name='viewport'/> link rel=“canonical”href=“https://ahiredeepak.blogspot.com/” /> स्व-काव्यांकुर (SWA-KAVYANKUR): रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)

रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)

 रोजगार निर्मितीचे नवीन साधन : कृषी पर्यटन (Agro tourism)



          







भारत वैविध्याने आणि सौंदर्याने नटलेला देश आहे. आजही या देशातील ७० टक्के जनता ही ग्रामीण भागात राहते. देशाला स्वातंत्र्य मिळून पाच तप उलटले तरी ग्रामीण भागाचा उदरनिर्वाह करणारी शेती पूर्णपणे दुर्लक्षित राहिली त्यामुळेच आज आपल्यासमोर शेतकरी आत्महत्येसारखी महाभयान समस्या उभी ठाकली आहे. 

वाढत्या शहरीकरणामुळे शहर आणि गाव यातील दरीही तेवढीच वाढली असल्यामुळे गाव, गावाकडची संस्कृती, शेती, शेतकऱ्यांची जीवनपद्धत अशा अनेक विषयापासून शहरी लोक कोसो दूर राहिलेत. आज पुन्हा एकदा गावाकडे चला असं म्हणण्याची वेळ आली आहे.

शहरी माणसाला या गावाकडच्या मातीची ओढ आहे तर ग्रामीण भागात शेतीसोबत पूरक व व्यवसायांची गरज आहे. या दोन्ही गोष्टींची सांगड घालून कृषीपर्यटन ही संकल्पना आजमितीस आपल्या मातीत रुजू लागली आहे. आता आपण दरवर्षी जागतिक कृषी पर्यटन दिन हा १६ मे रोजी साजरा करतो. 














मोठ्या प्रमाणात वाढणारा व्यवसाय

 

  • सध्या महाराष्ट्रात कृषीपर्यटन व्यवसाय मोठ्या प्रमाणात वाढत आहे. शेतकऱ्यांनी उभारलेल्या कृषी पर्यटन केंद्रांना शहरी पर्यटकांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. 

  • वाढत्या शहरीकरणामुळे दिवसेंदिवस नागरिकांचा निसर्गापुढे ओढा वाढत आहे. निसर्गाचे हानी न होऊ देता पर्यावरणाचा समतोल राखून पर्यटनाचा आनंद देणारी कृषी पर्यटन केंद्रे हा सक्षम पर्याय शेतकऱ्याना मिळाला आहे.आजमितीस महाराष्ट्रात तीनशेहून अधिक कृषी पर्यटन केंद्रे आहेत. 

  • कृषी पर्यटनातून ग्रामीण विकास आणि ग्रामीण विकासातून महाराष्ट्राचा विकास यासाठी व शेतकऱ्यांच्या हितासाठी महाराष्ट्रात कृषी पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी व कृषी पर्यटन संस्थांनी एकत्र येऊन एक महासंघ स्थापन केला आहे.  त्याचे नाव महाराष्ट्र स्टेट ॲग्री अँड रुरल टुरिझम को-ऑपरेशन लि. (मार्ट) आहे.  

  • मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्राच्या प्रमुख शहरात मार्टने केलेल्या सर्वेक्षणानुसार सुमारे ४२ टक्के लोकांना ग्रामीण भागात एकही नातेवाईक नसल्याचे सिद्ध झाले आहे. शेतकऱ्यांमध्ये होणारी जागृती, शेतीपूरक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे बघितले जात असल्याने दिवसेंदिवस कृषी पर्यटन व्यवसाय चांगलेच मूळ धरून बहरू लागला आहे.












पूरक व्यवसाय

 

  • उपलब्ध साधनसामुग्रीत अगदी कमी भांडवली खर्चात केला जाणारा हा पूरक व्यवसाय आहे. शहरी पर्यटकांना ग्रामीण जीवनाची ओळख करून देणे व त्यायोगे शहरी पैसा ग्रामीण भागाकडे वळविणे हा उद्देश साध्य होतो. रोजगार निर्मिती, शेतीमालाला शेतातच ग्राहक हे मुख्य व अत्यंत महत्त्वाचे हेतू साध्य होतात. 

  • ही कृषी पर्यटन केंद्रे प्रत्येक गावात रोजगार निर्मितीचे नवीन साधन म्हणून उदयास येत आहे. 

  • आजच्या नव्या पिढीला शेती, गोठे, चुलीवरचे जेवण, घर, गावाकडच्या प्रथा हे सारं माहीत नसतं. गंमत म्हणजे जर आजच्या मुलांना विचारलं भात कुठे पिकतो? तर मुलं सहज उत्तर देतात. बिग बाजार किँवा सुपर मार्केट इ. यात त्यांचा दोष नाही कारण त्यांनी या सर्व गोष्टी कधी पाहिलेल्याच नाहीत. आणि जे पाहिलेच नाही ते कळेल तरी कसे? 

  • जे अन्न आपण खातो ते आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी काय आणि किती प्रकारच्या प्रक्रियेतून जाते. याची कल्पनाच नसेल तर अन्न वाया घालवू नये याचे महत्त्व पटेलच कसे? 

  • शेतकऱ्यांची दुःख समजण्याची, त्यांच्या आत्महत्येच्या प्रश्नाशी आजची पिढी जोडली जाईलच कशी? म्हणूनच कांदा जमिनीवर उगवतो की जमिनीखाली? शेतकरी आत्महत्या का करतात? या अशा प्रश्नाची उत्तर मिळवायची असतील तर त्यासाठी कृषी पर्यटनाचा मार्ग आहे. हे आता शहरी जणांना मनोमन पटू लागलेय. त्यामुळे काळाची गरज ओळखून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी आता जोमाने कृषी पर्यटन व्यवसाय सुरू केला पाहिजे. 

  • अत्यंत उज्वल असे भवितव्य असणारा असा हा कृषि पर्यटनाचा पूरक व्यवसाय करून तो मुख्य व्यवसाय कसा होईल याचा ध्यास घेतला पाहिजे. 

 













शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन


  • आज शेतीमालाच्या दराबाबत अनिश्चितता आहे. शेतकरी शेती उत्पादन पिकवतो. त्याला दर निश्चितीचा हक्क नाही यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनखर्च सुद्धा मिळत नाही. अशा अवस्थेमध्ये कृषीपर्यटन व्यवसायात पर्यटकांचे दर निश्चिती पॅकेज ठरविणे शेतकऱ्यांच्या हातात आहे म्हणून हा व्यवसाय आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य व सामर्थ्य देणारा आहे. 

  • त्याचबरोबर कृषी पर्यटन व्यवसायात प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे सामर्थ्य आहे. हे राज्यातील अनेक कृषि पर्यटन करणाऱ्या शेतकऱ्यांनी सिद्ध केले आहे. 

  • कृषी पर्यटनाची अगदी सोपी व्याख्या करायची झाली तर शेतकऱ्यांच्या फळत्या फुलत्या शेतीत पर्यटकांसाठी निवास आणि न्याहारीची उत्तम व्यवस्था करून देणे. शेतीपूरक अनेक व्यवसायांची जोड देऊन कृषीपर्यटन करता येते. 














महत्त्वाच्या टिप्स

कृषी पर्यटन करू इच्छिणाऱ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स पुढीलप्रमाणे आहेत.

  • अतिथी देवो भव! ही आपल्या देशाची संस्कृती आहे. सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे आदरातिथ्य...! येणाऱ्या पर्यटकांचे घरच्याच सदस्य असल्याप्रमाणे आदरातिथ्य केले की आपण अर्धी लढाई तेथेच जिंकतो. 

  • कृषीपर्यटनाचा व्यवसाय सुरू करताना सर्व बाजूंचा अभ्यास आवश्यक आहे. त्याचसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वतःचे मार्केटिंग करणेही महत्त्वाचे ठरते. 

  • आपल्या व्यवसायाची जाहिरात वृत्तपत्रे, मासिके, साप्ताहिके, पर्यटनविषयक मासिके यातून सतत करावी. 

  • आपल्या शेतीची बलस्थाने आपणच विकसित करावीत. नाविन्य आणि वेगळेपण जपणे गरजेचे असते. 

  • आपल्या शेतात पर्यटकांना खिळवून ठेवण्यासाठी शक्यतो नैसर्गिक स्रोताचा जास्तीत जास्त उपयोग करून पर्यटकांना सेवा द्यावी. पर्यटकांसोबत स्वतः जातीने उपस्थित राहावे. विश्वासाचं नातं नवीन पर्यटक तुमच्याशी जोडले जाण्यासाठी महत्त्वाची भूमिका पार पाडते. 













दुर्गम भागातही कृषीपर्यटन

  • दुर्गम भागातही कृषीपर्यटन करता येते. कारण आजच्या धावपळीच्या जगात लोकांना निरव शांततेची आवश्यकता असते. त्यामुळे लोक कितीही अडचणी आल्या तरी शांत, निसर्गरम्य ठिकाणी जाण्यास तयार असतात. 

  • शेतीसोबतच निसर्गाशी संबंधित इतर गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या असतात. त्याही पर्यटकांना दाखवता येतात. उदा. विविध पक्षी, प्राणी, झाडे,फुलपाखरे इ. पर्यटकांना घरचे चुलीवर शिजवलेले जेवण मिळाले तर पर्यटक जास्त आनंदी व समाधानी होतात. त्यामुळे या गोष्टींचीही खूप काळजी घ्यायला हवी. 

  • राहण्याची व खाण्यापिण्याची योग्य व व्यवस्थित सोय झाली की पर्यटक पुन्हा तुमच्याकडे भेट नक्की देणार याची खात्री असते. 

  • आठवड्याची सुट्टी (विकेंड) ही वाढती संकल्पना पाहता पर्यटकांना आपल्या केंद्राकडे वळविता येऊ शकते. शेतीचे मूल्यवर्धन म्हणून कृषीपर्यटन करावे. 











वास्तवदर्शी प्रकल्प अहवाल 

  • कृषी पर्यटन व्यवसायासाठी कर्ज प्रकरण सादर करतांना ज्यासाठी कर्ज घ्यायचे आहेत त्याबाबत संपूर्ण माहिती दिली पाहिजे. 

  • प्रकल्प अहवाल नेमका, वास्तव व पारदर्शक असावा. अहवाल बनवून देणाऱ्यास त्याची परिपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे. 

  • अहवालात मार्जिन, स्वनिधी बँक साहाय्य, व्याजदर, कर्ज परतफेडीचा कालावधी, येणारा व जाणारा पैसा यांचा समन्वय, प्रतिवर्षी होणारी वाढ, परतफेडीचा तपशील, आर्थिक जमा आदी बाबींचा समावेश हवा. 

  • कर्ज घेण्यासाठी अर्ज करताना लागणारी कागदपत्र पुढीलप्रमाणे आवश्यक असतात. त्यात राहण्याच्या दाखला व फोटो दाखला, ग्रामपंचायतीचा व्यवसाय म्हणून दाखला, ग्रामपंचायत बांधकाम परवाना, इस्टिमेट (अंदाजपत्रक),आर्किटेक्चर दाखला. ज्या जागी बांधकाम करायचे त्या क्षेत्राचा एन.ए. दाखला (कलेक्टर) किंवा झोन दाखला, जागेविषयक संपूर्ण कागदपत्रे, वकील तारण योग्यतेचा दाखला, टायटल व सर्च रिपोर्ट, ज्यांच्या नावावर जमीन आहे त्याचे संमतीपत्रक, जागेचा नकाशा, अन्य गटधारकांची संमती लागते. 

  • कुटुंबातील अन्य सदस्यांची संमती, जोडतारण असल्यास जोडतारणाची कागदपत्रे, आर्थिक कागदपत्रे, आवश्यक प्रमाणपत्रे, जामीनदाराची कागदपत्रे, जामीनदार हा कर्जदाराइतकाच परतफेडीला समप्रमाणात जबाबदार असतो. 

  • कृषीपर्यटन व्यवसाय असल्याने व्याजदर 13 ते 15 टक्यापर्यंत अपेक्षित असतो. कर्ज कालावधी कर्जानुसार 5 ते 10 वर्षापर्यंत असू शकतो. कर्जाचा हप्ता मासिक, त्रैमासिक किँवा वार्षिक असतो. 

  • कर्ज परतफेडीबाबत ड्रायपिरियड मंजूर होऊ शकतो. या कालावधीत फक्त दरमहा व्याज भरावे लागते. कर्ज विनीयोगाचे स्वतंत्र तपशीलवार पत्र देणे गरजेचे आहे. 

  • कृषी पर्यटन विकसनसाठी जमीन सपाटीकरण, ऍप्रोच रोड, तलाव, शेततळे उभारणी, पाणी टाकी, पाईपलाईन कॉटेज, रूम बांधणी, डायनिंग हॉल, फर्निचर खरेदी, किचनमधील उपकरणे, खरेदी, झोपाळा, घसरगुंडी, नौकानयन, बैलगाडी, घोडागाडी, पर्यटकांना फिरवण्यासाठी वाहन खरेदी, सौर ऊर्जा, गोबर गॅस, दैनंदिन खर्चासाठी कॅश क्रेडिट, मालतारण कर्ज इ. घेता येते














ताणतणाव कमी करण्यासाठी कृषी पर्यटन 

  • एकूणच कृषी पर्यटनाकडे व्यावसायिक दृष्टीने पाहावे तरच चांगल्याप्रकारे आर्थिक प्रगती साधता येते. 

  • धकाधकीच्या जीवनात परस्परांतील संवाद कमी होतोच त्यामुळे ताणतणाव वाढतोय. तो कमी करण्यासाठी कृषी पर्यटन हे चांगले माध्यम आहे. 

  • पर्यटकांना निवांतपणा मिळाला की ते आनंदीत होतात. त्यासाठी आपण मात्र त्यांना कमीत कमी आवश्यक अशा पायाभूत सुविधा तरी पुरविल्याच पाहिजेत. 

  • कृषी पर्यटन केंद्रासाठी शक्यतो निसर्गाच्या सानिध्यात जागा निवडावी. रिसॉर्ट व कृषीपर्यटन या दोन्ही वेगवेगळ्या संकल्पना आहेत. हे केंद्र चालवणाऱ्याने नेहमी लक्षात ठेवावयास हवे. 

  • शेतीतून अधिक उत्पन्न वाढविण्याची संकल्पना म्हणजे कृषी पर्यटन होय. यात शेतीला प्रथम प्राधान्यच मिळाले पाहिजे. 

    

















महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अनेक एकरांवर बहरलेली ही केंद्रे शेतीसोबत नवनवीन संकल्पना, प्रयोग करून कृषी पर्यटन यशस्वीरीत्या राबवत आहेत. शासनाच्या विविध योजना आणि भविष्यातील या क्षेत्रातील वाढती मागणी याची वेळीच दखल घेऊन आपल्याकडील प्रत्येक शेतकऱ्याने कृषी पर्यटनासाठी सुरुवात करायला हवी. खरं तर कृषी पर्यटन ही परदेशी संकल्पना आहे. ब्राझील, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया या देशात ती खूप लोकप्रिय आहे. आपल्या देशातही आता ही संकल्पना मोठ्या प्रमाणात रुजली आहे. परंतु योग्य नियोजन आणि दूरदृष्टीने या गोष्टीकडे पाहिले तर भारत हा कृषि पर्यटनात पहिल्या क्रमांकाचा देश म्हणून उदयास येण्यास जास्त वेळ लागणार नाही.


© दीपक केदू अहिरे, नाशिक


deepakahire1973@gmail.com


www.DigitalKrushiyog.com


#कृषी पर्यटन  #Agro tourism #रोजगार 

#शेतीपूरक व्यवसाय 



No comments:

Post a Comment

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात (Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran)

सोनईतील भुसारी बंधूंची इराणला थेट ५० टन केळी निर्यात Bhusari brothers from Sonai export 50 tonnes of bananas directly to Iran भुसारी ॲग्रो...