला छोटी दुकाने थाटून वणी, सप्तशृंगी गड व सापुतारा रस्त्यावर विक्रीसाठी दिसू लागते. पर्यटकांची या भागात वर्दळ अधिक असल्याने त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळतो. या भागातील स्ट्रॉबेरीबाबत समजल्यानंतर मुंबई व गुजरातेतून व्यापारी बांधावर येऊन खरेदी करू लागले आहेत.
स्ट्रॉबेरीचा प्रमुख हंगाम
स्ट्रॉबेरीचा डिसेंबर ते मार्च अखेर प्रमुख हंगाम चालतो. जानेवारी काळात उपलब्धता कमी व दरांत तेजी असते. पुढे आवक वाढून दर कमी होत असतात. द्वितीय ग्रेडचा माल असल्यास ठरावीक शेतकऱ्यांच्या खळ्यांवर संकलित करून तो प्रक्रिया उद्योगांना ३० रुपये प्रति किलो दराने पाठवला जातो. अशा संघटित कामकाजामुळे देयकांची हमी मिळाली आहे.
साप्रो शेतकरी उत्पादक कंपनी
येथील शेतकऱ्यांची साप्रो नावाने शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन झाली आहे. आता द्राक्ष पट्ट्यात स्थलांतरित होणारे मजूर, स्ट्रॉबेरी उत्पादक झाले आहेत. स्थानिक मजुरांना गावातच रोजगार उपलब्ध झाला आहे. कृषी विभागाने ‘विकेल ते पिकेल’ या संकल्पनेवर आधारित शेतकऱ्यांना एकत्र करीत स्ट्रॉबेरी उत्पादन, विपणन प्रकल्प हाती घेतला आहे. प्रक्रिया उद्योग स्थानिक पातळीवर होण्याकडे लक्ष दिले आहे. स्ट्रॉबेरी पिकातून आदिवासी शेतकऱ्यांना प्रगतीचा जणू मंत्रच सापडला आहे.
deepakahire1973@gmail.com
www. ahiredeepak.blogspot.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा