औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न बिकट: विकास हवा की भकास (Industrial Pollution)
कोणत्याही देशाच्या विकासामध्ये औद्योगिकरण महत्त्वाची भूमिका बजावते. खरं तर औद्योगिकरण करताना पर्यावरणाचा समतोल सांभाळणे गरजेचे आहे. मात्र, आजही अनेक उद्योगातून उघड्यावर किंवा नदी नाल्यात सांडपाणी सोडले जाते. कंपन्यांतून निघणारा धूर जगणे अवघड करून टाकतो. उद्योग, पायाभूत सुविधांसाठी नैसर्गिक संपदेचा विनाश केला जातोय. अशा वेळी विकास हवा की भकास, हा प्रश्न पडणे साहजिक आहे. विकास करताना तो समतोल, शाश्वत असायला हवा. उद्योग जगत याकडे निश्चितच लक्ष देईल अशी अपेक्षा आहे...
पर्यावरणाचा सहसंबंध
उद्योजकतेशिवाय औद्योगिक विकास होणे शक्य नाही. औद्योगिक विकास करताना पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी प्रत्येक कारखानदाराने घेणे गरजेचे आहे. सतत धूर ओकणाऱ्या व दूषित पाण्याचे लोंढे बाहेर टाकणाऱ्या कारखान्यांमुळे पृथ्वीवर प्रदूषण होत असते. याला जबाबदार आपल्या कारखान्यात प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसवून न घेणारे कारखान्याचे संचालक या गोष्टीस जबाबदार आहेत. औद्योगिक विकास करताना आपल्या देशासाठी अशा प्रकारचा विकास योग्य आहे का? या प्रश्नाकडे आज गांभीर्याने बघावे. कामगारांना विस्थापित करणे आणि पर्यावरणाचा विनाश करणे या दोन गोष्टी औद्योगिक विकासात टाळणे महत्त्वाचे आहे.
पर्यावरणाचा सहसंबंध औद्योगिक विकास आणि उद्योजकतेशी जेव्हा लावला जातो तेव्हा प्रथम उद्योजकता म्हणजे काय हे समजून घेतले पाहिजे. उद्योजकता ही व्यक्तीच्या ठिकाणी असलेल्या अनेक गुणांची गोळाबेरीज होय. की जी व्यवसाय किंवा उद्योगक्षेत्रात येणाऱ्या व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी अत्यंत आवश्यक असते. त्यातून त्यांचे कर्तुत्व फुलते आणि व्यवसायात यश प्राप्त होते. उद्योजकता हा उद्योग आणि व्यवसायाचा व्यवहारीक बाबींशी संबंधित असा भाग आहे की, ज्यात उद्योगाच्या उभारणीसाठी प्रकल्प आखणी, परवाना मिळवणे, भांडवल उभारणी, प्रकल्पाची रचना, उत्पादन घटकाचे संघटन, वस्तू व सेवांचे यशस्वीपणे विपणन करण्याचा समावेश होतो.
पर्यावरणपूरक जीवनशैली
आज आपण मोठ्या प्रमाणात औद्योगिक विकास केला आहे परंतु आज समाजाने पर्यावरणपूरक जीवनशैलीचा अंगीकार केला पाहिजे. भारतातील एकंदर शेतजमिनीपैकी ६० टक्के भागात जमिनीची धूप होणे, पाणथळ साचणे व जमीन क्षारयुक्त बनली आहे. सध्या शेतीखाली ३०० लाख हेक्टर संवेदनशील जमिनीचे पोत वेगाने नित्कृष्ट होत आहे. प्रतिवर्षी वेगाने अवर्षण वाढत असून मातीची धूप होते त्यामुळे शेतीही धोक्यात आली आहे. अशा वेळी नैसर्गिक, सेंद्रिय, जैविक शेतीचा मोठ्या प्रमाणात अंगीकार करावा.
औद्योगिक क्षेत्रात पुढारलेल्या देशात आता झपाट्याने औद्योगीकरण वाढल्यामुळे ऊर्जेचा दरडोई वापर वाढला आहे. भविष्यकाळातील ऊर्जेबाबतची परिस्थिती सुधारण्यासाठी एकीकडे ऊर्जेचा पुरवठा चिरंतन स्वरूपात वाढवण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे. कार्यक्षम उपयोग करून ऊर्जेची मागणी कमी करायला हवी. जीवाश्म इंधनापेक्षा पर्यावरणास कमी हानिकारक असणारे आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या अधिक न्याय्य वाटप करू शकता येणाऱ्या पुनर्नवीकरणक्षम ऊर्जा स्रोतांचा आपण विचार केला पाहिजे.
समस्या आणि दुष्परिणाम
पृथ्वीवरील तापमान वृद्धीचे दुष्परिणाम भारतीय उपखंडालाही जाणवत आहेत. कारखाने व वाहनांचे प्रदूषण वाढत असून जंगले नष्ट होत चालल्यामुळे वातावरणातील तापमान सातत्याने वाढत आहे. आपल्या देशातील अनेक भागातील पावसाचे प्रमाण दरवर्षी बदलत आहे. पर्जन्यवृष्टीच्या पद्धतीत बदल होत आहे. ढगफुटी होत आहे तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. आज तर मोठया प्रमाणात शहरीकरण झाले आहे. शहरात एमआयडीसी असल्यामुळे रोजगार वाढला आहे. खेड्यातून अनेक लोक शहरात स्थायिक झाले आहेत. त्यामुळे परिस्थितीजन्य अनेक समस्या आज शहरात उद्भभवल्या आहेत.
कारखान्यात कच्च्या मालावर प्रक्रिया केली जाते. त्यातून उत्पादन निर्मिती केली जाते. तसेच सहउत्पादन म्हणजेच प्रदूषणासारखे निर्मिती प्रक्रियेतील अपरिहार्य परंतु अनिष्ट परिणाम काढले जातात. निर्मिती प्रक्रियेत उत्पादनास आवश्यक असलेल्या कच्च्या मालाबरोबरच ऊर्जा, पाणी इ.चा उपयोग केला जातो. तयार माल नंतर बाजारपेठेत पाठवला जातो. तेथून आपण तो विकत घेतो. कारखान्यातून बाहेर पडणारे प्रदूषण हा सर्वप्रथम आणि उघड दिसणारा परिणाम आहे. पाणी व वायूप्रदूषण व काही बाबतीत घनकचऱ्याचे प्रदूषण हे सहजपणे कोणालाही दृष्टीस पडते. संबंध जगात अशा प्रदूषण समस्येने अतिशय गंभीर स्वरूप धारण केले आहे.
वीस वर्षांपूर्वी भोपाळ येथील युनियन कार्बाईड कारखान्यात गंभीर स्वरूपाचा औद्योगिक अपघात घडल्यामुळे औद्योगिक दुर्घटनांकडे सर्व जगाचे लक्ष वेधले गेले. या अपघातात ४००० व्यक्तींचा मृत्यू ओढवला. तेथील लोकांच्या आरोग्यावर झालेले दुष्परिणाम आजही जाणवत आहेत. औद्योगिक अपघातांमुळे माणसे मृत्यू पावतात, जखमी होतात. पर्यावरणावर त्याचा परिणाम होतो व नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश होतो.
व्यवसायाशी निगडित आरोग्य समस्या जाणवू लागल्या आहेत. माणूस चरितार्थासाठी काम करतो परंतु काहीवेळा कामाची जागा किंवा कामाचे स्वरूपच आरोग्यास धोकादायक ठरते. उदा. कोळसा खाणीतील कामगार कोळशाची पूड नाकातोंडावाटे आत घेतो. आण्विक वीज केंद्रातील कामगारास आण्विक उत्सर्जनापासून सतत धोका असतो. गालिचे,काडेपेटी,फटाके अशा धोकादायक कारखान्यातील बालमजुरांची समस्या अतिशय गंभीर व काळजी करण्याजोगी आहे.
कार्यान्वित झालेल्या कारखान्याकडून पर्यावरणास हानी पोहोचू नये यासाठी भारतामध्ये अनेक नियम अस्तित्वात आहेत. या नियमानुसार सांडपाण्याचे प्रमाण, त्याची प्रत इ. गोष्टी ठरविल्या जातात. व कायद्यामार्फत त्याची अंमलबजावणी होते. त्यात जलप्रदूषण नियंत्रण कायदा, वायू प्रदूषण नियंत्रण कायदा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन कायदा अशा महत्त्वाच्या कायद्यांचा समावेश आहे. या संदर्भात असलेले कायदे व नियम पाळले जातात. याविषयी खातरजमा करणे यासाठी सरकारकडून कायद्याची अतिशय कडक व नि:पक्षपाती अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे. कायद्याचा बडगा वापरण्यापेक्षा कारखाने स्वतःहून पुढाकार घेऊन पर्यावरणाची काळजी घेतील या दिशेने प्रयत्न करावे. पर्यावरणाबद्दलची जागरूकता शेवटी आर्थिकदृष्ट्या फायद्याची असते ही जाणीव करून देणे हा एक महत्त्वाचा उपाय आहे. काही कारखानदार अशा पर्यावरणाच्या बाबतीत अधिक दक्षता घेताना आढळून येतात. ही निश्चितच गौरवाची बाब आहे.
कारखान्याचे पर्यावरणावर होणारे परिणाम फार मोठ्या स्वरूपाचे व गुंतागुंतीचेही असतात. शासन, उद्योजक व आपल्यासारख्या सामान्य जनतेने एकत्र येऊन आस्थापूर्वक योजनाबद्ध प्रयत्न केल्यास मार्ग निघेल. बऱ्याच ठिकाणी सामान्य लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी सामूहिक प्रयत्नाची गरज आहे. विकास हा मानव आणि पर्यावरण या दोन्हीशी संबंधित आहे हे आपल्या लक्षात येईल.
पर्यावरणपूरक औद्योगिक विकास
औद्योगिक विकासाद्वारे पर्यावरणाचा समतोल राखावा. प्रचंड कारखाने, मोठ-मोठी धरणे, उत्तुंग इमारती भव्य पूल बांधून आणि वेगवान गाड्या किंवा संगणक निर्माण करून आपण विकास साधू शकतो का? आर्थिक प्रगती हा विकासाचा एक घटक आहे. त्यासाठी वरील सर्व गोष्टी आवश्यक ठरू शकतात. पण त्त्यावरच सारे प्रयत्न केंद्रित केल्यामुळे आणि तितक्याच महत्त्वाच्या दुसऱ्या घटकांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्याचा उलट परिणाम होऊ शकतो.
जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मूलभूत संसाधनाचे उगमस्थान पर्यावरण आहे. पर्यावरणातूनच उद्योगधंद्यांना कच्चा माल, लोकांसाठी अन्न, वाहतुकीसाठी इंधन या गोष्टी मिळतात. विकास कामातून निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ पुन्हा पर्यावरणातच सामावले जातात. म्हणजेच पर्यावरण हे विकासकामांचे उगमस्थान आणि अंतिम स्थानही आहे म्हणून उद्योजकतेतून औद्योगीक विकास साधताना पर्यावरण जोपासावे.
औद्योगिक प्रदूषणाचा प्रश्न
दिवसेंदिवस होतो बिकट,
गांभीर्याने घ्या आता
विचार प्राध्यान्याने सरसकट...
पर्यावरणाची हानी न होता
घ्यावी काळजी उद्योजकाने,
उर्जेचा दरडोई वापर
झाला आता औद्योगीकरणाने...
परिस्थितीजन्य अनेक दुष्परिणाम
उद्योग व्यवसायात घडल्या
उत्पादन निर्मिती अत्यावश्यक
प्रदूषण समस्या वाढल्या
पर्यावरणाचा राखावा समतोल
मुलभूत संसाधनेचे उगमस्थान
उद्योजकतेतून औद्योगिक विकास
पर्यावरण वाचवा, हेच अंतिम स्थान
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.DigitalKrushiyog.com
#औद्योगीकप्रदूषण #Industrialpollution
#पर्यावरणपूरकऔद्योगिकविकास
#पर्यावरणविकासकामांचेउगमस्थान #उद्योजकता
#प्रदूषण #पर्यावरणाचा सहसंबंध
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा