निसर्ग,पर्यावरण,शेती व माती वाचवण्यासाठी...आनंद ऍग्रो केअर
To save nature, environment, agriculture and soil... Anand Agro Care
नाशिकची ओळख "ग्रेपसिटी" म्हणून आहे. द्राक्ष, डाळिंब, विविध भाजीपाला फुलपिके नाशिक जिल्ह्यात घेतली जातात. निर्यातीतही नाशिक जिल्हा आघाडीवर आहे. शेती आणि शेतीउद्योग हाच मुख्य व्यवसाय म्हणून बहरलेला आहे. अशा या नाशिक नगरीत श्री घन:श्याम प्रकाश हेमाडे यांनी 'आनंद अग्रो केअर' (Anand Agro Care) या उद्योगाची सुरुवात २००९ या वर्षी केली. या उद्योगाने १३ वा वर्धापनदिन साजरा केला. यानिमित्ताने त्यांची घेतलेली ही खास मुलाखत...
सीएमडी घन:श्याम हेमाडे |
आनंद ऍग्रो केअर उद्योग स्थापन करून शेती उत्पादन क्षेत्रात का यावेसे वाटले? या माझ्या प्रश्नाचे उत्तर देताना श्री. घन:श्याम हेमाडे यांनी सांगितले की, आयुर्वेदिक क्षेत्रात वैद्यराज म्हणून समाजसेवेत कार्यरत असणारे माझे आजोबा श्री आनंदराव हेमाडे यांचे स्वप्न होते की, आपल्या नातवाने शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी काहीतरी करावं. याच आजोबांच्या इच्छापूर्तीसाठी मी २००१ या वर्षी कृषी पदविकाधारक झालो. त्यानंतर मी एक्सेल इंडस्ट्रीज लिमिटेड मधील बायोटेक डिव्हिजनमध्ये नोकरी करू लागलो. नोकरीतही झपाटून काम केले. आठ वर्ष नोकरीचा अनुभव घेतला. परंतु आजोबांचे स्वप्न सतत डोळ्यासमोर तरळत होते. त्यांचे आयुर्वेदिक क्षेत्र मी जवळून अनुभवले.
आजोबांकडे अनेक व्याधीग्रस्त शेतकरी यायचे ज्यांना रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अनेक आजार झालेली असायचे. लकवा, कॅन्सर यासारखे दुर्लभ आजार पाहून माझे मन व्यथित व्हायचे. रासायनिक शेतीमुळे अनेक व्याधी, आजार मानवाला होऊ लागले आहेत. त्याचे भयंकर दुष्परिणाम आज आपण बघतोच आहे. हे कुठेतरी थांबावं म्हणून मी जैविक, नैसर्गिक, सेंद्रिय अशी उत्पादने तयार करण्याचे ठरवले. ' फूड एज ए मेडिसिन' म्हणजे 'आपला आहार हेच औषध' मानून आणि 'क्वालिटी प्रायोरिटी' म्हणजे गुणवत्तेला प्राधान्य असे ध्येय उराशी बाळगून २८ सप्टेंबर २००९ या दिवशी आपल्या आजोबांच्या नावाने कृषी क्षेत्रातील आनंद अग्रो केअर या उद्योग समूहाची स्थापना केली. सुरूवातीला हा प्रवास त्यांनी व त्यांच्या सुविद्य पत्नी व आनंद अग्रो केअरच्या सहसंचालिका सौ. शोभा घन:श्याम हेमाडे यांच्यासमवेत केला. सुरवातीला अनेक अडचणी आल्या परंतु कितीही अडचणी आल्या तरी खचायचं नाही हा मंत्र लक्षात ठेवून त्यांच्या पत्नीने खंबीर साथ दिली. आणि बघता बघता आज आनंद अग्रो केअरचा वटवृक्ष झाला.
आज त्यांची दोनशेहून अधिक उत्पादने बाजारात उपलब्ध आहेत. आणि संपूर्ण भारतभरही ऑफलाइन, ऑनलाईन पद्धतीने मिळतात. त्यांचे डॉ.बॅक्टोज हे सुप्रसिद्ध उत्पादन म्यानमार, स्पेन, साऊथ कोरिया, यु.के., ऑस्ट्रेलिया, रिपब्लिक ऑफ मोलडोवा अशा अनेक देशांना निर्यातही होते. आज रोजी त्यांच्याकडे जैविक खते, जैविक कीटकनाशके, जैविक बुरशीनाशके, पीक संवर्धक संप्रेरके, पीकसंरक्षके,अडज्युवंटस, सेंद्रीय खते, सूक्ष्म अन्नद्रव्य व इतर उत्पादने बनवली जातात.
दिवसेंदिवस बाजारात प्रत्येक गोष्टीत स्पर्धा निर्माण होत चालली आहे. रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा अमर्याद वापर वाढला. उत्पादनही वाढले. परंतु अनेक समस्या उद्भभवल्या जसे की जमीन नापिक होणे, अनेक आजार, रोग उद्भभवणे. या सर्वाला पर्याय म्हणजे सेंद्रिय, जैविक शेती करणे. आणि हेच सहजसाध्य होण्यासाठी शेतकऱ्याला बाजारात जैविक खत, कीटकनाशके, बुरशीनाशके मिळत नव्हते. या सर्व गोष्टीचा अभ्यास श्री घन:श्याम हेमाडे यांनी चिकित्सक दृष्टीने करून घेतला आणि बाजारात जैविक उत्पादने आणली.
याविषयी अधिक माहिती देताना श्री. हेमाडे म्हणाले की, निर्यातक्षम उत्पादन घेण्यासाठी जगातील सर्वच देशातील फळ आणि भाजीपाला उत्पादकासोबत शेतकऱ्याला स्पर्धा करावी लागत आहे. दिवसेंदिवस आंतरराष्ट्रीय बाजाराकडून गुणवत्तेविषयी होणारी विचारणा तसेच युरोपीय महासंघाकडून प्रत्येक वर्षी लादले जाणारे निर्बंध यामुळे भारतीय द्राक्ष तसेच इतर सर्व फळ आणि भाजीपाला उत्पादकांसमोर अनेक प्रश्न उभे राहिलेले आहेत. बदलत्या वातावरणात कीड व रोग नियंत्रण करणे अवघड होत चालले आहे. पूर्वीच्या काळात बळीराजा पारंपारिक पद्धतीने शेती करीत होता. उत्पन्न कमी मिळत होते. पण त्यासाठी लागणारे खते, औषधे हे निसर्गातून मिळणारे टाकाऊ पदार्थ जसे की शेणखत, कंपोस्ट खत, निंबोळीचा अर्क अशा विविध प्रकारच्या नैसर्गिक वनस्पतीचा वापर करून शेती केली जात होती.
जनावरांचा वापर करून आपल्या शेतीची मशागत केली जात होती. पण ते पूर्णपणे नैसर्गिक होते. यामुळे पूर्वीच्या लोकांचे आयुर्मान सुदृढ व निरोगी होते. याच कालखंडात भारतात हरितक्रांती झाली. त्यानंतर विविध प्रकारची रासायनिक खते, कीटकनाशके, बुरशीनाशके व तणनाशके भारतात आयात करण्यात आली. व यांचा वापर फळे व भाजीपाला उत्पादकदेखील करू लागले. परिणामी उत्पादनात मोठी वाढ दिसून आली. त्यामुळे अधिक उत्पन्नाच्या मोहापोटी रासायनिक निविष्ठांचा भडीमार झाला. याचा थेट परिणाम म्हणजेच उत्पन्न देखील भरघोस मिळत गेले. परंतु मराठीमधील म्हण जसे की, "अति तिथे माती" म्हणजे रासायनिक निविष्ठांचा अति वापर करून जमिन नापीक झाल्या. मातीमध्ये असणारे उपयुक्त सूक्ष्मजीवदेखील नाश पावत चालले आहेत. मानवी आरोग्यावर देखील त्याचे दुष्परिणाम होत असून अनेक व्याधींना सामोरे जावे लागत असल्याचे श्री. हेमाडे यांनी स्पष्ट केले. त्यावर त्यांनी असा विचार केला की यावर उपाययोजना केली पाहिजे.
मातीमध्ये असणारे उपयुक्त सूक्ष्मजीव व त्यांची संख्या कुठल्या पद्धतीने वाढवता येईल. जमीन किंबहुना मातीचा समतोल पिकांसाठी पोषक राहील या सर्व बाबींचा विचार करून त्यांनी अशा उत्पादनाची निर्मिती केली की, जे पूर्णतः नैसर्गिक असून यांच्यापासून उत्पादित होणारे अन्नधान्य ग्राहकांसाठी एका औषधाप्रमाणे काम करेल आणि म्हणून श्री. हेमाडे यांनी आपल्या कंपनीचे ब्रीदवाक्य ठेवले "अन्न हेच औषध"!! पूर्वी परंपरागत पद्धतीने केल्या जाणाऱ्या नैसर्गिक शेतीप्रमाणेच सर्व उत्पादने शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली तर उत्पादनही औषधांसारखे काम करेल. आणि ही नैसर्गिक उत्पादने म्हणजेच ती अन्नधान्याची उत्पादने सेवन केली तर आपण आजारी पडणार नाही शेती आणि मातीचा हाच सांगोपांग विचार करून हे उत्पादन आम्ही जगभर पोहचवण्यासाठी कार्यरत झालो असल्याचे श्री. घन:श्याम हेमाडे यांनी स्पष्ट केले. ही सर्व उत्पादने रेसिड्यू फ्री असून सेंद्रिय शेतीसाठी प्रमाणित केली आहेत.
श्री हेमाडे यांनी दिंडोरी तालुक्यातील तळेगाव येथे आनंद बायोकेम रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर स्थापन केले आहे. अत्याधुनिक व सुसज्ज लॅबची निर्मिती केली आहे. यात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानक असलेली चाचणी पद्धती अवलंबण्यात आली असून या ठिकाणी माती परीक्षण (रासायनिक आणि सूक्ष्मजीव) पाणी परीक्षण, पान देठ परीक्षण, खते परीक्षण (सेंद्रिय आणि रासायनिक) बिज उगवणक्षमता परीक्षण, अंकुर भिन्नता परीक्षण, कृषी रसायन (कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक) इ. परीक्षण करण्यात येते.
शेतीसाठी माती परीक्षण, पाणी परीक्षण, पान देठ परीक्षण, का महत्वाचे आहे. या माझ्या प्रश्नावर उत्तर देताना श्री. हेमाडे म्हणाले की, माती ही पृथ्वीच्या कवचाचा पातळ थर आहे. जी वनस्पतीच्या वाढीसाठी नैसर्गिक माध्यम म्हणून काम करते. माती हे खडकाचे कण आणि बुरशी यांचे मिश्रण आहे. माती ही मुख्य चार घटकांपासून बनलेली आहे. खनिज पदार्थ (४५ टक्के ),सेंद्रिय पदार्थ (५ टक्के), पाणी (२५ टक्के), हवा (२५ टक्के), मृदा परीक्षण हे शेतीसाठी एक मौल्यवान साधन आहे. कारण जे कार्यक्षम आणि आर्थिक उत्पादनासाठी आवश्यक इनपुट निर्धारित करते. योग्य माती परीक्षणामुळे जमिनीत आधीच असलेल्या पोषक तत्त्वांचा फायदा घेऊन पिकाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा खतांचा वापर सुनिश्चीत करण्यास मदत होते. तसेच अयोग्य व समस्यायुक्त पाण्याचा पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो. यासाठी पाण्याचे परीक्षण करून योग्यतेनुसार पाण्याचा वापर करणे गरजेचे आहे. पाणी चविस खारवट किंवा मचुळ वाटत असल्यास, पाण्याच्या सिंचनासाठी वापर केलेल्या शेतातील जमिनीच्या पृष्ठभागावर क्षारांचा पांढरा थर दिसून आल्यास, पीक उगवणीस अडथळा होताना दिसून आल्यास किंवा उगवलेल्या पिकांचे शेंडे करपताना दिसून आल्यास जमीन चोपण चिबड होऊन पृष्ठभागावर पाणी थांबत असल्यास, जमिनीवर चालताना जमीन टणक झाल्याचे जाणवत असल्यास पाण्याचा नमुना परीक्षणासाठी द्यावा. निरनिराळ्या सिंचन साधनामधून घेतलेल्या पाण्याचा नमुना प्रतिनिधिक असावा अशी माहिती श्री. हेमाडे यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, रोपाच्या लागणीपासून ते पीक काढणीपर्यंत वनस्पतीमध्ये संपूर्ण अन्नद्रव्यांचा समतोल असणे खूप महत्त्वाचे असते. काही कारणामुळे जमिनीमधून वनस्पतीकडे लागणारी अन्नद्रव्य योग्य त्या प्रमाणात घेतली जात नाहीत म्हणून वनस्पतीमधील अन्नद्रव्याचा समतोल साधला जात नाही. योग्य वेळी पान देठ परीक्षण केल्यामुळे जमिनीमधून तसेच ठिबकद्वारे फवारून देण्यासाठीचे अन्नद्रव्यांचे अचूक नियोजन करता येते. पान देठ परीक्षण अहवालानुसार कोणते अन्नद्रव्य कधी, कसे आणि कोणत्या स्वरूपात द्यावे याचे योग्य व्यवस्थापन करता येते. काही अन्नद्रव्यांचा रोग किडीशी सरळ संबंध असल्यामुळे त्यांचे नियोजन योग्यवेळी केल्यास रोग व किडीचा बंदोबस्त कमी खर्चात, कमी वेळेत करणे खूप सोपे जाते अशा परिस्थितीत पान देठ परीक्षण अहवालानुसार नियोजन केल्यास पिकांमधील उत्पादकता, गुणवत्ता, टिकवणक्षमता हमखास सुधारते. तसेच उत्पादनखर्चात बचत होत असल्याचे श्री. हेमाडे यांनी स्पष्ट केले.
आनंद एग्रो केअरमध्ये उत्पादनासंबंधीत सर्व कामे करण्यासाठी अत्याधुनिक पायाभूत सुविधा आहेत. यासाठी स्वतंत्र हवा हाताळणी यंत्र प्रदान केलेली संशोधन प्रयोगशाळा, उत्पादनाच्या तपासणीसाठी आणि सुधारणेसाठी आवश्यक असलेली प्रयोगशाळा, उत्पादन विभाग आणि स्वतंत्र असलेले असे पॅकेजिंग विभाग आहेत. उत्पादनासाठी आवश्यक असलेल्या सर्व कामांसाठी लागणारे आर. ओ. पाणी तयार करण्यासाठी आवश्यक असलेले स्वतंत्र यंत्र आहेत. त्यांच्या प्रगत उत्पादन तंत्रज्ञानामध्ये SCADA सॉफ्टवेअर नियंत्रित फर्मेंटर्स, लॅब श्रेणीचे आणि औद्योगिक श्रेणीचे सेंट्रीफ्युज, कुलिंग सेंट्रीफ्युज आणि स्प्रे ड्रायर्स, फेज कॉन्ट्रास्ट, मायक्रोस्कोप, स्टीरीओ मायक्रोस्कोप, यू. व्ही. व्हिजीबल स्पेक्ट्रो फोटोमीटर, बायोसेफ्टी कॅबिनेट, स्वयंचलित एचपीसीएल. आणि गॅस क्रोमोटोग्रफी यंत्र, आयसीपीओ.यंत्र, कॅप्सूल उत्पादनासाठी लागणारे स्वयंचलित यंत्र अशी वैज्ञानिकदृष्ट्या स्वीकारलेली उपकरणे समाविष्ट आहेत. ही सर्व यंत्रणा सांभाळण्यासाठी व उत्पादनांची गुणवत्ता टिकवण्यासाठी त्यांच्याकडे कृषीक्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले वैज्ञानिक तसेच उच्चशिक्षित कर्मचारीदेखील आहेत. या कंपनीत काम करणारे कर्मचारीही आपल्या उत्तम कामाचा ठसा उमटवत आहेत.
आनंद ऍग्रोचा कर्मचारी वृंद |
आनंद ऍग्रो केअर यांनी कृषीक्षेत्रातील समस्या निराकरणासाठी "डॉ.क्रॉपगुरु" नावाचे ॲप आणले असून हे ॲप मराठी, हिंदी, इंग्लिश, गुजराती या चार भाषेमध्ये उपलब्ध आहे. डॉ.क्रॉपगुरु या अँड्रॉइड मोबाईल ॲपमधून आपणास द्राक्ष, डाळिंब, सिमला मिरची, टोमॅटो ह्या मुख्य पिकांव्यतिरिक्त इतर वेलवर्गीय पिके व भाजीपालाविषयी सखोल मार्गदर्शन केले जाते. पिकाच्या अवस्थेनुसार दर पंधरा दिवसाचे फवारणी वेळापत्रक, जमिनीचा प्रकार व पिकाच्या अवस्थेनुसार पंधरा दिवसाचे खत व्यवस्थापन वेळापत्रक उपलब्ध होते. 'प्रश्न विचारा' या सदरातून पिकांच्या समस्येचा फोटोसह प्रश्न विचारल्यास तात्काळ तज्ञामार्फत शंका निरसन केले जाते. इमर्जन्सी कॉलच्या माध्यमातून चोवीस तास, सातही दिवस पिकाच्या समस्या सोडवल्या जातात. डॉ. क्रॉप गुरु या यू टू टुयब चैनलमार्फत चालूस्थितीतील समस्या व त्यावरील उपाययोजनेसाठी मार्गदर्शन, वातावरणातील बदल यांचे अपडेटनुसार पिकांची काळजी कशी घ्यावी याचे मार्गदर्शन मिळते. दररोज नोटिफिकेशनच्या माध्यमातून वातावरणातील बदलानुसार कामकाजाचे नियोजन मिळत असल्याचे श्री. हेमाडे यांनी सांगितले.
कृषीक्षेत्रात केलेल्या नाविन्यपूर्ण कामांसाठी त्यांना 'प्राइड ऑफ नाशिक, एक्सलन्स इन ऑरगॅनिक क्रॉप केअर २०२२, ॲग्रोवन बिझनेस एक्सलन्स पुरस्कार २०१९, ऍग्रोकेअर आयडॉल पुरस्कार,२०१८, युवा आयडॉल पुरस्कार २०१९, युवा प्रताप पुरस्कार २०१८ असे नामांकित पुरस्कारही प्राप्त झालेले आहेत. आनंद ऍग्रो केअरच्या दर्जेदार जैविक उत्पादनाविषयी अधिक माहितीसाठी www.anandagrocare.com या संकेतस्थळाला भेट द्यावी.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा