कांदा उत्पादन आणि व्यापार व्यवसाय (Onion production and trading business)
हवामान :
- कांदा पिकाला थंड हवामान पोषक असते.
- कांदा वाढीच्या सुरुवातीच्या काळात १० ते १५ अंश से. गाठ मोठी होत असताना १३ ते २४ अंश से. तापमान उपयुक्त ठरते.
- कांद्याच्या उत्तम वाढीसाठी रात्रीचे १५ ते २० अंश से. दिवसाचे २५ ते ३० अंश से. तापमान, ११ ते १२ तास स्वच्छ सूर्यप्रकाश व ७० ते ७५ टक्के आद्रता आवश्यक असते.
- जास्त पाऊस, उष्ण व अति दमट आणि ढगाळ हवामान कांदा पिकास हानिकारक असते.
जमीन :
- कांद्यासाठी उत्तम निचऱ्याची मध्यम ते मध्यम भारी जमीन निवडावी. हलक्या मुरमाड जमिनीत सेंद्रिय खतांचा पुरवठा चांगला असेल तर उत्पादन चांगले येते.
- उत्तम वाढीसाठी जमिनीचा सामू ६.५ ते ७.० व जमीनीची क्षारता ०.५ ते १ टक्क्याच्या दरम्यान असावी.
- तथापि कांदा पीक तुलनेने अधिक सामू असणाऱ्या जमीनीतही येते.
जाती :
- अ) खरीप हंगामातील जाती : १) एन-५३ २) बसवंत-७८० ३) ऍग्रोफाऊंड डार्क रेड ४) भीमराज ५) अर्का कल्याण
- ब) रांगडा हंगाम : १) फुले समर्थ २) भीमा सुपर ३) भीमा रेड ४) भीमा शक्ती
- क) रब्बी आणि उन्हाळी हंगामातील जाती : १) एन-२-४-१ २) पुसा रेड ३) भीमा शक्ती ४) अरका निकेतन ( सिलेक्सन १३) ५) ऍग्रोफाऊंड लाईट रेड ६) उदयपूर -१०१ ७) पुसा माधवी
- ड) पांढऱ्या कांद्याच्या जाती : १) फुले सफेद २) भीमा शुभ्रा ३) भीमा श्वेता ४) ऍग्रोफाऊंड व्हाईट ५) पुसा व्हाईट राऊंड ६) पुसा व्हाईट फ्लॅट ७) पंजाब एस -४८ ८) पी.के.व्ही सिलेक्सन
- इ) पिवळ्या कांद्याच्या जाती : १) फुले सुवर्णा
लागवड :
- सर्वसाधारण कांदा लागवड जवळ जवळ वर्षभर होत असली तरी खरीप, रांगडा, रब्बी हंगामात कांदा लागवड होते.
- खरीप हंगामात मे महिन्यात बी पेरून १५ जुलैपर्यंत रोपांची लागवड केली जाते. कांदा काढणीस ऑक्टों-नोव्हें.महिन्यात तयार होतो.
- रांगडा हंगामात ऑगस्ट-सप्टें. महीन्यात बी पेरून रोपांची पुनर्लागण ऑक्टोबर महिन्यात किंवा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली जाते.
- रब्बी हंगामात ऑक्टोंबर- नोव्हेंबर महिन्यात बी पेरून रोपांची लागवड डिसे.-जानेवारी महिन्यात केली जाते. कांदा पोसण्याचा कालावधी उन्हाळ्यात येतो. म्हणून या लागवडीस उन्हाळ कांदा म्हणतात.
- वेगवेगळया भागात कांद्याची लागवड विविध पद्धतीने करतात . काही भागात बी शेतात कायम जागी पेरून लागवड करतात.
- अनेक ठिकाणी गादी वाफ्यावर रोपे तयार करून पुनर्लागण करतात. रोपे सपाट वाफ्यात किंवा सरी वरंब्यावर करतात.
- काही भागात पात कापून लागवड करतात. रोपवाटिका तयार करून लागवड करणे ही प्रचलित व फायदेशीर पद्धत आहे.
पाणी व्यवस्थापन :
- सुरूवातीच्या काळात कांद्याच्या पिकाला बेताचे पाणी लागते. नंतर कांदा पोसण्याच्या काळात ४५ ते १०० दिवस नियमित पाणी आवश्यक आहे.
- कांदा पोसावयास सुरुवात झाल्यावर पाण्याचा ताण पडू देऊ नये. अनियमित पाणी पुरवठा झाल्यास जोडकांद्याचे प्रमाण वाढते.
खत व्यवस्थापन :
- कांदा पिकाला भरपूर सेंद्रिय खते देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करतेवेळी हेक्टरी ४० ते ५० गाड्या शेणखत द्यावे.
- खतांचे प्रमाण जमीन,हवामान,हंगाम यावर अवलंबून असले तरी सर्वसाधारण १०० कि. नत्र, ५०कि. स्फुरद, ५० कि.पालाश द्यावे.
- निम्मा नत्र म्हणजे ५० किलो पुनर्लागवडीच्यापूर्वी १ ते २ दिवस आधी द्यावा. ५० कि. स्फुरद व ५० किलो पालाश त्याच वेळी द्यावा.
- राहिलेला ५० कि. नत्र रोपांची शेतात पुनर्लागवड केल्यानंतर १ ते २ हप्त्यात, पहिला हप्ता पुनर्लागवड केल्यानंतर ३० दिवसांनी व दुसरा हप्ता पुनर्लागवडीनंतर ४५ दिवसांनी द्यावा.
- वरखते कांदा तयार होण्यास सुरुवात होण्यापूर्वी द्यावा.
किड नियंत्रण :
- कांद्यावर फुलकिडे (थ्रीप्स), कांद्यावरील माशी, कंद किंवा खोड कुरतडणारी अळी (कट वर्म),फुले किंवा फळे कुरतडणारी अळी, तांबडे कोळी (माईटस), कांद्यावरील कोळी, वाळवी या किडी येतात.
- फुलकिड्यांमुळे कांद्याचे ३० ते ४० टक्के उत्पादन घटते. फुलकिड्यांना वर्षभर खाद्य मिळत असल्यामुळे अनेक भाज्यांवर या किडी जगतात. या किडींचा जीवनक्रम तोडण्यासाठी प्रभावी औषधांची फवारणी करावी.
रोगनियंत्रण :
- कांदा पिकाचे किडीपासून जेवढे नुकसान होते त्यापेक्षाही रोगापासून जास्त नुकसान होते.
- कांदा पिकाच्या रोगाची वैशिष्टय जाणून घेतले तर नियंत्रण करण्यास सोपे जाते.
- कांदा पिकात मर रोग, काळा करपा, पांढरी सड, मूळकूज, जांभळा करपा, तपकिरी करपा, कंद व खोड कुजविणारे सूत्रकृमी, कोलेटोट्रीकम करपा रोग, केवडा, काणी हे रोग येतात.
- कांदा साठवणीत मानकुज, काजळी हे रोग येतात. कांद्यावर विषाणूजन्य रोग येतात. लक्षणे ओळखून रोगावर यथायोग्य नियंत्रण मिळवावे.
काढणी :
- लागवडीनंतर जाती परत्वे आणि हवामानानुसार कांदा पक्व होऊ लागला की, नवीन पाने यायची थांबतात.
- पानातील अन्नरस कांद्यात उतरून कांदा घट्ट होऊ लागतो. पाने पिवळसर होऊ लागतात.
- कांद्याचा मानेचे भाग मऊ होतो. व पाने मानेजवळ वाकून जमिनीवर पडतात.
- खरिपाचा कांदा लागवडीनंतर १०० ते ११० दिवसात तयार होतो.
- कांदा काढल्यानंतर तो शेतात पातीसह ३-४ दिवस पडू द्यावा. पात कापल्यानंतर कांद्याची प्रतवारी करावी.
- चांगल्या प्रकारे प्रतवारी करून एकसारखा कांदा ग्राहकापर्यंत पोहचवला तर भाव चांगला मिळतो.
प्रक्रिया :
- कांद्याचे निर्जलीकरण, सलाड, कांद्याचे विविध पदार्थ (कांदाभजी, पोहे, पिठले), कांदा तेल, कांदा ज्यूस, कांदा लोणचे, इ. प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करतात.
- महाराष्ट्रातील महिला मोठ्या कांद्याच्या चकत्या करून ऊन्हात कडकडीत वाळवतात. आणि मसाल्याच्या पदार्थात मिसळून बारीक करतात. ह्यालाच कांद्याचे निर्जलीकरण म्हणतात.
- कांद्याच्या प्रक्रियायुक्त पदार्थाना बाजारात मोठी मागणी आहे.
कांदा व्यापार व्यवसाय
- महाराष्ट्रात कांदा व्यापार हा एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.
- कायदेशीर आणि यशस्वी कांदा व्यापार व्यवसाय चालवण्यासाठी आवश्यक परवाने आणि परवानग्या मिळवणे महत्त्वाचे आहे.
- कांदा व्यापार सुरू करण्यासाठी काही आवश्यक पायऱ्या आहेत. त्यात व्यवसायाची उद्दिष्टे, लक्ष्य आणि आर्थिक अंदाजांची रूपरेषा देणारी तपशीलवार योजना विकसित करून व्यवसायास सुरुवात करावी
- तुमच्या कांदा व्यापार व्यवसायासाठी स्थान निश्चित करा त्यात तुम्ही कांदा उत्पादक प्रदेश किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात, भागात सुरू करण्याचा विचार करू शकता.
- तुमचा कांदा व्यापार व्यवसायाची कायदेशीर संस्था म्हणून नोंदणी करा. त्यात वैयक्तिक मालकी, भागीदारी किंवा प्रायव्हेट लिमिटेड कंपनी या प्रमाणानुसार नोंदणी करून घ्यावी.
- या व्यवसायासाठी कायमस्वरूपी खाते क्रमांक (पॅन) आणि कर वजावट आणि संकलन क्रमांक (टॅन) क्रमांक हेतूंसाठी अर्ज करावा.
- कांदा व्यापार करण्यासाठी तुम्हाला आवश्यक परवाने आणि परवानग्या घेणे आवश्यक आहे.
- त्यात दुकान आणि आस्थापना परवाना, बाजार समिती परवाना, जीएसटी नोंदणी करावी.
- थेट शेतकऱ्यांकडून किंवा घाऊक बाजारातून कांदा खरेदी करण्यासाठी विश्वसनीय स्रोत निर्माण करावा.
- संभाव्य खरेदीदारांपर्यंत पोहोचण्यासाठी विपणन धोरण विकसित करून आपल्या कांदा व्यापार व्यवसायासाची ब्रँड जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे.
© दीपक केदू अहिरे, नाशिक
deepakahire1973@gmail.com
www.ahiredeepak.blogspot.com
www.digitalkrushiyog.com
digitalkrushiyog@gmail.com
digitalkrushiyog@gmail.com
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा